सुधा मूर्ती यांना लहानपणी त्यांच्या आजीने सांगितलेल्या गोष्टी या पुस्तकात वेगळ्या रुपात आपल्याला वाचायला मिळतात. आपल्या साध्यासरळ पण सुरस गोष्टींमधून आपल्या नातवंडांना नीतीमूल्याचे धडे देणारी आजी प्रत्येकच घरात असायला हवी. पण जर घरात अशी आजी नसेल तर मुलांना गोष्टी कोण सांगणार? त्यांना शहाणपणाचे धडे कोण देणार? अशा एक ना अनेक प्रश्नांचं उत्तर म्हणजे ‘आजीच्या पोतडीतल्या गोष्टी’ हे पुस्तक!
सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचं हे पुस्तक मोठ्यांनाही लहान बनवतं. या पुस्तकातल्या गोष्टी सुरस आहेत, चमत्कारिक आहेत पण कळत नकळत त्या गोष्टी बालमनावर वेगवेगळ्या नीतीमूल्यांचे संस्कार करत राहतात. आजीने नातवंडांशी संवाद साधावा इतके साधेसरळ, सहजसोपे शब्द या पुस्तकात असल्याने सर्व गोष्टी लहान मुलांना समजतातही आणि बराच काळ त्यांच्या मनात या गोष्टी घर करून राहतात.आजीची माया आणि शहाणपणा मुलांमध्ये रुजवण्यासाठी हे पुस्तक वाचलं जायलाच हवं!