पलक अरोरा आणि तिचा ‘मिलियम’

कोरोना काळात कुटुंबाच्या आरोग्याची चिंता आणि बाजारातील पर्यायांचा अभाव यामुळे पलक अरोराने ‘मिलियम’ ब्रँड सुरू केला. मिलेट्सवर उभे केलेले तिचे हे स्टार्टअप आरोग्य आणि शाश्वतता जपते.

Story: इतिहास घडवणाऱ्या स्त्रिया |
28th November, 09:42 pm
पलक अरोरा आणि तिचा ‘मिलियम’

लक अरोराची कहाणी म्हणजे तरुण वयात जिद्द, विज्ञान आणि माणुसकीच्या बळावर उभारलेली एक हृदयस्पर्शी यशोगाथा आहे. कोरोनाच्या कठीण काळात, जेव्हा तिच्या वडिलांच्या आरोग्याच्या समस्येने तिला गांभीर्याने विचार करायला लावले, तेव्हा पलकला आहाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज जाणवली. बाजारात पटकन तयार होणारा आणि त्याच वेळी आरोग्यदायी असा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. हीच गोष्ट तिच्यासाठी एका मोठ्या संधीची नांदी ठरली.

मग काय, पलक स्वतःच प्रयोग करू लागली. तिच्या फरीदाबादमधील घराची गच्ची आणि स्वयंपाकघर तिची छोटीशी प्रयोगशाळा बनली. अत्यंत छोट्या प्रमाणावर तिने मिलेट्सपासून डोसा मिक्स, उपमा आणि पोह्याचे मिश्रण तयार केले. घरातील लोकांनी अत्यंत प्रेमाने तिची चव पाहिली, तिच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन तिला सतत मिळत राहिले आणि याच प्रेमळ वातावरणात, एका छोट्याशा स्वयंपाकघरातून ‘मिलियम’ ब्रँडची बीजे अत्यंत हळुवारपणे रोवली गेली.

पलकने फूड टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले होते आणि तिला अन्न प्रक्रियेसंदर्भातील सखोल ज्ञान होते. मिलेट्समधील अँटी न्यूट्रिएंट्स कसे काढून टाकावे, यासाठी सोकिंग, स्प्राउटिंग, ड्रायिंग आणि रोस्टिंग यांसारख्या पारंपरिक आणि वैज्ञानिक पद्धतींचा वापर तिला चांगलाच ठाऊक होता. आज तिच्या ‘मिलियम’ स्टार्टअपने १५ हून अधिक उत्कृष्ट उत्पादने तयार केली आहेत. मिलेट नूडल्स, पास्ता, रागी सूप, रेडी टू कुक डोसा मिक्स, पोहे, पॅनकेक मिक्स वगैरे. महत्त्वाचे म्हणजे, हे सगळे पदार्थ केवळ १० मिनिटात तयार होतात आणि कोणत्याही कृत्रिम प्रिझर्व्हेटिव्ह विरहित असतात.

सुरुवातीला डॅनोन या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असतानाच तिने हा ब्रँड सुरू केला, पण जेव्हा ‘मिलियम’ला पूर्णवेळ लक्ष देण्याची गरज वाटली, तेव्हा तिने मोठ्या पगाराची नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. आज तिची फरीदाबादमधील युनिट दरमहा ८ टन उत्पादन करते आणि त्याशिवाय २१ टन रेडी-टू-ईट उत्पादनंही ती मार्केटमध्ये यशस्वीपणे देत आहे.

पतिच्या या यशाच्या मुळाशी एक भावनिक धागा आहे. तो म्हणजे तिचा आपल्या शेतकरी बांधवांवरचा विश्वास. तिने अनेक मिलेट्स उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संबंध जोडले, ज्यामुळे त्यांना चांगला दर, वेळेवर पैसे आणि नियमित मागणी मिळवून देणे शक्य झाले. ही केवळ व्यवसायाची वाढ नसून, एका सामाजिक बदलाची सुरुवात आहे.

आज तिच्या ब्रँडची मासिक उलाढाल ३ लाख रुपये आहे, जी सणासुदीच्या काळात ७–८ लाखांपर्यंत पोचते. वेबसाइट, इव्हेंट्स, व्हाईट लेबलिंग, हॉटेल किचन करारांद्वारे अशा अनेक मार्गांनी ती विक्री करते. तिच्या टीममध्ये ८ जण आहेत आणि लवकरच नवीन उत्पादन युनिट सुरू होणार आहे, जिथे स्थानिक महिलांना रोजगार देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याची तिची योजना आहे.

पलक अरोराने केवळ हेल्दी फूडचा व्यवसाय सुरू केला नाही, तर एका पर्यावरणस्नेही आणि लोकाभिमुख उपक्रमाला मायेचा आकार दिला आहे. तिची ही वाटचाल नव्या पिढीसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे, जिथे उद्दिष्ट फक्त नफा नसून एक निरोगी आणि शाश्वत समाजनिर्मिती आहे.


- स्नेहा सुतार