ज्ञानप्रक्रिया अन् वातावरणनिर्मिती

Story: पालकत्व | पूजा शुभम कामत सातोस्कर |
18th November 2023, 04:05 am
ज्ञानप्रक्रिया अन् वातावरणनिर्मिती

परमेश्वर आपल्याला आई-बाबा बनण्याचे सौभाग्य प्रदान करतो त्या क्षणापासूनच आपली जबाबदारी असते की, आपण आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात योग्य ते योगदान देऊन उत्कृष्ट माता पिता बनावे. आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास म्हणजेच पालकांचे खरे यश होय. बालवयापासूनच जेव्हा मुलांचे व्यक्तिमत्त्व आकार घेत असते, तेव्हा प्रत्येक बाजूने त्यांच्या विकासासाठी योग्य वातावरण निर्मिती झाली आहे हा मुद्दा पालकांनी सुनिश्चित करायचा असतो. त्यासाठी काही मुद्द्यांवर ध्यान केंद्रीत करणे अधिक आवश्यक असते. मुलांवर आजूबाजूला निर्माण झालेल्या वातावरणाचे विविधांगी मुद्दे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक वा नकारात्मक प्रभाव पाडू शकतात. मुलांच्या विकासात त्यांना लाभलेले भौतिक वातावरण, सामाजिक वातावरण, भावनिक वातावरण, धार्मिक वातावरण, अत्यंत महत्त्वाची भूमिका कशी पार पाडतात ते आपण पाहूया.

 व्यक्तिमत्त्व विकास अन् भौतिक वातावरण

बालपणापासूनच मुलांना आपल्या घरी जसे वातावरण मिळते, त्याप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल होत राहतो. शाळेत एका वर्गात अनेक मुले शिकतात, त्यांचे आचारविचार, वागण्याच्या, बोलण्याच्या पध्दती एकमेकांपेक्षा भिन्न असतात, कारण ज्याप्रमाणे त्यांच्या घरातील कुटुंबाची स्थिती असेल त्याचप्रमाणे त्यांचे वर्तन असते. जर घरात नेहमी शांततेचे, प्रसन्नतेचे वातावरण असेल, भांडणतंटे नसतील, तर अशा वातावरणात वावरणारे मूल सकारात्मक वृत्तीचे व शांत मानसिकतेचे होते. पण जर घरातील माणसे, सतत एकमेकांसोबत भांडण करत असतील, एकमेकांचा कटू शब्दांनी अपमान करत असतील, तर हे नैराश्य व भीतीपूर्व वातावरण मुलांच्या आजूबाजूला निर्माण होईल, ती भयभीत राहतील, व नकारात्मक वृत्तीची बनतील. याचा परिणाम मुलांच्या शालेय प्रगतीत सुध्दा होईल.

 व्यक्तिमत्त्व विकास अन् सामाजिक वातावरण

घरात जरीही मुलांना सकारात्मक वातावरण मिळाले, तरी सुध्दा आपल्या घराच्या आजूबाजूला जे लोक राहतात, ते सुध्दा सकारात्मक असले पाहिजेत, आपले शेजारीपाजारी, आपल्या जीवनातील असंख्य नाती, शालेय वातावरण, तसेच आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजात घडत असलेल्या घडामोडींचा मुलांवर सहज परिणाम होतो. उदा, अपहरण, हिंसा, बलात्कार, मारहाण सारख्या दिवसेंदिवस घडणाऱ्या अपराधांमुळे मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना तयार होते, त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होतो. म्हणूनच समाजातील प्रत्येकाची मानसिकता आपण बदलू शकलो नाही, तरीही आपल्या मुलांची मानसिकता कशी सकारात्मक ठेवावी याचा विचार पालकांनी नक्कीच करावा.

 व्यक्तिमत्त्व विकास आणि भावनिक वातावरण

भावनिक वातावरण म्हणजेच मुलांच्या भावनांशी संबंधिक अनेक बदल होय. वाढत्या वयानुसार मुलांच्या मनात निर्माण झालेल्या भावना, त्यांच्या इच्छा, आकांक्षा, त्यांच्या मागण्या, त्यांच्या इतरांकडून अपेक्षा, योग्य अयोग्य यामध्ये भेद करण्याची क्षमता, हे सर्व मुद्दे ध्यानात घेतले जातात. 

मुलांच्या मनात क्षणोक्षणी निर्माण होणाऱ्या भावनांना घरात कशा पध्दतीने मोकळे व्यासपीठ मिळते, यावर त्यांचे व्यक्तिमत्त्व अवलंबून असते. घरातील कुटुंब मुलांच्या भावना कशा हाताळतात, किंवा मुले जीवनातील दिवसेंदिवस निर्माण होणाऱ्या समस्यांना शांत वृत्तीने हाताळण्यास कशी सक्षम बनतात यावर ध्यान दिले जाते. मुलांचे हे युध्द स्वत:शीच चालू असते, व ज्या मुलांना या संघर्षात विजय होतो, ती मुले भविष्यात येणाऱ्या कुठल्याही स्थितीला सहज हाताळण्याची शक्ती बाळगतात, पण जी मुले या युध्दात हरतात, त्यांना ताणतणावास सामोरे जावे लागते.

 व्यक्तिमत्त्व विकास आणि धार्मिक वातावरण

धार्मिक वातावरण म्हणजेच भगवंताच्या भक्तीत सुख शोधण्याची एक प्रक्रिया होय. मुलांना जर बालपणापासूनच धार्मिक संस्कार मिळाले तर मुले सोज्वळ, सदाचारी बनतात. म्हणूनच मुलांना पालक बालपणापासूनच वेगवेगळ्या प्रार्थना शिकवतात, आपल्या घरातील विविध धार्मिक उत्सव आपण का व कसे साजरे करतो, हे मुद्दे त्यांना समजावून सांगतात, भगवंताची भक्ती म्हणजे नेमके काय, हे मुलांना प्रशिक्षण देतात. पण अर्थातच मुलांना जर भक्तीची ओढ लागावी असे आपणास वाटत असेल तर आम्ही स्वत: आधी भगवंताप्रती समर्पित राहिले पाहिजे. जर आपणच भगवंताला वेळेनुसार स्मरण केले, तर आपली मुलेही तेच करतील. त्यामुळे पालकच आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्यास जबाबदार असतात.