कधी कधी आपल्या जीवनात असे क्षण येतात जिथे आपले प्रयत्न थिटे पडतात. आपल्या हाती आता काहीच नाही अशी निराशा मनाला ग्रासते आणि आपण शक्तिहीन असल्यासारखं वाटतं. अशावेळी आपल्या मनाला आधार देते ती प्रार्थनेतील शक्ती. देव आपल्या पूर्णत्वाचा स्त्रोत आहे. त्याच्याशी जोडले जाण्याचा एक मार्ग म्हणजे केलेली प्रार्थना.
अगदी लहान असल्यापासून आपली आई किंवा आज्जी आपले हात जोडून आपल्याला म्हणायला शिकवते - ‘देवबाप्पा मला सुखात ठेव’ किंवा ‘चांगली बुद्धी दे’. ती सवय मोठेपणी मनाला लागलेली असेल तर, आपल्याला सहाय्य करणारी अशी कुणीतरी मोठी शक्ती आपल्यासोबत आहे, जी आपलं म्हणणं ऐकते आहे हा विश्वास वाटत रहातो. मन निश्चिंत होतं. तो आपला पाठीराखा आहे, तो नक्कीच आपल्याला मदत करेल हा विश्वास, ही खात्री प्रार्थनेत असते. सगळं काही संपलंय असं वाटत असतानाही ज्याला पकडून माणूस पुन्हा उभा राहतो, तो चिवट धागा असतो प्रार्थनेचा.
प्रार्थना म्हणजे देवापुढे, मूर्तीपुढे हात जोडून केलेली विनवणी, देवाची आळवणी. जो प्रत्येक भाविक करत असतो. ती कधीही, कुठल्याही वेळी, कुठल्याही परिस्थितीत केली जाते. प्रत्येक वेळी ती स्वतःसाठीच केली जाते असं नाही, कधी कधी ती दुसऱ्यासाठीही असते. तिथे देवाधर्माचा, जातीपंथाचा कसलाच लवलेश नसतो. देव माना किंवा मानू नका पण त्याच्याकडे काही मागणं ही प्रार्थना होय. कधी कधी गोष्टी आपल्या कक्षेच्या बाहेरच्या असतात अशा वेळी त्या शक्तीला शरण जाण्यासाठी केलेली याचना म्हणजे प्रार्थना असते.
प्रार्थना हा सकाळ-संध्याकाळ करायचा केवळ उपचार नसतो तर मनापासून त्यात आपण शिरलो की ती एक अनुभूती असते, जी मनाला एक शांती किंवा सुकून मिळवून देते. अडचणीतून बाहेर यायला मदत करते. आव्हानाचा सामना करायची शक्ती मिळवून देते. शाळेत असताना पाचवीपर्यंत रोज सकाळी आधी प्रार्थना म्हणायची, मग क्लासमध्ये जायचं अशी शिस्त होती. मनाचे श्लोकही म्हणावे लागत. पुढे त्यात खंड पडला. गुड्डी सिनेमा पाहिल्यावर त्याची आठवण ताजी झाली. पुढे सवयीने देवासमोर नतमस्तक होणं हा संस्कार प्रार्थनेने घडवला.
आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. त्या टाळणं आपल्या हातात नसतं, नैसर्गिक आपत्ती, आजार, वादळ, आग यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. अशावेळी सर्व शक्तिनिशी त्यांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करणं गरजेचं असतं. प्रार्थनेच्या रूपात आपला आपल्याशी आणि देवाशी संवाद साधला जातो. मनातले भाव बदलण्याचा हा एक उपाय आहे. विचारात एक सकारात्मकता येते. दया, करुणा, भक्ती, प्रेम निर्माण होते. कधी कधी तर प्रार्थनेचे बोल डोळ्यात अश्रू उभे करतात ज्यामुळे मनावरचा ताण नाहीसा होतो. मन हलकं झाल्यासारखं वाटतं. मग ती प्रार्थना तासभर असो, की मिनिटभर हे महत्त्वाचं नाही. ती किती मनापासून केली हे महत्त्वाचं. दरवेळी काही मागण्यासाठीच प्रार्थना केली जाते, असं नाही तर त्याने जे जे दिले आहे त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करायची, त्याला धन्यवाद द्यायचे. मनाचा अहंकार नष्ट होतो. मनाचं सामर्थ्य वाढतं. दुसऱ्याची ईर्षा, द्वेष, घृणा हे सारे विकार दूर व्हायला मदत होते.
बहुतेक सर्व धर्मात प्रार्थना असते. काही ठिकाणी ती सामुदायिकरित्या म्हटली जाते तर काही ठिकाणी एकांतात, एकट्याने म्हटली जाते. चर्चमध्ये एका सुरात म्हटलेली प्रार्थना एका गूढरम्य वातावरणात घेऊन जाते. नमाज पढणारा मुस्लिम त्या वेळी हातातली सर्व कामं बाजूला ठेवून प्रार्थनेला प्राधान्य देतो. मंदिरातली आरती, भजन भक्तिभावाने भारावून टाकत असतं. प्रार्थना भक्ताला अंतर्मुख करणारी असते. काही लोक जेवणापूर्वी हात जोडून प्रार्थना म्हणतात तर काही झोपायला जाण्यापूर्वी म्हणतात. नाटकाच्या सुरुवातीला ईशस्तवन असतं. कधी कधी अडचणीच्या वेळी निराधार, असहाय्य अशी परिस्थिती असेल आणि माणूस प्रार्थना करतो ‘कुणाची तरी मदत मिळू दे.’ अशावेळी कुणीतरी त्याच्या मदतीला धावून येतो, तर देवाने त्याची प्रार्थना ऐकली असा त्याचा अर्थ तो लावतो. देव कोणत्याही रूपात येऊन त्याची मदत करू शकतो यावर त्याचा विश्वास बसतो. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ याचा प्रत्यय येतो. प्रार्थना अशा प्रकारे देवाशी जोडायचं काम करते.
प्रार्थनेत आपलं शरीर, मन, वाणी आपल्या देवतेशी एकरूप होऊ पाहतं, ज्याचं मूळस्थान असतं हृदय. केवळ समर्पित भावनेने आणि पवित्र मनाने केलेली प्रार्थना ही फलदायी ठरते. आपण दुबळे आहोत, आपल्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ अशी शक्ती आपल्यावर नियंत्रण करणारी आहे, आपले इष्ट साध्य होण्यासाठी आपण त्याच्यावर अवलंबून आहोत, या जाणिवेतून प्रार्थना निर्माण होते. भाषा, चाल, सुर, लयबद्धता जरी भिन्न भिन्न असली तरी ती हृदयापासून परमेश्वराला मारलेली हाक असते. आपल्या धर्मानुसार मंत्र हा बुद्धीप्रधान, ध्यान हे अवधानप्रधान, पूजा ही कर्मप्रधान तर प्रार्थना ही भावप्रधान असते. जसा ज्याचा भाव तशी त्याची प्रार्थना आणि तिचे फळ. प्रार्थना म्हणजे आपल्या मनाला चार्ज करणारी शक्ती.