दिवाळी पहाट

Story: ललित | प्रतिभा कारंजकर |
18th November 2023, 03:59 am
दिवाळी पहाट

उठा उठा दिवाळी आली अभ्यंग स्नानाची वेळ झाली. अॅड बघितली आणि जाणवलं  आता घरोघरी वाड्यातून, बंगल्यातून, वस्तीवस्तीतून, गावागावातून, शहरातून, दिवाळीची चाहूल ऐकू येऊ लागली. ‘दिवाळी’ या तीनच अक्षरात तेज, मांगल्य, प्रकाश, आनंद, हर्ष अशा अनेक भावना सामावलेल्या आहेत. हा सण येतानाच आपल्या मनाला वेध लागलेले असतात ते नवीन आकाशकंदील, पणत्या, लाईटच्या माळा आणण्याचे. मग आठवते दिवाळीची रूपरेषा, अंगण आणि घरदार उजळून टाकणाऱ्या प्रकाश फुलांची बरसात होतेय, दारी कुणीतरी मान मोडेपर्यंत खपून काढलेली रांगोळी आहे, पहाटेच्या प्रहरी सुगंधित तेल आणि उटणे लावून केलेल्या अभ्यंग स्नानानंतर खास दिवाळीसाठी खरेदी केलेल्या नवीन कपड्यांची घडी मोडून ते घालून फटाके, फुलझडी, भुईनळे, फुलबाजी यांची बालचमूनी केलेली आतषबाजी, घरोघरी बनवलेले फराळाचे पदार्थ, त्यांचा घमघमाट, त्यावर मारलेला ताव, नवनवीन खरेदीचे एक निमित्त, सणासुदीच्या दिवसात भेटायला आलेले आप्त, मित्रमंडळी, त्यांचं स्वागत, मस्त खाणं पिणं, भेटवस्तू देणं आणि घेणं, अशा अनेक गोष्टींचे प्रयोजन असते दिवाळी म्हणजे. 

दीपावलीच्या पहाट पारी उजाडायच्या आधीच घराघरातून लगबग सुरू झालेली असते, दिवाळीच्या मंगल पावलांना आमंत्रण देणारा अंगणात लटकणारा आकाश दिवा, दारादारातून मंदपणे तेवणाऱ्या पणत्या, रंगीबेरंगी रांगोळ्यांची सजावट, मनाला प्रसन्न करणारे सनईचे सुर कुठेतरी गुंजत असतात तर कुठे मंदिरात किर्तन, नाम संकीर्ण चाललेले असते. मधेच कुणीतरी लावलेल्या फटाक्यांच्या आवाजाने परिसर धडधडत असतो. सोनेरी-चंदेरी प्रकाश फुलांची उधळण करत फुलबाजी तडतडत असते. भुईचक्रे गोलगोल फिरत असतात. भुईनळे उंचउंच आकाशातून ठिणग्यांची बरसात करत असतात. 

दिवाळीत महत्त्व असतं ते मातीच्या पणतीचं. बाकीच्या सणाला समई, निरंजन, दीपारती चालते पण दिवाळीला पणती पाहिजेच. पणती मातीची, म्हणजे माती ही पणतीची आई तर आकाश हा पिता, आकाश आणि माती यांच्या संसारातला प्रकाश हा निसर्गासाठी ओघाने आपल्या सर्वांसाठी आवश्यक असतो. दिवा हा आपला  सांगाती आहे.  अंधार कुणालाच आवडत नाही. पणती  ही मातीने  जपलेली ठेव असते वात जेव्हा प्रज्वलित होते तेव्हा आपल्या मनातला अंधार दूर होऊन एक शांती मिळते. पूर्वीच्या काळी मुलांना गुरुकुलात पाठवताना त्याची आई त्याला एक पणती देई  ‘ही रोज लावत जा’ असं सांगत असे, म्हणजे मिळवलेल्या ज्ञानाने तू तुझा मार्ग प्रकाशमय कर म्हणून सांगे, तर गुरुकुलातून बाहेर पडताना गुरुजी शिष्याच्या हाती पणती सोपवत ‘या दिव्याप्रमाणे तुझं चारित्र्य उज्ज्वल, पवित्र आणि दिव्याच्या प्रकाशा इतकं स्वच्छ ठेव’ असा संदेश देत असत. 

आपल्या संस्कृतीत तेजाच्या म्हणजे प्रकाशाच्या पूजेला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि दिवाळी हा प्रकाशाचा सण. पूजेचं वातावरण सण मंगलमयी बनवतो. अंधार दाटतो तेव्हा प्रकाश वाट दाखवतो तसं दिवाळीचा मंगलदीप उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवतो. दिवा हे प्रकाशाचे प्रतीक आहे. दिव्याच्या मंगल मंद प्रकाशात सारी मंगल कार्ये सिद्धीस जातात. अमंगल दूर होते. मनातली विकारांची कोळीष्टके नाहीशी होतात. मीट्ट काळोखात दिवा होऊन उजळणं आणि प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणं यालाच तर म्हणतात दिवाळी. मनामनात आशेचा आणि यशाचा दीप उजळणं म्हणजे खरा दिवाळीचा सण साजरा करणं. अंगणात दिवे लावताना स्वत:च्या मनालाच बजावून सांगितलं पाहिजे की ‘नकार घंटा वाजवत बसण्यापेक्षा सकारात्मक विचारांची कास धरून येणाऱ्या प्रत्येक क्षणाला आनंदी बनवू या’.  प्रकाशाचा हा उत्सव सगळ्यांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश घेऊन येणारा ठरू दे. प्रत्येकाच्या मनातील कटुता, नैराश्य, उदासीनता, वैर, द्वेष भावना यांचा अंधकार नष्ट होऊन लख्ख प्रकाशाचं पर्व घेऊन आलेल्या या सणाचे स्वागत करत आपल्या बरोबर दुसऱ्याच्याही जीवनात आनंद वाटत वाटत पुढे चाललं पाहिजे.  

नवल वरतले गे माये |

उजळला प्रकाशू मनांचीये

अंधाराचा होतसे विनाशू ||

असं नवल घडवण्याचं सामर्थ्य या सणात असतं. दिवाळीची पहाट म्हणजे अमावास्येच्या अंधाराला मागे सारत दिपतेजाने आसमंत उजळून टाकत त्याची पिछे हाट करायला भाग पाडणारा सण. या सणाच्या नावातच दीप म्हणजे प्रकाश या अर्थाचा अंतर्भाव आहे. प्रकाश म्हणजे तमावर मात. अज्ञानरूपी अंधाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे वाटचाल म्हणजे खरी दिवाळी पहाट. श्री कृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध करून त्याच्या जुलुमातून लोकांची सुटका केली ही गोष्ट सांगते नरकासुरासारख्या वाईट वृत्तींचा, गोष्टींचा नायनाट करून, त्याला अग्नि देऊन नाहीसा करणं आणि चांगल्या गोष्टींचं अनुकरण करणं ही खरी दिवाळी पहाट.