सायटिकाच्या दुखण्याने वैतागलात ?

Story: आरोग्य | डॉ. श्वेता राऊत मुळगावकर |
18th November 2023, 04:07 am
सायटिकाच्या दुखण्याने वैतागलात ?

भाग-२

सरासरी १० पैकी ४ जणांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी सायटिकाचा त्रास होतोच. अन् एकदा सायटिकाचा त्रास चालू झाला, की वर्षानुवर्षे सतावू शकतो. वेळ जसा जातो तशा वेदना कमी-जास्त होऊ शकतात. पण मधेच काही जड उचलल्याने, जास्त काम केल्याने, जास्त एका जागी बसून राहिल्याने किंवा घसरल्या-पडल्याने पाठीला काही दुखापत झाल्यास त्रास परत उद्भवू शकतो.

नव्यानेच सुरू झालेला व सौम्य प्रकारचा त्रास असल्यास थोडावेळ आराम केल्याने आणि सूज व वेदना कमी करण्यासाठी दिलेली वेदनाशामक औषधे घेतल्याने दुखणे कमी वाटू शकते. घरगुती उपचारही बर्‍यापैकी आराम देऊ शकतात. यात बर्फाचा किंवा गरम शेक घेऊ शकतो. पहिल्या काही दिवसात जेव्हा सूज असते तेव्हा बर्फाचा शेक घेतल्याने वेदनेचे प्रमाण कमी होते. नंतर काही काळानंतर सूज कमी झाल्यावर, वेदनेच्या जागी उष्णता नसल्यास गरम शेक उपयोगी ठरतो.

सायटिकाची लक्षणे दिसून आल्यास व ती एका महिन्यापेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे आवश्यक ठरते. ओव्हर-द-काउंटर वेदनाशामक औषधे, स्नायू शिथिल करण्यासाठीची औषधे दिली जातात. गरजेनुसार पाठीच्या स्पायनल नसेच्या सभोवतालच्या जागेत स्टिरॉइड औषधाचे इंजेक्शन दिले जाऊ शकते. घसरलेल्या डिस्कमुळे दबलेल्या नसेला या इंजेक्शन्सने बर्‍यापैकी गुण मिळू शकतो. तीव्र वेदना सुधारल्यावर फिजिकल थेरपी अवलंबली जाऊ शकते. यामध्ये सुरुवातीला वेदना सुधारण्यासाठी उपकरणांसोबत मॅन्युअल थेरपीतील वेगवेगळे उपचार उपयोगी ठरतात. त्यानंतर पाठीला आधार देणारे, स्नायू मजबूत करण्यासाठी आणि लवचिकता सुधारण्यासाठी स्ट्रेचिंग व स्ट्रेंदनींग व्यायाम शिकवले जातात. व्यायाम नियमितपणे चालू ठेवल्याने सायटिकाचा त्रास आटोक्यात ठेवला जाऊ शकतो.

वैद्यकीय उपचार, औषधे, फिजिकल थेरपी याने सायटिकाचे दुखणे आटोक्यात येत नसल्यास, दुखणे सहन करत राहणे धोकादायक असू शकते. असह्य वेदनेसोबत नस दाबली गेल्याने फुट ड्रॉप, पॅरालिसिसची लक्षणे दिसू शकतात. हे टाळण्यासाठी शस्त्रक्रियेचा मार्ग सुचविला जातो. त्रासामागे कोणते कारण आहे त्यावरून कोणत्या प्रकारची शस्त्रक्रिया उपयुक्त आहे ते ठरवले जाऊ शकते. सायटिकाच्या दुखण्यावर साधारणपणे पुढील प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. एनडॉस्कोपिक ऑपरेशन यामध्ये एक बॉल पेनच्या आकाराचा एन्डॉस्कोप (दुर्बीण) डिस्कपर्यंत हळू सरकवला जातो आणि डिस्कचा घसरलेला भाग जो नसेवर दाब घालत आहे, तो काढला जातो. यामध्ये 'रेडिओ फ्रिक्वेन्सी' लहरींचा उपयोग होतो. मायक्रोडिस्केक्टोमी या दुसऱ्या प्रकारच्या शस्त्रक्रियेत 'मायक्रोस्कोप'चा वापर केला जातो. या शस्त्रक्रियांनंतर बहुतांश वेळा रुग्ण मोजक्या काही तासात घरी जाऊ शकतो व कमी वेळात चालू-फिरू शकतो. अजून एका प्रकारच्या शस्त्रक्रियेत पाठीमध्ये छोटा छेद करून घसरलेले मणके परत जागेवर आणले जातात. 

सायटिका असलेल्या व्यक्तींनी व्यायामासोबत ज्या हालचालींमुळे दुखणे वाढते त्या हालचाली टाळाव्यात व ताठ बसण्याची सवय ठेवावी. शक्ती वाढवण्यासाठी व्यायामांमध्ये विविधता आणावी. झोपून व्यायाम जमत नसल्यास बसून किंवा उभे राहून पायाचे व्यायाम करावेत. कंबरेच्या व पायाच्या स्नायूंना मजबूत करण्यावर भर द्यावा. चालणे, पोहणे यासारखे नियमित व्यायाम चालू ठेवावे. सतत बसणे होत असल्यास दर २० मिनिटांनी आपली स्थिती बदलावी तसेच योग्य अर्गोनॉमिक पद्धती अवलंबाव्यात.

पुढे दिलेले काही व्यायाम सहजरीत्या घरी केले जाऊ शकतात.

 पाठ ताणण्याचा व्यायाम (भुजंगासन)

पालथे झोपून हातांनी जमिनीवर दाब देत शरीर कमरेपर्यंत उचलण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत, आकाशाकडे पाहण्याचा प्रयत्न करा आणि काहीकाळ त्याच स्थितीत रहा.

 कॅट-काऊ स्ट्रेच (बिटिलासन व मर्जरी आसन)

गुडघ्यावर बसून पुढे वाकून हात जमिनीवर ठेवा. खांद्याखाली मनगट आणि नितंबाखाली गुडघे ठेवा. खांदे कानांपासून दूर करत वर पहा, नाभी आत खेचा व पोटाचे स्नायू मणक्याच्या जवळ ठेवा. थोडा वेळ असेच थांबून डोके खाली करा, हनुवटी छातीजवळ टेकवा. अशी कंबर वर आणि खाली करत रहा.

 ब्रिजींग (सेतुबंधासन)

पाठीवर झोपून गुडघे दुमडा व हात शरीराच्या बाजूला ठेवा. हातावर वजन घेत हळूहळू कंबर व नितंब शक्य तितक्या उंच न्या.

 चाईल्ड पोज स्ट्रेच (बालासन)

वज्रासन स्थितीत बसून हाताचा जमिनीवर स्पर्श ठेवत पुढे-पुढे वाढवा, पुढे झुकत डोके जमिनीवर ठेवा. नितंब वर न सरकावता टाचांवर असू द्या.

 हॅमस्ट्रिंग स्ट्रेच

दोन्ही पाय सरळ ठेवून जमिनीवर बसा. गुडघे सरळ ठेवून कंबरेतून शक्य तितके वाका व हात पुढे सरकावत पायाच्या बोटांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. जांघेच्या मागच्या स्नायूवर ताण येऊ द्या.

सगळ्या व्यायामांची स्थिती १५ ते ३० सेकंद धरून ठेवा व सातत्याने ५ ते १० वेळा करा.