बिल्कीस शेख यांची प्रेरणादायी वाटचाल

‘कला कधी वाया जात नाही’ असे म्हटले जाते. बिल्कीस शेख यांच्या बाबतीत हे वाक्य तंतोतंत खरे ठरले आहे. आपल्या अंगभूत कलेला वाव देण्याची संधी त्यांना लग्नानंतर तब्बल १८ वर्षांनंतर मिळाली. या कलेचा वापर त्यांनी स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्यातून व्यवसायाची निर्मिती केली.

Story: तु चल पुढं |
25th November 2023, 03:38 am
बिल्कीस शेख यांची प्रेरणादायी वाटचाल

एकदा संसाराचा गाडा सुरू झाला की महिलांचा सगळा वेळ धुणी, भांडी, चूल, मूल यातच जातो. बऱ्याच वेळेला अनेक महिलांना या रोजच्या कामाबरोबर नवीन काहीतरी करावं असं सतत वाटत राहते. पण संसाराचा भार, लहान मुलांचा सांभाळ, वडिलधाऱ्यांची सेवा या सर्व व्यापामुळे त्यांना त्यांच्या स्वतःसाठी वेळ द्यावा अशी इच्छ असूनही काहीही करता येत नाही.

 मांडोप येथे राहणाऱ्या बिल्कीस शेख यांचेही काहीसे असेच झाले. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या बिल्कीस शेख यांची लग्नानंतरची १८ वर्षे मुलांचे संगोपन, कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळणे यातच निघून गेली. आजूबाजूच्या काम करणाऱ्या महिलांना तसेच नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे पाहून त्यांना आपणही काहीतरी काम करून मिळवते व्हावे असे नेहमीच वाटत असे. परंतु एकत्रित कुटुंब असल्याने व मुले लहान असल्याने घराबाहेर जाऊन नोकरी करणे त्यांना शक्य नव्हते.

मुले मोठी झाल्यावर मात्र स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा असे त्यांनी मनोमन ठरवले. या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी २००२ मध्ये मांडोपा येथे चार रस्त्यावरील एका भाड्याच्या दुकानात आपला शिवणकामाचा व्यवसाय चालू केला. या भाड्याच्या दुकानात त्या चांगल्याच स्थिरावल्या. दुकानात त्यांनी अनेक मुलींना साडी फॉल लावणे, शिलाई करणे यातून रोजगार प्राप्त करून दिला. 

बिल्कीस यांना शिवणकामाची आवड होती. शिवणकामाचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला होता. या शिक्षणाच्या जोरावर त्यांनी २००२ मध्ये मांडोपा येथील चार रस्ता येथे एक दुकान भाड्याने घेतले. सुरुवातीला शिवणकाम शिकवण्याचे वर्ग त्यांनी सुरू केले. हे शिवणकामाचे वर्ग त्यांनी नियमित दोन वर्षे चालवले. या वर्गात शिवणकाम शिकण्यास येणाऱ्या मुलींना त्यांनी शिवणकामात पारंगत केले आणि त्यातूनच पुढे शिवणकामाच्या व्यवसायाला सुरुवात करत महिलांचे चुडीदार, पंजाबी सूट, मुलींचे फ्रॉक, ब्लाऊज शिवण्याचे काम हाती घेतले.

तसे पाहिले तर चुडीदार, पंजाबी ड्रेस ही पूर्वी पासून चालत आलेली फॅशन आहे. आज फरक इतकाच, की या प्रकारात आज खूप विविधता आली आहे. पारंपरिक चालत आलेल्या या प्रकाराला नवा लुक देऊन कॉलेजकुमारी, तरुणी अथवा स्त्रिया देखील आजकाल असाच पेहराव घालणे पसंद करत आहेत. बिल्कीस शेख याही अशाच नवनवीन प्रकारचे व नव्या फॅशनचे चुडीदार, पंजाबी सूट शिवण्यात तरबेज आहेत.

महिलांच्या साडीवरच्या ब्लाऊज मध्येही आज असंख्य नवनवीन डिझाईन्स आले आहेत. नव्या फॅशनची महिलांची रुची ओळखून बिल्कीस या पारंपरिक ब्लाऊजला नवीन लुक देताना त्यात विविध फॅशनचे ब्लाऊज शिवतात व त्यांच्या या नवीन डिझाईन्सचे ब्लाऊज महिलांमध्ये लोकप्रिय होत असून महिलांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यांनी शिवलेले ब्लाऊज किंवा ड्रेस यांचे फिटिंग हे अगदी प्रमाणात असल्याने एकदा त्यांच्या दुकानात आलेला ग्राहक हा त्यांचा कायमचाच ग्राहक होऊन जातो.

२००२ साली बिल्कीस यांनी भाड्याचे दुकान घेऊन आपला शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला. दहा वर्षे या भाड्याच्या दुकानात खडतर मेहनत करताना त्यांनी या व्यवसायात आपला जम बसवला आणि २०१२ मध्ये त्यांनी मांडोपा येथेच स्वतःचे दुकान घेतले आणि या स्वतःच्या दुकानात त्यांनी आपला शिवणकामाचा व्यवसाय नव्या जोमाने सुरू केला. या दुकानात त्यांनी शिवणकामाच्या व्यवसायासोबत पंजाबी सुट्स, गाऊन्स, अनेक प्रकारच्या साड्या, लहान मुलांचे रेडिमेड ड्रेसेस विक्रीकरता ठेवले आहेत. त्यालाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

पावसाळ्यात बिल्किस रेनकोट शिवण्याचे काम घेतात. हे रेनकोट पणजी, म्हापसा, कुंकळी, वास्को येथील मार्केटमध्ये होलसेल भावात विक्रीसाठी पाठवले जातात. हे रेनकोट मुख्यतः शेतात काम करणारे शेतकरी, गांवठी भाज्या विकणाऱ्या स्त्रिया, मासे विक्रेते व लहानमोठी कामे करणारा कामगार वर्ग वापरतो. हे रेनकोट शिवण्यासाठी त्यांनी १० महिलांना आणि कटींगसाठी दोन महिलांना कामावर ठेवले आहे. तसेच त्यांच्या दुकानात शिलाईचे रोजचे काम करण्यासाठी, साडीला फॉल व बीडिंग करण्यासाठी पाच मुली ठेवल्या आहेत. या सर्वांना बिल्कीस शेख यांच्यामुळे रोजगार प्राप्त झाला आहे.

‘कला कधी वाया जात नाही’ असे म्हटले जाते. बिल्कीस शेख यांच्या बाबतीत हे वाक्य तंतोतंत खरे ठरले आहे. आपल्या अंगभूत कलेला वाव देण्याची संधी त्यांना लग्नानंतर तब्बल १८ वर्षांनंतर मिळाली. या कलेचा वापर त्यांनी स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्यातून व्यवसायाची निर्मिती केली. इतकेच नव्हे तर या व्यवसायातून त्यांनी इतरांना रोजगारही मिळवून दिला. बिल्कीस शेख यांची ही वाटचाल संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या स्त्रियांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

  • कविता अमोणकर
  • पत्रकार, लेखिका, कवयित्री