नवी दिल्ली : आधार डेटा लीकचे एक मोठा प्रकरण समोर आले आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, ८१.५ कोटी भारतीयांचा आधार आणि पासपोर्ट संबंधित डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे, असे अमेरिकन कंपनी रिसिक्युरिटीचा दावा आहे. संबंधित व्यक्ती नाव, फोन नंबर, पत्ता, आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
अमेरिकन फर्मने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ९ ऑक्टोबर रोजी ‘pwn0001’ या व्यक्तीने ब्रीच फोरमवर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी ८१.५ कोटी भारतीयांच्या आधार आणि पासपोर्टशी संबंधित रेकॉर्डशी संबंधित माहिती दिली आणि ती विकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीने आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती ८० हजार डॉलरमध्ये विकण्याची ऑफर दिली होती.
हा डेटा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (ICMR) लीक झालेला असू शकतो. मात्र ICMRने अद्याप यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. pwn0001 द्वारे शोधलेल्या या डेटा लीकची सीबीआय चौकशी करत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
लीक झालेल्या डेटामध्ये नाव, वडिलांचे नाव, फोन नंबर, पासपोर्ट नंबर, आधार क्रमांक आणि वयाची माहिती आहे. मात्र आतापर्यंत या डेटा लीक प्रकरणावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.