
कल्पना करा...
तुमचे ओठ म्हणजे छोटे छोटे पाखरूच आहेत जणू! बोलताना ते चिमुकल्या पाखरांच्या पंखांसारखे उघड-झाप करतात. आईस्क्रीमचा स्पर्श ओठांना होताच आपल्याला किती आनंद होतो! तहान लागली आणि पाणी प्यावंसं वाटलं की पाण्याचा पेला तोंडाजवळ नेताच हे नाजूक ओठ तोंडाचं छोटंसं दार उघडून पाणी प्यायला मदत करतात.
हेच नाजूक ओठ थोडेसे दोन्ही बाजूंनी ताणले की तुमचा चेहरा स्मितहास्य म्हणजेच स्माईल करतो आणि अजून गोड-गोजिरा दिसू लागतो.
पण मग हिवाळा आला की काय होतं? थंडीबाई येते आणि आपल्या स्पर्शाने ओठांना कोरडे करते. मग ओठांची साल निघते, ते दुखू लागतात आणि म्हणतात, “अरे बापरे! कुणीतरी आम्हाला वाचवा ना! असे कात्रे पडले आहेत की पाणी सुद्धा नीट पिता येत नाही, जळजळ होते, काही खाताही येत नाही.” मग या ओठांना थंडीपासून वाचवण्यासाठी आयुर्वेद मदतीला धावून येतो. काही सोपे उपाय करून आपण थंडीत ओठांची काळजी घेऊ शकतो असे तो सांगतो. विचार करा बरं काय उपाय आयुर्वेदाने सांगितला असेल??? शरीरातला कोरडेपणा कमी करण्यासाठी एक हमखास उपाय आपण आधी बघितला आहे. आठवतो का???? दिमाग की बत्ती जलाओ! आठवलं ना?? आपला हिवाळ्यातला बेस्ट फ्रेंड....तेल. ओठांना रोज रात्री झोपताना खोबरेल तेल किंवा तीळ तेल लावावं. यामुळे ओठ छान मऊ राहतात, कोरडेपणा नाहीसा होतो आणि सालपटं सुद्धा निघत नाहीत. बोटाने हलका मसाज ओठांवर केला तर ओठांना छान रक्तपुरवठा होतो आणि ओठ गुलाबी होतात.
उष्णतेमुळे म्हणजेच उन्हाळ्यात किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे ओठांना कात्रे पडले असतील तर मात्र साजूक तूप जास्त उपयोगी ठरतं. रात्री झोपताना ओठांना तूप लावायचं. दोन-तीन दिवसांत कात्रे कमी व्हायला लागतात.
ओठ कोरडे होऊ नये म्हणून पुढील गोष्टी पाळा:
सारखं फ्रीजमधलं थंड पाणी किंवा कोल्ड ड्रिंक, थंड ज्यूसेस पिऊ नका.
खूप वेळ एसी सुरू करून बसू नका.
जास्त प्रमाणात कोरडे पदार्थ जसे की पाव, पोळी, केक, टोस्ट, चिप्स इत्यादी खाऊ नका.
खूप तिखट आणि खूप आंबट पदार्थ उदा. सॉस, लोणचे जास्त प्रमाणात खाऊ नका.
वारंवार ओठांवरून जीभ फिरवू नका.
ओठांची सालपटं निघाली असतील तर ती ओढून काढू नका.
अशी ओठांची रोज काळजी घ्या आणि हिवाळ्यात सुद्धा ओठ मऊ, गुलाबी ठेवा

- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य