जय विठ्ठल, हरी विठ्ठल..

Story: लोकसंस्कृती |
26th November 2023, 03:08 am
जय विठ्ठल, हरी विठ्ठल..

आषाढी एकादशीपासून क्षीरसागरात निद्रिस्त झालेले, योग निद्रेत गेलेले भगवान विष्णू जागृत झाले की त्यांचा प्रबोध उत्सव सुरु होतो. सगळीकडे दिप पेटवून त्यांचे स्वागत होते. देवदिवाळीच्या दिवशी तुळशीबरोबर त्यांचा विवाह होतो. निरनिराळ्या मंदिरातून भजनी सप्ताह, दिंड्या सुरु होतात. पण त्या सर्व उत्सवांमागे महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे देव-दैवतांचे गुणगान गात त्यांच्या नामाचा गजर करीत आत्मशांती मिळवणे, आपले मनोरथ पूर्ण करणे, येणाऱ्या संकटांवर मात करून आपली भरभराट करून घेण्याची बुद्धी, शक्ती मिळवणे.

पूर्वीच्या काळी हरीनामाचा जप केला जाई. आपल्या अडीअडचणी दूर व्हाव्या यासाठी बऱ्याचशा मंदिरात सार्वजनिक सप्ताहांचे आयोजन केले जाते. तीच परंपरा पुढे नेत असताना आजही सार्वजनिक सप्ताहांचे आयोजन केले जाते. या सप्ताहातून भगवंताच्या गुणगानांबरोबरच गायक कलाकार, पेटी, तबला, पखवाद वादक यांच्याही कलागुणांना वाव मिळत असतो.

सुमधूर गीतांनी मंत्रमुग्ध करणारा मडगाव येथील सुप्रसिद्ध दिंडी उत्सव हजारोंच्या उपस्थितीत सतत पाच दिवस साजरा केला जातो. मैफिलीचे आयोजन करून संपूर्ण मडगाव परिसर न्हाऊन निघतो. निरनिराळे खाद्यपदार्थ, घरगुती उपयोगाच्या वस्तूंची दुकाने यांनी सर्व रस्ते फुलून जातात. दिंडीच्या निमित्ताने हजारो लोक फेरीचा आनंद घेण्यासाठी मडगाव शहरात गर्दी करतात. साखळी येथे विठ्ठल मंदिरातून होणारा त्रिपूरारी पौर्णिमेचा उत्सव हा असाच एक उत्सव, असे किती तरी उत्सव संपूर्ण गोव्यातून साजरे केले जातात.

सावई-वेरे श्री मदनंताच्या चरणी सार्वजनिक सप्ताहाचे आयोजन करतात. सप्ताह म्हणजे सात दिवसांचा काळ पण  हा सप्ताह दीड दिवसांचा असतो. देवदिवाळी झाली की, लगेच सप्ताह ठरलेला असतो. इतर सप्ताहासारखे इथे फेरीचे आकर्षण नसते. इथे असते ते हरीनामाचे चिंतन. ‘जय विठ्ठल... हरी​ विठ्ठल... जय विठ्ठल... हरी विठ्ठल...’ प्रत्येकजण देहभान विसरून नाचत असतो. पहाणारा मंत्रमुग्ध होऊन तसाच पाहत उभा असतो. परंपरेनुसार १२ वाजता प्रज्वलित केलेली समई अखंड चौवीस तास पेटती राहणे गरजेचे असते. 

सावईवेरे गावचे सात वाडे. या सातही वाड्यांचा यात सारखाच सहभाग असतो. वाटून दिलेले वाडे आपली सेवा बजावण्यासाठी तत्पर असतात. रात्री १०च्या सुमारास श्री देवी सातेरी मंदिराकडून पार निघतो. पारासोबत गावातीलच कलाकारांनी केलेला रामायण, महाभारतातील एखादा प्रसंग चित्रित केलेला देखावा पहावयास मिळतो. सातेरी मंदिराकडून अनंत मंदिरात आल्यानंतर आरती प्रसाद होतो. रात्र जागण्यासाठी सगळेच उत्सूक असतात. 

सातेरी मंदिरातून अनंत मंदिरापर्यंत दिंडीत गावातील सर्व बंधूभगिनी सहभागी होतात. भजन गायनाची कला त्यांच्या नसानसात भिनलेली आहे. सावई-वेरे ही कलाकारांची भूमी. घराघरातून गायक, वादक कलाकार पहावयास मिळतो. प्रत्येक जण श्री मदनंताच्या चरणी सेवा अर्पण करण्यास सदैव तत्पर असतात. श्रीपाद साने घराणे म्हणा, संदेश खेडेकारांसारखे नावलौकिक प्राप्त झालेले प्रसिद्ध गायक कलाकार म्हणा अथवा बाबुराव भांडीये यासारखे निगर्वी व्यक्तिमत्त्व म्हणा; कलेचा अभिमान असलेले कलाकार फळाची अपेक्षा न धरता येथील कार्यक्रमात सहभागी होऊन पुढची पिढी घडवण्यासाठी धडपडत असतात. 

दुसऱ्या दिवशीही दहा-साडेदहाच्या दरम्यान साऱ्या मंदिरातून ‘तुकाराम’ नाचत, पायी लागते खडे, विठोबा धावत ये बा पुढे पुढे, आम्ही आलोया देवाच्या भेटे, देव भेटला अर्ध्या वाटे’’ अशा गजरात पार मंदिराकडे येतो. यावेळी सारा गाव हरीभजनात सहभागी होतो. बायका, पुरुष, छोटी छोटी मुले, दिंडी पथके यांचा उत्साह ओसंडून वाहत असलेला पाहून मन भारावून जाते.


पिरोज नाईक