मासळी उत्पादनात यंदा विक्रमी वाढ शक्य

पहिल्या सहा महिन्यांत मिळाले ६८,८३१ टन मासे; बांगडा, तारली तेजीत : जागतिक मत्स्यउत्पादन दिन


21st November 2023, 12:49 am
मासळी उत्पादनात यंदा विक्रमी वाढ शक्य

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गतवर्षीप्रमाणे यंदाही बांगडा, तारलीसह रा​ज्यातील मत्स्य उत्पादनात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. गतवर्षी राज्यात समुद्र आणि गोड्या पाण्यातून १,२८,६५९ टन मासळी मिळाली होती. चार वर्षांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक होता. यंदा जानेवारी ते जून या सहाच महिन्यांत ६८,८३१ टन मासळी मिळाली आहे. त्यामुळे यंदाचे उत्पादन गेल्या पाच वर्षांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
राज्यातील मत्स्य उत्पादनात वाढ करण्यासाठी राज्य सरकार विविध मार्गांचा अवलंब करत आहे. मच्छीमारांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या योजना मच्छीमारांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम ग्रामीण मित्र तसेच स्वयंपूर्ण मित्रांकडून सुरू आहे. त्याचा फायदा गेल्या आणि यावर्षीही होत असल्याचे वाढत असलेल्या मत्स्य उत्पादनातून स्पष्टपणे दिसून येते.
गेल्यावर्षी समुद्रातून १,२२,२२४ आणि गोड्या पाण्यातून ६,४३५ टन मासळी मिळाली होती. यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांतच समुद्रातून ६६,४१४ आणि गोड्या पाण्यातून २,४१७ अशी मिळून ६८,८३१ टन मासळी मिळाली आहे. त्यात गतवर्षीप्रमाणे यंदाही बांगडे, तारली, सुंगटे आदी माशांमध्ये वाढ झाल्याचे मच्छीमार खात्याने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
दरम्यान, को​विड काळात २०१९ आणि २०२० मध्ये विविध निर्बंधांमुळे राज्यातील मत्स्य उत्पादनात कमालीची घट झाली होती. परंतु, निर्बंध उठल्यानंतर पुढील दोन वर्षांत त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गस्तीमुळे बेकायदेशीर मासेमारीत घट
मासेमारी बंदीच्या काळात गोव्याच्या अखत्यारीत येणाऱ्या समुद्रात येऊन मासेमारी करणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटकातील ट्रॉलर्सना रोखण्यासाठी मत्स्योद्योग खात्याने विविध उपाययोजना आखल्या. ‘तटरक्षक दलाचे जवानही या परिस्थितीवर लक्ष ठेवून वारंवार गस्त घालतात. त्याचा फायदा राज्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी होत असल्याची माहिती मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यंदाही निर्यातीत होणार वाढ
गतवर्षी राज्यात सापडलेल्या मासळीपैकी ६३,३३३ टन मासळीची इतर देशांमध्ये निर्यात करण्यात आली होती. त्यातून राज्याला सुमारे ७३० कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. यंदाचे उत्पादन पाहिल्यास यावेळीही निर्यात होणाऱ्या मासळीत वाढ होऊन अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा खात्याला आहे.