राजधानी पणजीत स्मार्ट सिटीची धुळवड

Story: अंतरंग | पिनाक कल्लोळी |
20th November 2023, 05:08 am
राजधानी पणजीत स्मार्ट सिटीची धुळवड

होळी किंवा धुळवडीला अजून काही महिने शिल्लक आहेत. असे असले तरी राजधानी पणजीत राहणाऱ्यांना सध्या रोज धुळीची आंघोळ होत आहे. राजधानीला स्मार्ट बनवण्यासाठी शिल्लक कामे पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. ठिकठिकाणी रस्ते खोदून काढले आहेत आणि मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी या भागात प्रचंड धूळ उडत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना तर त्रास होत आहेच, शिवाय हॉटेल व्यावसायिक व अन्य दुकानदारही या धुळवडीला वैतागले आहेत.

नियोजन शून्य काम कसे असावे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पणजीतील स्मार्ट सिटीची कामे म्हणता येतील. मागच्या वर्षी लोकांना या कामांचा त्रास झाला होता. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. रस्ते बंद असल्यामुळे व्यावसायिकांना ग्राहक मिळत नव्हते. त्यामुळे अनेक व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागला. लोकांची सहनशक्ती संपल्यावर अखेर सरकारला निर्णय घ्यावा लागतो. स्मार्ट सिटीचे कारभारी बदलण्यात आले. त्यानंतर कामे सुरळीत होतील असा विश्वास लोकांचा होता, मात्र असे होताना दिसत नाही. 

ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे स्मार्ट सिटीच्या पूर्वीच्या समस्या आता पुन्हा डोके वर काढू लागल्या आहेत. शहरात १८ जून रस्ता, सांतिनेज येथील विवांता जंक्शन ते काकुलो मॉल जंक्शन, शीतल हॉटेल ते मधुबन जंक्शन, मधुबन ते काकुलो मॉल, काकुलो मॉल ते टोंककडे जाणारा पूल या रस्त्यांवर विविध कामे सुरू आहेत. रस्त्यांवर चर खणल्यामुळे येथे दिवस रात्र धूळच धूळ झाली आहे. या परिसरातून कधीही जा, तुम्ही धुळीने माखणार याची १०० टक्के खात्री आहे. धूळ लोकांच्या घरांत, जेवणात आणि पर्यायाने पोटात पोचली आहे. बहुतांश नागरिक सध्या दिवसभर दारे - खिडक्या बंद करून बसणे पसंत करत आहेत. 

या भागातील काही दुकानदारांनी दरवाजांवर प्लास्टिकचे आवरण लावले आहे, तर काही दुकानदार दिवसातून तीन ते चार वेळा धूळ साफ करण्याचे काम करताना दिसतात. धुळीमुळे घसा तसेच डोळ्यांनाही त्रास होत आहे. यामुळे सर्दी, खोकला यासारख्या आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. येथे काम करणाऱ्या कंत्राटदराकडून धूळ उडू नये याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. काम पूर्ण झाल्यावर देखील तिथे केवळ माती टाकून रस्ता बुजवण्यात आला आहे. असे असले तरी प्रशासन याबाबतीत ढिम्म आहे. 

लोकांनी तक्रारी केल्यावर काही निवडक रस्त्यांवर कंत्राटदाराने पाणी मारणे सुरू केले आहे. मात्र ते देखील सकाळी एकदाच पाणी मारण्यात येते. उन्हामुळे दोन तासात पाणी वाळून जातो आणि पुन्हा येथे धुळीचे साम्राज्य तयार होते. प्रशासनाने यामध्ये लक्ष देऊन कंत्राटदाराकडून काम करून घेणे गरजेचे आहे. दरवेळी लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहणे योग्य नाही. मला काय त्याचे, किंवा ते माझे काम नव्हे, ही मानसिकता बदलायला हवी. 

पुढील निवडणुकीत पणजीमध्ये स्मार्ट सिटीच्या कामांचे भूत नाचणार, हे नक्की आहे. या कामांबाबत, सरकारबाबत तसेच लोकप्रतिनिधींबाबत लोकांच्या मनात तीव्र असंतोष आहे. निवडणुकीच्या माध्यमातून तो व्यक्त होऊ शकतो. लोकांना गृहित धरणे महागात पडू शकते, हे ‘हेवीवेट' लोकप्रतिनिधींनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी समजून घ्यायला पाहिजे.