हडळीच्या ताब्यात राजकन्या

राजा अंगध्वजाची लाडकी कन्या मंदाकिनी फुलांच्या नादात जंगलात हरवली. भयानक अंधारात तिची गाठ एका क्रूर हडळीशी पडली. राजा अंगध्वजाने आपल्या पराक्रमाने तिची सुटका केली.

Story: साद अदृश्याची |
28th November, 09:20 pm
हडळीच्या ताब्यात राजकन्या

फार, फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अंगध्वज नावाचा एक राजा होता. राजाला मंदाकिनी नावाची अतिशय सुंदर व सुलक्षणी कन्या होती. मंदाकिनी छोटी असतानाच महाराणी म्हणजेच तिची आई परलोकवासी झाली होती. मंदाकिनीला तिच्या आजीने, वैरण्यवतीनेच, वाढवले होते. तिला वेगवेगळ्या प्रकारची फुले वेचून, वेणीत माळायला खूप आवडायची.

एक दिवस अशीच मंदाकिनी फुले वेचत होती. सुंदर जांभळी, पिवळी फुले वेचत वेचत कधी ती जंगलात पोहोचली. तिच्याबरोबर सहा सख्याही होत्या. फुले वेचत वेचत कधी जंगलात सगळेजण पोहोचले, कळलेच नाही. पाहता पाहता मंदाकिनीला खूप खूप फुले मिळू लागली.

आता संध्याकाळचा उजेड संपत चालला होता. पूर्ण जंगलाला रात्र आपल्या कवेत घेण्यास सज्ज झाली होती. मंदाकिनीला आपल्या सख्यांसोबत लवकरात लवकर जंगलातून बाहेर पडायचे होते; पण वाटच सापडत नव्हती. गडद काळोख पडला होता. भयानक जंगलात झाडांच्या आक्राळविक्राळ राक्षसाप्रमाणे भल्यामोठ्या आकृत्या, सावल्या बघून मंदाकिनी व तिच्या मैत्रिणी घाबरल्या होत्या. जंगलात आक्रमक, विचित्र जनावरे मोठ्याने रडण्याचा आवाजही येत होता. हे सगळे पाहून सख्या पुरत्या घाबरल्या होत्या. खूप वेळ लोटल्यामुळे त्या तहान व भुकेने व्याकूळ झाल्या होत्या.

राजकुमारी अजून महालात पोहोचली नाही ही बातमी अंगध्वजाला समजली होती. तो स्वतः सैनिकांसह जंगलात जाण्यास निघाला. भुकेने हैराण झालेल्या मंदाकिनीला व तिच्या मैत्रिणींना एक चिंचेचे झाड दिसले. झाडावर खूप चिंचा होत्या. चिंचा खाऊन भूक तरी जाईल म्हणून त्यांनी चिंचा काढण्याचे ठरवले. त्यांनी चिंचेच्या झाडावर दगडफेक सुरू केली. चिंचेच्या झाडाखाली एक मोठी शिळा होती. त्यांच्यातील एक मैत्रीण जाऊन त्या शिळेवर बसली.

तेवढ्यात ढग फुटल्याप्रमाणे भयानक कडकडाट आवाज झाला. त्या सगळ्या घाबरल्या व आवाजाच्या दिशेने बघू लागल्या. तर झाडावरून कोणीतरी खाली उतरत होते; त्यामुळेच तो कडकडाट आवाज येत होता. त्यांना दिसले की, झाडावरून एक धिप्पाड बाईची आकृती खाली उतरत होती. तिची वेणी खूपच लांब होती. तिचे तोंड काळेकुट्ट होते. डोळे लालभडक होते. ती एक हडळ होती. ती खूप दिवसांपासून उपाशी असल्यासारखी दिसत होती.

"मी झोपले होते, तुम्ही माझ्यावर दगड मारून या शिळेवर बसून मला जागवले. हे चिंचेचे झाड माझे आहे. हजारो वर्षांपासून मी इथे आहे," असे बोलून ती हा हा करत मोठ्याने, किंचाळवाण्या आवाजात हसू लागली. तिने आपल्या लांब, जाडजूड वेणीने सगळ्यांना बंदी बनवले. "आता एकेकीला मी खाणार," अशी ओरडत होती. राजकुमारी मंदाकिनी व तिच्या मैत्रिणी मोठ्याने रडत होत्या. एवढ्यात राजा अंगध्वज तिथे पोहोचला.

दुरूनच निरीक्षण करून त्याने त्या पिशाच्चीचा सामना करायचे ठरवले; पण राजकुमारी तिच्या तावडीत असल्यामुळे स्थिती खूपच गंभीर होती. राजाने आपल्या सैनिकांना चारही बाजूंनी झाडाला गोल विळखा घालण्यास सांगितले. राजाला चिंचेच्या झाडावरील त्या हडळीची गोष्ट माहीत होती. 'तिचा जीव झाडावर आहे, म्हणून झाडच जाळायचे व शिळा फेकून द्यायची', अशी राजाने योजना आखली व राजा स्वतः तलवार घेऊन पुढे आला.

ती किंचाळवाण्या आवाजात बघून हसू लागली. "मला तर त्या मुलीचे मऊ मऊ मांस खायचे होते, तू आलास बरे झाले. पहिल्यांदा तुला खाते," असे म्हणताच ती पुढे येताच राजाने तलवारीने तिची वेणी कापून टाकली व तिच्यावर वार केले. बाकी सैनिकांनी ती शिळा हटवली व चिंचेच्या झाडाला आग लावली. तेवढ्यात ती त्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करू लागली. झाडाबरोबर ती हडळ अग्नीच्या झगझगीत शिखांबरोबर जळू लागली.

राजकुमारीने राजा अंगध्वजाला मिठी मारली. राजकुमारी मंदाकिनीने वडिलांची माफी मागितली; पण अंगध्वज खूश होता, कारण मंदाकिनीला वाचवण्याच्या हेतूने आपल्या राजाच्या हातून हजारो वर्षे कैद असलेले भूत मारले गेले होते व परत एकदा तो निडर, प्रजेचा रक्षक, शूरवीर राजा म्हणून सिद्ध झाला होता. सकाळ झाली होती व अंगध्वजाची प्रजा त्याचे व राजकुमारीचे जल्लोषाने स्वागत करण्यास सज्ज होती. राज्यात पोहोचताच एकच जयजयकार गुंजत होता, "महाराज अंगध्वजांचा विजय असो!"


- श्रुती करण परब