साळ नदीच्या काठावर वसलेले करमणे गाव म्हणजे गोव्याचा शांत आत्मा. निसर्गरम्यता, पारंपरिक गोमंतकीय घरे आणि संथ जीवनशैलीचा हा सुंदर मिलाफ म्हणजे आत्म्याला शांती देणारी एक अनुभूती आहे.

साळ नदीच्या काठावर विसावलेले सासष्टीमधील करमणे हे एक असे गाव आहे, जिथे निसर्ग, परंपरा आणि आधुनिकता अगदी सहज मिसळतात. काही वर्षांपूर्वी मी येथे आले, पण या गावाने मला ज्या उबदारपणे आपलेसे केले, ती भावना शब्दांत सांगणे कठीण आहे. इथल्या शांत रस्त्यांवरून दरवेळी गाडी चालवत फिरताना मला जाणवते की जीवन अजूनही साधे, सुंदर आणि निसर्गाशी घट्ट जोडलेले राहू शकते.
गावात पाऊल टाकताच सर्वप्रथम जाणवते ती शांतता. गाडी वळताच बाहेरच्या जगातील गडबड कुठेतरी हरवून जाते. दोन्ही बाजूला उभी असलेली नारळाच्या बागांमधील घरे, हिरवी कुरणे आणि विस्तीर्ण शेते मनात लगेच शांतता निर्माण करतात. हवेतल्या मातीच्या, फुलांच्या आणि समुद्राच्या झुळुकीच्या सुगंधाने मन ताजेतवाने होते. अगदी थोडा वेळ फिरलो तरी हा अनुभव आत्म्याला शांती देणारा असतो.
करमणेची निसर्गरम्य वैविध्यता हे गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. गावातूनच झालोर बीचला जाणारा रस्ता जणू काही चित्रपटातील दृश्यासारखा बनतो. डावीकडे गुरांना शांतपणे चरण्यासाठी खुली कुरणे, उजवीकडे नारळाची झाडे आणि कोवळ्या सूर्यप्रकाशात चमकणारे निळे आकाश. किनार्यावर पोहोचताना मिळणारी मोकळ्या वाऱ्याची झुळूक आणि विस्तीर्ण किनाऱ्याचे दर्शन मनाला विलक्षण आनंद देतात. वाळूत धावणारे खेकडे, लाटांवरून उडणारे समुद्री पक्षी आणि शांत वातावरण या किनाऱ्याला अधिकच आकर्षक बनवते.
या गावाची जैवविविधता केवळ समुद्रकिनाऱ्यापुरती मर्यादित नाही. गोव्याची परंपरागत खाजन भूमी, बुंधे, पाटबंधारे आणि लाकडी जलद्वारांनी संरक्षित अशी सखलभागातील जमीन, करमणे गावाला एक वेगळा पर्यावरणीय दर्जा देते. गाडी चालवत या मार्गांवरून जाताना दोन्ही बाजूंच्या पाण्याच्या कालव्यांत वाढलेली मँग्रोव्ह वनस्पती, उड्या मारणारी मासळी आणि पाणथळ पक्षी दिसले की मन नकळत शांत होते. ही खाजन शेती केवळ जैवविविधतेचे केंद्र नाही, तर गोवा देखील किती शहाणपणाने निसर्गाशी जुळवून घेत आला आहे, याचे जिवंत उदाहरण आहे.
साळ नदीच्या काठावरचे जीवनदेखील या गावाचे महत्त्वाचे अंग आहे. पहाटेच्या शांत वेळी जाळी तयार करणारे मासेमार, नदीच्या लाटांवर दिसणारी मासळी आणि ओहोटी-भर्तीच्या गतीने बदलणारा पाण्याचा आवाज, हे दृश्य परंपरेशी असलेला गावाचा खोल संबंध दाखवतात.
करमणेची शेतीसुद्धा तितकीच आकर्षक आहे. विस्तीर्ण शेते ऋतूनुसार रूप बदलत असतात. कधी हिरवा समुद्र, तर कधी सोनेरी गालिचा. या शेतांमध्ये बेडूक, फुलपाखरे, भुंगे, कीटकभक्षक पक्षी आणि परागीभवन करणारे जीव यांचे सूक्ष्म पर्यावरण सतत जिवंत असते. या शेतांमधून गाडी चालवत गेलो की मन एकदम प्रसन्न होते. जणू निसर्ग सांगतोय की, “सगळे ठीक होणार आहे.”
या गावातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे इथली घरे आणि माणसे. जुन्या काळातील लाल कौलारू, जांभ्या दगडांची पारंपरिक गोमंतकीय घरे आजही ताठ मानेने उभी आहेत. त्यांच्याजवळच आधुनिक पद्धतीची घरे उभी राहिली आहेत, पण सगळ्या घरांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे उत्कृष्ट बागायती संस्कृती. प्रत्येक घराच्या अंगणात फुलझाडे, औषधी वनस्पती, भाजीपाला, माड आणि सजावटी रोपे इतक्या प्रेमाने जोपासलेली दिसतात की गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात हिरवळ पसरलेली आढळते. सकाळी झाडांना पाणी देणारे लोक, झाडांची निगा राखणाऱ्या बायका-मुली, किंवा संध्याकाळच्या वेळेस बारद्यात बसून निवांत गप्पा मारणारे कुटुंब, ही दृश्ये करमणे गावचे साधे पण सुंदर आयुष्य उभे करतात.
करमणे गावातील जीवनाची गती संथ, स्थिर आणि शांत आहे. लोक एकमेकांना हसत अभिवादन करतात, रस्ते स्वच्छ ठेवलेले आहेत आणि गावात एक विशेष शांत लय जाणवते. इथे गडबड नाही, ताण नाही, आहे ती फक्त निसर्गाशी सुसंवाद साधून जगणारी माणसे.
माझ्यासाठी करमणे हे फक्त एक गाव नाही तर ती एक अनुभूती आहे. समुद्राच्या लाटा, धान्याची शेते, खाजन भूमी, साळ नदी आणि प्रत्येक घरासमोरील हिरवाई, या सगळ्यांतून मला दररोज निसर्गाचा आशीर्वाद मिळतो. इथल्या प्रत्येक वळणावरून जाताना मला पुन्हा पुन्हा जाणवते की मी एका अशा जागेत राहते, जिथे निसर्ग अजूनही मनसोक्त श्वास घेतो... आणि मी सुद्धा.

- डॉ. सुजाता दाबोळकर