वाळपई पालिकेकडून ४० दुकानांचा लिलाव

बोलीदारांचा चांगला प्रतिसाद : दर महिन्याला १.५० लाखांचा मिळणार महसूल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st November, 12:09 am
वाळपई पालिकेकडून ४० दुकानांचा लिलाव

वाळपई नगरपालिकेच्या दुकान गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेस उपस्थित असलेले बोलीदार. यावेळी मुख्याधिकारी दशरथ गावस यांनी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली.

वाळपई : वाळपई नगरपालिकेने जाहीर केलेल्या ४० दुकानांची लिलावाची प्रक्रिया सोमवारी यशस्वीपणे पार पडली. सर्व दुकानांना बोलीदारांचा चांगला प्रतिसाद लाभला. यामुळे नगरपालिकेला दर महिन्याला जवळपास दीड लाख रुपयांचा महसूल जमा होणार असल्याची माहिती वाळपई नगरपालिकेचे मुख्याधिकारी दशरथ गावस यांनी दिली.
नगरपालिकेच्या एकूण ४० दुकानांची लिलावाची प्रक्रिया नगरपालिकेने जाहीर केली होती‌. यासाठी १७ नोव्हेंबर अंतिम दिवस होता. या लिलाव प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभला. सर्व दुकानांना एकापेक्षा जास्त जणांनी बोली लावली होती. सोमवारी सदर प्रस्ताव खुले केले असता, अंदाजानुसार जवळपास दीड लाख रुपयांचा महसूल दर महिन्याला नगरपालिकेला प्राप्त होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या संदर्भात अधिक माहिती देताना मुख्याधिकारी दशरथ गावस यांनी सांगितले की, फक्त तीन दुकाने वगळता इतर दुकानांना तीनपेक्षा जास्त जणांनी बोली लावली. यामुळे नगरपालिकेला चांगल्या प्रकारचा महसूल प्राप्त होणार आहे. दर चौरस मीटर २५० प्रमाणे भाडे निश्चित करण्यात आले होते. त्याच्यापेक्षा जास्त बोली लावली होती. ज्या तीन दुकानांसाठी फक्त एकच अर्ज होता, त्या संदर्भात अधिकार नगरपालिकेच्या मंडळाला आहे. नगरपालिकेच्या मंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा करून शक्य असल्यास सदर अर्जदारांना ही दुकाने भाडेतत्त्वावर देण्यात येणार अाहेत.