पणजी : कळंगुट येथील एका रिसॉर्टमध्ये ३७ वर्षीय रशियन पर्यटक तरुणीवर नेपाळी रूमबॉयनी बलात्कार केला होता. या प्रकरणातील संशयित शकील अन्सारी उर्फ सलमान झिरा जलाह याच्यावर किंवा त्याच्या कपड्यावर प्रथमदर्शनी कोणताही आक्षेपार्ह पुरावा आढळला नसल्याचे निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याला न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाण्यास बंदी घालून व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
पीडित रशियन पर्यटक तरुणीने २ डिसेंबर २०२२ रोजी कळंगुट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, कळंगुट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यात १ डिसेंबर २०२२ रोजी रशियातील १८ जणांचा पर्यटक गट गोव्यात आला होता. हे पर्यटक कळंगुटमधील एका रिसॉर्टमध्ये उतरले होते. पीडित व तिच्या दोन मैत्रिणी एका खोलीत वास्तव्यास होत्या. तिच्या मैत्रिणी रात्री अन्य मित्रांसह रिसॉर्टच्या आवारात फिरायला गेल्या होता. त्यावेळी पर्यटकांनी हॉटेल व्यवस्थापकाला खोलीच्या प्रसाधनगृहांची स्वच्छता करायला सांगितली होती. त्यानुसार, व्यवस्थापकाने संशयित शकील अन्सारी उर्फ सलमान झिरा जलाह याला स्वच्छता करायला सांगितले. दरम्यान, पीडित युवतीला अस्वस्थ वाटू लागल्याने तिने खोलीत आराम केला. त्यावेळी तरुणी खोलीत असल्याची कल्पना व्यवस्थापकाला नव्हती. याच दरम्यान संशयित सहिमुद्दीन अन्सारी हा देखील त्या खोलीत घुसला. तेव्हा ती रशियन तरुणी विवस्त्र अवस्थेत झोपल्याचे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसरा संशयित शकील अन्सारी उर्फ सलमान झिरा जलाह हा स्वच्छता करून बाहेर आला आणि त्यानेही तिच्यावर अत्याचार केला. इतर मैत्रिणी खोलीवर परतल्यानंतर पीडित तरुणीने त्यांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर व्यवस्थापकांनी याबाबत पोलिसांना पाचारण करून तक्रार दाखल केली.
पोलिसांनी शकील अन्सारी उर्फ सलमान झिरा जलाह व सहीमुद्दीन अन्सारी अब्दुल अली या दोघा नेपाळी रूमबॉयना अटक केली. यातील संशयित शकील अन्सारी याने म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर संशयित शकील अन्सारी उर्फ सलमान याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला.
या प्रकरणाची खंडपीठात सुनावणी झाली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात संशयित शकील अन्सारी उर्फ सलमान झिरा जलाह याच्यावर किंवा त्याच्या कपड्यावर प्रथमदर्शनी कोणतेही आक्षेपार्ह पुरावे आढळले नाहीत. याशिवाय पोलिसांनी ओळखपरेड केली नाही. तसेच पीडित युवती देशाबाहेर गेली आहे. त्यामुळे तिच्यावर दबाव घालण्याचा प्रश्न उपस्थित होत नसल्याचा युक्तिवाद संशयितातर्फे वकील गौतमी कामत यांनी खंडपीठात केला. या प्रकरणी खंडपीठाने दोन्ही पक्षाची दखल घेत संशयित शकील अन्सारी उर्फ सलमानला २५ हजार रुपयांच्या हमीवर, तितक्याच रकमेचा एक किंवा दोन हमीदार, दर महिन्याला पहिल्या शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान पोलीस स्थानकात हजेरी लावण्याचा, न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाण्यास बंदी घालून व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.