सुसाट थार जीपची रिक्षाला धडक

कोडली - तिस्क, किर्लपाल येथे अपघात : युवक बचावले

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th September 2023, 12:38 am
सुसाट थार जीपची रिक्षाला धडक

कोडली - तिस्क येथे अपघातानंतर गटारावर स्थिरावलेली जीप.

फोंडा : कोडली - तिस्क, किर्लपाल येथे सोमवारी दुपारी सुसाट वेगाने धवणाऱ्या थार जीपची धडक रिक्षाला बसल्यानंतर जीप रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारावर जाऊन स्थिरावली. अपघातात रस्त्याच्या बाजूला असलेले स्थानिक युवक सुखरूप बचावले. अपघातानंतर काहीवेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जीए-०४ एच-४२९३ या क्रमांकाची जीप उसगाव येथून सावर्डे येथे जात होती. त्यावेळी कोडली - तिस्क येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या परिसरात काही युवक स्लो मोटारसायकल स्पर्धेची तयारी करीत होते. यावेळी चालकाचे नियंत्रण गेल्याने थार जीप समोरून जाणाऱ्या रिक्षाला धडक दिल्यानंतर जीप रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात जाऊन उभी राहिली. या अपघातात रस्त्याच्या बाजूला उभे असलेले युवक मात्र सुखरूप बचावले. मात्र रिक्षाचे काही प्रमाणात नुकसान झाले.