विशाल गोलतकर खून प्रकरण : साई कुंडईकरचा जामीन अर्ज फेटाळला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th September 2023, 05:16 pm
विशाल गोलतकर खून प्रकरण : साई कुंडईकरचा जामीन अर्ज फेटाळला

पणजी : सराईत गुन्हेगार विशाल गोलतकर याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित साई उर्फ कोब्रा कुंडईकर हा जामिनावर असताना गंभीर गुन्हे करण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यानुसार, पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. याबाबतचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एडगर फर्नांडिस यानी दिला आहे.

सराईत गुन्हेगार विशाल गोलतकरचा मृतदेह १६ जुलै २०२३ रोजी मेरशी येथील ‘अपना घर’ जवळ रस्त्याच्या बाजूला झाडीत सापडला होता. त्याच्यावर चाकूने वार केल्याचे समोर आले होते. त्यामुळे हा खून असल्याचा पोलिसांनी कयास लावला होता. दरम्यान गोलतकर याच्या बहिणींनी जुने गोवा पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून संशयित साई उर्फ कोब्रा कुंडईकर, तुषार कुंडईकर या भावंडांसह ओंकार च्यारी, गौरेश गावस आणि अमेय वळवईकर या पाच जणांना अटक केली. याशिवाय पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्याची मेरशी येथील अपना घरात रवानगी केली. अटक केलेल्या पाच संशयितांना न्यायालयाने प्रथम पाच दिवस पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान या प्रकरणातील मुख्य संशयित साई उर्फ कोब्रा कुंडईकर वगळता इतर चार जणांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने संशयितांना सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणी मुख्य संशयित साई कुंडईकर याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयित साई कुंडईकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात २०१७ मध्ये प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी आरोप निश्चित केल्याची माहिती न्यायालयात सादर केली. याशिवाय ज्या दिवशी विशाल गोलतकर याच्या खून झाला होता. त्यावेळी संशयित कुंडईकर चाकू घेऊन फिरत होता. तसेच त्याने एका व्यक्तींवर चाकूने वार केल्याची माहिती न्यायालयात सादर केली. याची दखल घेऊन न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून मुख्य संशयित साई कुंडईकर याच्या जामीन फेटाळून लावला आहे.

हेही वाचा