सरकारी जमीन लाटून खाण कंपनीला दिली लीजवर

गुन्हा दाखल : तीर्थबाग - मये येथील महिलेला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th November, 05:00 am
सरकारी जमीन लाटून खाण कंपनीला दिली लीजवर

पणजी : तीर्थबाग - मये येथील सरकारी जमिनीच्या बनावट दस्तावेजामार्फत कुटुंबीयांच्या नावे करून खाण कंपनीला १३ लाखांत लीजवर दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका महिलेला अटक केली आहे.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तीर्थबाग - मये येथील सर्व्हे क्रमांक १४४/० व १४५ मधील ८२,५५० चौरस मीटर सरकारची जमीन आपल्या पूर्वजांची असल्याचे भासवून धेंपो कंपनीला मायनिंगसाठी लीजवर दिली. यासाठी संशयित विद्याधर तळवणेकर, सीताबाई तळवणेकर आणि वनिता तळवणेकर यांनी १४ ऑगस्ट २००४ रोजी पणजीत नोटरीमार्फत धेंपो कंपनीशी करार करून संशयितांनी धेंपो कंपनीकडून १३ लाख रुपये घेतले होते.
ही रक्कम संशयितांनी कुटुंबातील इतर सदस्यांना दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्यात वाद निमार्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने संबंधित जमिनीसंदर्भात उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे (महसूल) तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले होते. याच दरम्यान संबंधित जमीन सरकारच्या मालकीची असल्याचे समोर आले. त्यानुसार, वरील संशयितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याची दखल घेऊन डिचोलीचे पोलीस निरीक्षक राहुल नाईक भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रसाद पाळणी यांनी भादंसंच्या कलम ४२०, ३७९, आरडब्ल्यू १२० बी आणि ‘गोवा, दमण व दीव गौण खनिज सवलत नियम १९८५’च्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिसांनी सीताबाई तळवणेकर हिला अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित विद्याधर तळवणेकर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा