ओंजळीतले अश्रू

Story: देखणी लेखणी |
25th November 2023, 03:34 am
ओंजळीतले अश्रू

प्रवाहाच्या दिशेने जसा पाण्याचा वेग धावत असतो, तसेच तिचे आयुष्यही जणू धावतच होते. कोलमडून गेलेला ‌तिचा तो चेहरा आजही माझ्या डोळ्यांना नकळत घाबरवून जातो. तिची अन् माझी भेट अनपेक्षितपणे एका मंदिराच्या पायरीवर झाली. जसे काही देवानेच मला तिथे बोलवणे पाठवून तिची व्यथा ऐकण्यास सांगणे पाठवले होते. तशी मी अचूक तिच्यासमोर उभी झाली. तिचा तो निस्तब्ध, अश्रुभारित चेहरा माझ्याकडे कुतूहलानेच पाहत होता.

नित्यनेमाप्रमाणे आज मी मंदिरात गेले होते खरी. पण, देवदर्शनाच्या आधीच पायरीवरच माझी नजर त्या क्षीण अवस्थेत बसलेल्या स्त्रीकडे गेली व माझी पाऊले तिथेच स्तब्ध झाली. तिची केविलवाणी अवस्था माझ्या हृदयाला पाझरच फोडून गेली. मी तिच्यासमोर गेले अन् अलगद तिच्या खांद्यावर हाथ ठेवत तिच्या शेजारीच बैठक मारली आणि क्षणातच तिने मला मिठी मारली व ती ओक्साबोक्सी रडू लागली. तिच्या त्या मोत्यासारख्या अश्रूंनी माझा पदर आणि ओंजळ जणू मोत्यासमच लखलखत होती. तिला सावरत मी म्हटले, “अहो ताई काय झाले? जरा दमानं. का रडत आहात? मला सांगा ना काय आहे तुमचे दुःख? तुमचे मन हलके होईल. व्यक्त व्हा. अशा रडून रडून स्वतःला त्रास करून का घेता?” मी त्यांच्या गालावरील अश्रू पुसत त्यांना विचारले, “ताई कोण, कुठल्या आणि तुमचे नाव काय?”

तेव्हा दाटलेल्या कंठातून मंद स्वरात त्यांनी मला उत्तर दिले., “माझे नाव प्रीती. पण कशी सांगू मी माझी कहाणी तुम्हाला? माझ्या आयुष्याची प्रीतच हरवली आहे अन् मी अशी ही! माझ्याच माणसांमध्ये अप्रिय होऊन बसली आहे.” तिच्या शब्दांमधील तो थरकाप पाहून माझे कर्णही तिची व्यथा जाणून घेण्यास आतुरले होते. एवढ्यात ती म्हणाली, “तीन महिने झाले त्यांना आमच्यातून निघून गेल्यास.” हे तिचे शब्द ऐकताच अंगावर शहारे आले. असे वय तरी काय होते तिचे एव्हाना? कुठेतरी तिशीलाच आली होती ती अन् समजले की तिच्या नवऱ्याचे छत्र तिच्यावरून उडाले होते आणि तेच दुःख तिला वाळवीसारखे पोखरत होते. पुढे ती म्हणाली, “हे गेल्यापासून मी जगणेच विसरले आहे. जगत आहे ती फक्त माझ्या छकुल्याचा चेहरा पाहून, जे माझ्या नवऱ्याचे प्रतिबिंब आहे.”

ती एकटी नसून त्यांचा प्रतीक म्हणजे त्यांचं लेकरुपण आहे हे समजले. ती पुन्हा म्हणाली, “साडेतीन वर्षांचा माझा मुलगा प्रतीकच आता माझे सर्वस्व आहे. घरी सासुबाई, मी व माझा मुलगा असे कुटुंब आहे.” घराचा दिवाच जणू विझला होता त्यांच्या. कर्ताधर्ता पुरुषच काळाआड गेला होता. पुढील जीवनाचा रथ आता एकटीने कसा चालवायचा ही चिंता तिला जाळत होती. तिचे डोळे जणू‌.विहिरीला झरा फुटल्यासारखे वाहत होते आणि तिची ओंजळ अश्रूंनी चिंब भिजून गेली होती. दिवसही आता परतीला आला होता आणि दोघींनाही आपापल्या घरी परतायची वेळ झाली होती, तेव्हा जड पावलांनी आम्ही दोघींनी एकमेकींचा निरोप घेत घराची वाट धरली.

  • सोनाली च्यारी
  • लेखिका निसर्गोपचारक आहेत.