उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

Story: स्वस्थ रहा मस्त रहा | वैद्य कृपा नाईक |
19th November 2023, 04:15 am
उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

(भाग १)

'वदनी कवळ घेता' हा श्लोक तुम्हाला सर्वांना पाठ असेलंच. बालवाडीत, प्राथमिक शाळेत हा श्लोक रोज मधल्या सुट्टीत बाई आमच्याकडून म्हणून घेत असत आणि मग आम्हाला डब्यातला खाऊ खायची परवानगी देत. तुम्ही अजून पाठ केला नसेल तर लगेच पाठ करा व रोज म्हणा कारण हा श्लोक आपल्याला खूप गोष्टी शिकवतो. ‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ ही या श्लोकाची शेवटची ओळ आहे. आपण जेवतो त्या विधीला या श्लोकात ‘यज्ञकर्म’ असे म्हटले आहे. जेवणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर जसा आपण यज्ञ करतो त्या पद्धतीने जेवले पाहिजे.

आपण सर्वांनी यज्ञ विधी बघितला असेल, ज्यांनी अजून एकदाही बघितला नाही त्यांनी मुद्दाम जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा आई बाबांसोबत मठ-मंदिरामध्ये जाऊन यज्ञ विधी नक्की बघा. म्हणजे तुम्हाला जेवण जेवणे म्हणजे यज्ञकर्म असे का म्हटले आहे ते सहज समजेल.

१. यज्ञाची मांडणी नेहमी स्वच्छ पवित्र ठिकाणी केली जाते, त्याचप्रमाणे आपण जिथे जेवणार ती जागा स्वच्छ व पवित्र असली पाहिजे. कुठेही उघड्यावर, कचरा, अस्वच्छता असलेल्या ठिकाणी जेवू नये. 

२. यज्ञामध्ये अग्नीला दिल्या जाणाऱ्या आहुती (तीळ, समिधा इ.) बसून दिल्या जातात. जसा यज्ञामध्ये अग्नी असतो तसाच आपल्या पोटात जाठराग्नी नावाचा अग्नी आहे. आपण जेवताना सुद्धा शरीरातील जाठराग्नीला बसून आहुती (भात, वरण, भाजी, लोणचं , कापं इ.) द्याव्या म्हणजेच एका जागी बसून जेवावे. उभे राहून किंवा चालत फिरत जेवू नये. 

३. यज्ञाची सुरुवात देवाच्या प्रार्थनेने केली जाते. त्याचप्रमाणे जेवायला सुरुवात करण्यापूर्वी देवाचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा. आहार बनवण्यासाठी सर्व साहित्य कडधान्ये, भाजी, मसाले इ. उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्याचे आणि जेवण बनवणाऱ्या आईचे, आजीचे, बाबांचे मनोमन आभार मानावे व जेवायला सुरुवात करावी.

यज्ञकर्म या एका शब्दाने कितीतरी गोष्टी समजल्या ना? अश्या अजून मजेशीर, उपयुक्त गोष्टी आपण पुढील भागात बघुया. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा.