मुंबईतील एका पापभिरू कुटुंबात व्यसनाने घातलेल्या विळख्याची ही सत्यकथा. जिद्द, समुपदेशन आणि मुक्तांगण संस्थेच्या बळावर सुदेशला आपले माणूसपण पुन्हा कसे मिळाले, याची गोष्ट.

काही वर्षांपूर्वी मुक्तांगणमध्ये गेले होते पुण्याला. आमच्या यजमानांना समाज कार्याची थोडी आवड. त्यात पक्के मुंबईकर त्यामुळे कुठे ना कुठे, कसल्या ना कसल्या संघटनेशी, संस्थेशी संबंध हा येतोच. तशी मुंबई ही सोन्याची नगरी. आणि त्या सोन्याच्या हवेपोटी अनेकजण आपली स्वप्ने घेऊन मुंबईत येतात. काही यशस्वी होतात तर काही अपयशाच्या गर्तेत असे काही गटांगळी खातात की मग वर उठतच नाही. आणि मग सुरू होते व्यसनाधीनता. आलेले अपयश, साचलेले दुःख हलके करण्यासाठी आधाराची गरज पडते. पण यावेळी हा आधार आपलेपणाचा नसतो तर तो असतो दारूचा, ड्रग्सचा. पार अजगरासारखा विळखा घालतो तो आणि मग सुरू होते एक भयाण वास्तव. असो!
ह्यात जास्त पडायचे नाही, पण हा विषय यायचे कारण की ‘मुक्तांगण’ व्यसनी तरुणांना जिद्द देणारी, उमेद देणारी, परत या संसारात उभे करण्यास मदत करणारी एक यशस्वी संस्था. महाराष्ट्रात त्यांच्या अनेक शाखा आहेत, कार्यकर्ते आहेत.
तर पुण्याच्या संस्थेत जायचे कारण म्हणजे आमचा सुदेश. सुदेश गाला आमच्या यजमानांचे जवळचे मित्र रमणभाई गाला यांचा एकुलता एक मुलगा. आमचे घरचे संबंध गाला कुटुंबियांशी. मूळचे राजस्थानी पण कैक वर्षे महाराष्ट्रात अगदी मुंबईतच गेली. भाषाही मराठी मिश्रित गुजराथी अगदी. स्वतः रमणभाईंचा कपड्यांचा होलसेलचा धंदा होता. अगदी पापभिरू माणूस. पत्नी नीताबेन तर अगदीच गृहकृत्यदक्ष. घरात लसूण सुद्धा चालत नसे. सुदेश हा त्यांचा धाकटा मुलगा. मोठ्या दोन मुली झाल्यावर सुदेश. लहानपणी तसा दिसायला गोरा गोमटा, सुदृढ बालक म्हणा हवेतर. चाळकऱ्यांत नातेवाईकांत अगदी लाडका. सगळे त्याला खेळवत, उचलून फिरायला नेत लहान असताना वगैरे. अभ्यासातही प्रगती तशी चांगली होती. हळू हळू मोठा होऊ लागला सुदेश. रमणभाईंना खूप अपेक्षा मुलाकडून. त्यात शेंडेफळ लाडही भरपूर घरात.
सगळेच जर पोषक असेल तर काय होणार तेच झाले जे इतरांचे होते. नववी दहावीच्या सुमारास आमच्या सुदेश भाऊंना वाईट संगत जडली. खिशात पैसे असत मग ग्रुप जमला. हॉटेल, मग बार, विडी, सिगारेट. अर्थात घरात कळत नव्हते त्यावेळी तरी. पण चर्चा कानावर येत असे. एक दोनदा रमणभाईंना सांगून पाहिले पण मुलावर पूर्ण विश्वास. त्यामुळे “असं होयेगाच नई” असे म्हणून रमणभाईंनी उडवून दिले त्यांना. एस.एस.सी. ला तसे कमी मार्क्स मिळाले पण कॉलेजात ॲडमिशन झाली. मग काय पंखच फुटले सुदेशला. नवे मित्र, नवी व्यसने जोरात चालू. आणि एक दिवस रमणभाईंना फोन आला पोलीस स्टेशनवरून. ताबडतोब बोलावून घेतले. सुदेश ड्रग्सच्या आहारी गेला होता. नशेत ‘टुन’ होता. पोराची दशा पाहून काळीज पिळवटले बापाचे. नीताबेननी तर आजारपणच धरले. सुदेशला मग बाल संगोपन केंद्रात ठेवले थोडे दिवस. जेणेकरून तो सुधारेल. अर्थात ड्रग्जच्या आहारी गेलेली मुले जरा अति हुशार असतात. सुदेशही त्यातलाच. आव आणला त्याने सुधरल्याचा, सगळे भुलले. घरी आणला त्याला. रमणभाईंनी त्याचे कॉलेज परत चालू केले. पण पॉकेट मनी बंद करून फक्त प्रवासापुरतेच पैसे देत असे. सगळ्यांना वाटत होते की सुदेश सुधारला म्हणून. पण हळू हळू लक्षात येऊ लागले की घरातून कपाटातील पैसे कमी होत आहेत म्हणून. सुदेशवर लक्ष ठेवले, तर खरेच पैसे चोरताना सापडला सुदेश. आता मात्र बापाच्या पायाखालची जमीन सरकली. पण करणार काय? सुदेश बेफाम झाला होता. घरातून पैसे मिळेनात तर बिनधास्त उधाऱ्या करू लागला. इतर व्यसनांपेक्षा ब्राऊन शुगरचे व्यसन थोडे वेगळे असते. एकदा तलफ आली की मग राहवत नाही. सुदेशलाही तसेच झाले होते. खूप समजवायचा प्रयत्न केला पण सुधारणा शून्य. असेही नव्हे की सुदेशला कळत नव्हते. आपण वाईट काम करतोय याची जाणीव त्याला झाली होती पण बराच उशीर झाला होता. तलफ आली की सुदेश वेडापिसा होई. मग कशाही प्रकारे तो आपली तलफ भागवत असे.
आम्ही जवळून हा तमाशा पाहत होतो. एक साधे पापभिरू घर अशा दुर्दशेच्या फेऱ्यात सापडले होते. त्या धक्क्याने नीताबेन आजारी पडल्या. आता मात्र काहीतरी पावले उचलणे गरजेचे होते. सुदेशला समोर बसवून खूप समजावले. अर्थात माझा समुपदेशनाचा अभ्यास उपयोगी पडला. सुदेशाचे मतपरिवर्तन होऊ लागले. पण त्याने फरक पडला नसता. शेवटी यजमानांच्या ओळखीने मुक्तांगणमध्ये त्याला दाखल केले. पहिल्यांदा जाण्यास तयार नसलेला सुदेश गेला बाबा एकदाचा पुण्याला. तिथल्या कार्यकर्त्यांनी खूप धीर दिला आम्हाला. सुदेशला खूप सांभाळले त्यांनी. उपचार, योग, सततची व्याख्याने यांचा चांगला परिणाम होऊ लागला. त्यात जवळजवळ वर्षभर दूर राहिला सुदेश व्यसनापासून. सुरुवातीस खूप त्रास झाला त्याला पण त्याने आता यातून बाहेर पडायचे ठरवलेच होते. आईच्या गंभीर आजाराचा त्याच्या मनावर परिणाम झाला हो. हळू हळू सुधारू लागला तो. या प्रकारात मन कणखर असणे फार महत्त्वाचे आहे. सुदेशचे उपचारांना खूप सहकार्य मिळाले. एक वर्षाने फोन आला आम्हाला मुक्तांगणमध्ये येण्याचा. रमणभाई परिवार व आम्ही गेलो तिकडे. मोठा कार्यक्रम होता, स्टेज सजले होते. संस्थेचा वर्धापन दिन आज. सुरुवात झाली कार्यक्रमाला. एक गोरापान, दणकट दिसणारा तरुण स्टेजवर आला सूत्रसंचालन करायला. चेहरा ओळखीचा दिसला. निरखून पाहिले, होय! तोच सुदेश आमचा. “अरे! हा तर आपला सुदेश आहे!” रमणभाई आनंदाने उद्गारले. खूप वर्षांनी आपल्या रक्ताचा मुलगा माणसात आलेला पाहत होते ते. कार्यक्रम संपल्यानंतर सुदेश सर्वांना भेटला. एक राक्षस माणसाळला होता. सुदेशने पाय धरले माझे.
आजही सुदेश संस्थेतच आहे पण रुग्ण म्हणून नव्हे, तर संस्थेचा पूर्णवेळ पगारी कार्यकर्ता म्हणून. संस्थेतल्याच एका सुधारलेल्या कार्यकर्त्या मुलीशी विवाह झाला त्याचा. सुखी आहे. आणि रमणभाई आणि नीताबेनही मस्त आहेत अगदी. महिन्यातून एकदा जातात लेकाला, सुनेला भेटायला. परवाच पेढे घेऊन आले होते आनंदाची गोड वार्ता सांगायला. आता कसली ती तुम्ही ओळखा!

- रेशम जयंत झारापकर
मडगाव, गोवा.