दोन महिन्याआधी गावी गेले असता नात्यातील एका काकूच्या घरी जाणं झालेलं. कितीतरी वर्षांनी आले घरी म्हणून काकूंनी लगेच गोड करायला घेतले. पण वरचा डबा काढण्यासाठी हात सरकवताना काकू अस्वस्थ दिसल्या. डबा काढून देत कारण विचारल्यास काकू म्हणाल्या, खांदा खूप दुखतो अगं.. वर घेता येत नाही व धड मागेही सरकत नाही. डॉक्टरनी फ्रोझन शोल्डर सांगितलंय. तुमच्या फिजिओथेरपीमध्ये असतात ना गं यावर उपाय?
तसं पाहता स्त्रियांना सगळ्यात जास्त जाणवणारी खांद्याची तक्रार कोणती असेल तर ती आहे फ्रोझन शोल्डर. यामध्ये खांद्याच्या सांध्यामध्ये कडकपणा आणि अस्वस्थता येते, ज्याला अॅडेसिव्ह कॅप्सुलायटिसही म्हणतात. यामध्ये वेदनेसोबत खांद्याच्या हालचालीवर परिणाम होतो व दैनंदिन कामे करणे अवघड होऊन बसते.
खांदा हा हाडे, स्नायू आणि कंडरा यांनी बनलेला असतो.
जेव्हा खांद्याच्या सांध्याभोवती असलेले कॅप्सूल जाड आणि घट्ट होते, तेव्हा ते खांद्याच्या हालचालीवर परिणाम करते, खांद्याभोवतीच्या स्नायूंना सूज येते व ते कणखर आणि कडक होतात. सुरूवातीस हालचाली दरम्यान सौम्य वेदना व अस्वस्थता असते पण लक्ष न दिल्यास हळूहळू त्रास वाढत जातो, खांद्याच्या ऊतींमध्ये कडकपणा विकसित होतो, ज्यामुळे हालचाली कमी होत जातात आणि वेदना व अस्वस्थता वाढते.
वय जितके जास्त तितका फ्रोजन शोल्डरचा जास्त धोका असतो. ४० ते ६० वयोगटातील लोकांना तसेच पुरुषांपेक्षा महिलांना फ्रोझन शोल्डरचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मधुमेह असलेल्या लोकांना फ्रोझन शोल्डर विकसित होण्याची शक्यता बाकींपेक्षा जास्त असते. अनियंत्रित मधुमेहामुळे कोलेजीनमध्ये बदल घडून येतात. साखरेमुळे कोलेजीनची घनता वाढते व चिकट होते. ही खांद्याची गतिशीलता मर्यादित करते व खांद्याला कडक करते. यामुळे सौम्य ते तीव्र वेदना जाणवू शकतात. दुर्लक्ष केल्यास खांदा हलवणे अगदीच अशक्य होऊ शकते. खांद्यातील रोटेटर कफ टेयर, मेंदूमध्ये होणारा पक्षाघात (स्ट्रोक) किंवा हातांच्या
शस्त्रक्रियेनंतर खांद्याच्या हालचाली होत नसल्यास, ही स्थिती उद्भवू शकते. थायरॉईड ग्रंथीतील हार्मोनमधील वृद्धी/कमतरता (हायथॉइरॉईड/हायपरथॉयराईड), हृदयांचे विकार, टीबी किंवा पार्किन्सन आजारांमुळेही फ्रोजन शोल्डर होतो.
फ्रोझन शोल्डरची लक्षणे तीन टप्प्यात विभागली जातात.
फ्रिझिंग स्टेज (०-६ महिने): पहिल्या टप्प्यात सुजेचे प्रमाण जास्त असते. ज्याला सायनोव्हायटिस म्हणतात. यात रुग्णाला अत्यंत वेदना जाणवतात. विशेषतः रात्री वेदना जास्त असतात.
फ्रोझन स्टेज (६ महिने- १२ महिने): दुसऱ्या टप्प्यात रुग्णांच्या हालचाली कमी होतात. सांध्यातील लवचिकता कमी होते व हळूहळू खांदा आखडू लागतो.
थोइंग स्टेज (१२ महिने- १८ महिने): या स्थितीत खांद्याच्या हालचालीत सुधारणा होते. अनेकवेळा खांद्यामधील हे दुखणे इतके तीव्र स्वरूपाचे असते की रात्री रुग्ण झोपेतूनही उठतात अथवा खांदेदुखीमुळे ते झोपू शकत नाहीत. खांद्याचे स्नायू कमजोर झाल्याने त्यांचे काम आजूबाजूचे स्नायू करू लागतात. रोजच्या जीवनातील कामांवर याचा परिणाम होतो.
फ्रोझन शोल्डरची प्रामुख्याने तीन लक्षणे असतात. वेदना, सांध्याभोवतीच्या स्नायूंमध्ये घट्टपणा आणि त्यामुळे हालचाली करताना होणारा त्रास. हात पुढून किंवा बाजूने खांद्याच्या पातळीपेक्षा वर उचलणे जमत नाही. हात बाहेरच्या बाजूला वळवणे, पाठीकडे नेणे, कोपरापासून हाताची हालचाल यावर बंधने येतात. केस विंचरणे, कपडे घालणे, आंघोळ करणे या सोप्या गोष्टीही कठीण दिसू लागतात. या लक्षणांच्या आधारे फ्रोझन शोल्डरचे निदान करणे सोपे होते.
फ्रोझन शोल्डरचा त्रास बरा होत असला तरी त्रास होण्याचे नेमके कारण व खांदा फ्रोजन शोल्डरच्या कोणत्या स्थितीत आहे यावर ते अवलंबून असते, जे लक्षात घेऊन डॉक्टर उपचार मार्ग सुचवतात. सुरूवातीस वेदनाशामक, सूज कमी करण्यासाठी गोळ्या दिल्या जातात. नंतरच्या स्थितीत सूज कमी होण्यासाठी व कॅप्सूल मोकळी करण्यासाठी इंजेक्शन दिले जाऊ शकते. तसेच योग्य प्रकारचे व्यायाम ज्याने ताकद व लवचिकता वाढेल ह्यासाठी फिजिओथेरपी सांगितली जाते. फिजिओथेरपीच्या व्यायामांनी स्नायूंमधील घट्टपणा कमी होऊन हालचाली सुधारतात. तसेच स्नायूंची ताकद वाढल्यावर दुखणे कमी होण्यासही मदत होते. कॅप्सूल सैल करण्यासाठी कॅप्सुलर स्ट्रेचेस, पेंडुलर एक्सरसाईज, मोबिलाइझेशन, रोटेटर कफ स्नायू ताकद वाढवण्यासाठीचे व्यायाम, थेराबॅंडचे व्यायाम सुचविले जातात, जे नियमितपणे केल्यास त्रास आटोक्यात येऊ शकतो. फिजिओथेरपी व व्यायांमानी आराम मिळत नसल्यास शोल्डर मॅन्युपुलेशन किंवा शेवटी शस्त्रक्रियेचा पर्याय सुचविला जातो.
काकूंना समजावून सांगत, घरी करता येणारे काही व्यायाम सुचवले व जवळच्या फिजिओथेरपिस्टला भेट द्यायला सांगितले. मागच्या कित्येक महिन्यांपासून दुखणे सोसत असलेल्या त्या काकूंनी आज मुद्दाम फोन करून आराम मिळाल्याचे कळवल्यावर काकूंसोबत मलाही अगदी समाधान वाटले.
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर