रानफूल

माणुसकीचे आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारा, गोव्यातील एका बसप्रवासाचा अनुभव. या धावपळीच्या आयुष्यात, फुलं गुंफणाऱ्या हातांच्या आणि साध्या रानफुलांच्या सौंदर्याचे महत्त्व सांगणारा एक हृदयस्पर्शी प्रवास.

Story: ललित |
28th November, 09:49 pm
रानफूल

'ऊन मी म्हणत होतं...' वगैरे आपण कथांमध्ये वाचतो ना, अगदी तशीच टळटळीत दुपार होती. ऐन मे महिन्यातली. मी फोंड्यातून बसनं पणजीला निघाले होते. एरवी या मार्गावर कदंबच्या (स्टेट ट्रान्सपोर्ट) छान, वातानुकूलित बससेवा आहे. पण दुपारच्या त्या आडनिड्या वेळेला प्रायव्हेट बसला पर्याय नसतो. गोव्यात या प्रायव्हेट बसचं फार आहे. सगळ्या मार्गांवरून या जोरदार धावत असतात. त्यांची कदंब बसेस बरोबर आणि आपसातही स्पर्धा चालू असते. यासाठी त्यांचा जोरात बस चालवून पुढच्या बसचा पॅसेंजर पटकावण्यासाठी आणि मागच्या बसला चुकूनही पुढे न जाऊ देण्याची जणू शर्यत लागलेली असते. या बस माणसांनी खचाखच भरलेल्या असतात हे वेगळं लिहायला नकोच. कंडक्टर लोकांना मागे ढकलून नवीन लोकांना आत कोंबण्यात व्यग्र असतो. गाडी सुटली की, डोकं बाहेर काढूनच तो उभा असतो. दिसला पॅसेंजर की थांबवा बस असं त्यांचं धोरण असतं.

अशा बसमधून जाणं म्हणजे वैतागच, त्यात ऊन मी म्हणत असतानाच्या दुपारी जाणं म्हणजे अगदी अग्निपरीक्षाच. तसा नाइलाजच असल्यामुळे मी घरापासून बसस्टॉपवर चालत येण्यापासून या अनोख्या प्रवासाची सुरुवात केली. बसस्टँडवर पोहोचले तर बस लागली होती, मी आत जाऊन बसलेही; पण बाहेर कसलीशी भांडणं झाली होती. बस सुटत नव्हती. अखेर मी उतरून खाली आले आणि दुसरी बस येते का वाट बघायला लागले . तोवर भांडण मिटलं असावं. कंडक्टर मला आत बसण्याविषयी सांगायला आला. “फार गर्दी आहे, मी दुसऱ्या बसनं जाईन.” मी जरा तोऱ्यातच म्हटलं. जणू माझ्याविना त्याचं काहीतरी अडलंच असतं. “पणजीला उतरणार ना? पुढे बस केबिनमध्ये.” तो वाटाघाटी करायला लागला. मी पटकन आत चढले आणि केबिनमध्ये शिरले. माझ्या शेजारी एक आजीबाई बसल्या होत्या. बस सुटली आणि शेजारच्या एका टॅक्सीला घासली. झालं! कोणत्या मुहूर्तावर घर सोडलं होतं कोण जाणे! टॅक्सी ड्रायव्हर, कंडक्टर आणि बस ड्रायव्हर खाली उतरून चांगले भांडले. भर दुपारी भरपूर शिव्यांची देवाणघेवाण झाली. दहा मिनिटांनी त्यांच्यात तह झाला आणि शेवटी एकदाची बस सुटली.

आता दहा मिनिटं उशीर झाल्यामुळे मागच्या बसला पुढे जाऊ न देता सगळे वाटेतले पॅसेंजर कसे मिळवायचे यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. केबिनमध्येच बसल्यानं मी या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार झाले होते. फोंड्यात दोन बसस्टँड आहेत. एक जुना आणि एक नवीन. नवीन बसस्टँडवर पोहोचेपर्यंत ड्रायव्हर कुणातरीला फोन करून सतत बोलत होता. गाडी भलतीच वेगानं चालवत होता. त्याच्याकडे निरखून बघितल्यावर मला त्याचे डोळे तांबरलेले दिसायला लागले. त्याची भाषा कोकणी असली, तरी ती पटकन कळणारी नव्हती. मधूनच तो खास गोवन हिंदीतूनही बोलत होता. वेगानं गाडी नवीन स्टँडमध्ये गेली. ड्रायव्हर एकीकडे फोनवर बोलत होताच, तो पटकन खाली उतरला. कंडक्टर लोकांना आत कोंबण्याच्या कामाला लागला. मी केबिनमध्ये सुरक्षित असल्यानं खूश होते. शेजारच्या आजीनं पदराखाली ठेवलेल्या प्लास्टिक पिशवीतल्या मोगऱ्याच्या कळ्या काढल्या. त्या घमघमाटानं जीव सुखावला. ड्रायव्हर कुणाशीतरी बोलून परत आला की त्याच्या जागेवर बसला. कंडक्टरशी त्याचं काहीतरी शिवराळ बोलणं झालं आणि तो गाडी सुरू करणार इतक्यात आजीबाईंनी त्याच्याकडे पेपर मागितला! “वाचायला?” त्यानं आश्चर्यानं विचारलं.

आजीबाईंनी पिशवीतल्या कळ्या दाखवल्या. यावर तो राकट, शिवराळ भाषेत बोलणारा, तांबरलेल्या डोळ्यांचा ड्रायव्हर काय बोलेल याची मला उत्सुकता लागली! दुर्लक्षच करेल असं वाटलं, इतक्यात त्यानं कंडक्टरकडे पेपर मागितला. त्यानं पेपर नाहीये सांगितल्यावर तो आजीबाईंकडे बघून खांदे उडवून पुढे जाईल असं वाटलं. आधीच भांडून झालं होतं, त्यामुळे उशीर झाला होता, पॅसेंजर पटकावण्याची महत्त्वाकांक्षा समोर होतीच. त्यात आणखी कुठे पेपर शोधत बसणार? पण नाही. तो सगळ्या लोकांना तिष्ठत ठेवून परत खाली उतरला. स्टँडवरच्या टपरीवरून पेपर घेतला, आजीला दिला आणि गाडी सुरू केली. पुढच्या प्रवासात त्यानं घेतलेल्या वेगाचं, केलेल्या फोनाफोनीचं आणि खचाखच भरलेल्या बसचं काही बोलायलाच नको.

आजीनं एव्हाना त्या कळ्या नीट गुंडाळून त्यांना परत पदराखाली घेतलं होतं. त्यांचे सुरेख वळेसर करून त्या पणजीत विकणार म्हणून त्या कळ्यांची काळजी घेत होत्या हे उघडच होतं. क्षणभर त्यांचा हातभार बांगड्या घातलेल्या, जाडसर बोटांचा कळ्यांना जपणारा हात बघितला. कळ्यांना ऊन लागू नये म्हणून पेपर आणून दिलेला ड्रायव्हरचा काळा, केसाळ, पुरुषी राकट हात बघितला. डोळे बंद करून, मान मागे टेकवून बसले, तेव्हा डोळ्यांसमोर सुंदर गजरा आला. टपोऱ्या कळ्या नुकत्याच उमलत होत्या. त्यांचं हे फुलणं नैसर्गिकच, पण त्यामागचे असे असंख्य हात? एका गजऱ्यात किती गोष्टी दडलेल्या असू शकतील? गजरा माळताना आपण विचारसुद्धा करत नाही त्या फुलांच्या प्रवासाचा असा विचार मनात येताच अपराधी वाटलं. किती सहज टाकून देतो आपण सुकलेला गजरा दुसऱ्या दिवशी? स्वतःचा रागच आला.

गोव्यात गजऱ्यांचं, फुलांचं फार आहे. माझ्या आधीच्या पिढीच्या बायकांना कुठेही जाताना डोक्यात फूल हवंच. माझं लग्न झालं, त्या वर्षी मी हौसेनं वटपौर्णिमेची पूजा केली होती. नऊवारी नेसून. मनाप्रमाणे आवरून पूजेला बसले तेवढ्यात काकींनी हळूच मागे येऊन अंबाड्यात फूल खोचलं. उगीच कुजकट बोलणं नाही, सगळं आवरलं, पण फूल विसरली असं जाणवू देणंही नाही. फुलासारखंच अलगद त्यांची ती कृती. ते माझ्या लक्षात राहिलं. आता मी पूजा करत नाही, पण सासरी काही समारंभ असला की कधी आईंकडून गजरा करून घेते तर कधी बागेतला गुलाब काढून माळते. मी तशी बंडखोर. 'फूल माळ अंबाड्यात.' असं सांगितलं असतं तर एरवीही गजरबिजरा माळणं सोडून दिलं असतं.

इथे फुलं, गजरे महत्त्वाचे आहेत; पण त्यांना फुलांच्या जातीचं बंधन नाहीये. निसर्गाचं देणं भरभरून लाभलेल्या गोव्यात मोगरा, सुरंगी, बकुळ, जाई, जुई अशा सुगंधी फुलांचे गजरे ओळीनं आठ महिने मिळतात. उरलेले चार महिने अबोलीचे देखणे गजरे नाहीतर शेवंतीच्या नाजूक वेण्या! अनंत, गावठी गुलाब, चाफा अशा सुगंधी फुलांचंही अप्रूप फार. पण झेंडू, शंकासूर, बिनवासाची तगर ही फुलंही काही वर्ज नाहीत. अंबाड्यात जास्वंद मिरवणाऱ्या बायकाही मी बघितल्या आहेत!

तबल्याच्या भोवती जी वीण असते, तिला गजरा म्हणतात. अनिल अवचट यांच्या एका पुस्तकात हा उल्लेख वाचला होता. त्यांना हे नाव फार रोमँटिक वाटतं, असं त्यांनी लिहिलं होतं. मला मग अंबाड्यातलं जास्वंदही रोमँटिक वाटायला लागतं!

परवा एका प्रदर्शनात आम्ही सगळ्या बायका कोंडाळं करून बसलेल्या बघून, गजरे विकणारी एक बाई आत शिरली. पानावर जाईच्या कळ्यांचे छोटे गजरे केले होते. दिवसभर या कळ्या डोक्यात घालायच्या आणि तिन्हीसांजेला त्या उमलून आल्या की त्यांच्या सुगंधानं प्रसन्न व्हायचं. रात्रीही उशाला गजरा ठेवून द्यायचा. मी अनेकदा हा अनुभव घेतला आहे. तिला बघितलं आणि पर्समध्ये क्लिप आहे का ते नकळत शोधायला लागले. हाताला पटकन क्लिप लागली नाही, तेवढ्यात गर्दी लोटली. तीस रुपये किंमत सांगितली होती तिनं एका गजऱ्याची म्हणून सुटे बाजूला ठेवले. पुस्तकं दाखवताना हळूच तिच्या हातांकडे लक्ष गेलं. लांब, पातळ बोटं. नखं काळपट झालेली. केळीचा दोर घेतात गजरे गुंफायला. त्यामुळे होत असतील. बरोबर आज संध्याकाळी फुलतील अशा कळ्या खुडण्यापासूनचा प्रवास, त्यात त्या लांब बोटांची हालचाल आणि नखात उतरलेला काळा रंग. पुस्तकं दाखवताना, लोकांशी बोलताना, पैसे घेताना मनात काय काय विचार येत राहिले. माझ्यासमोर गर्दी असतानाच तिचे गजरे संपले. ती बाहेर पडायला पाठमोरी झाली आणि तिच्या अंबाड्यात तिनं माळलेली दोन पिवळी गवतफुलं छान हलली. जाई विकणाऱ्या बाईच्या डोक्यात गवतातली फुलं होती. मला एकदम तो बस ड्रायव्हरचं आठवला! जे हात रानफुलांचं सौंदर्य इतक्या मायेनं जपू शकतात, त्यांनी इतके सुंदर गजरे केले, तर त्यात नवल ते काय?

तीन दिवसांचं प्रदर्शन झालं. त्या दिवशी गजरा घ्यायचा राहिला. ते बाजूला ठेवलेले तीस रुपयेसुद्धा सुटे देताना संपले. माझ्या समोरच्या स्टॉलवर खाद्यपदार्थ होते. त्यांच्याकडून काहीतरी घेतलं होतं, त्याचे सुटे पैसे द्यायचे होते. शेवटच्या दिवशी सगळं आवरून निघताना त्यांनी घाईनं हातात पैसे दिले. मी न बघताच पटकन खिशात ठेवले.

घरी येऊन खिसा रिकामा केला, तर ते बरोबर तीस रुपये होते. ते बाजूला ठेवताना अगदी नकळतच माझं लक्ष माझ्या बोटांकडे गेलं...


- मुग्धा मणेरीकर