अल सीक : खडकातून दिसणारी संस्कृती

Story: प्रवास | भक्ती सरदेसाई |
24th September 2023, 03:42 am
अल सीक : खडकातून दिसणारी संस्कृती

संध्याकाळच्या मंद प्रकाशात चमकणारं पेट्रा एक भुरळ पाडणारी जादू करून गेलं. आम्ही परतीच्या वाटेला लागलो. परत जवळजवळ तीन चार किलोमीटरची पायपीट. पण परतताना अद्वैत जागा असल्याने हे अंतर सहज पार झालं. आम्ही अल सिक ओलांडलं आणि एक गाडी वेगाने अल सिकच्या दिशेने येणारी दिसली. वाटेत थांबून थांबून ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला पिशव्या टाकत होते. आमच्या बाजूने ती गेली असता, लक्षात आलं की ते पेट्रा बाय नाईटची तयारी करत होते. दोन्ही बाजूला पिशव्यातून लॅंटर्नस् टाकले होते. ते उडून जाऊ नयेत म्हणून मूठभर रेतीही होती. गेटपाशी पोहोचताच तिथल्या पहारेकऱ्याने आम्हाला बघताच अद्वैतला हात दाखवून “कसं वाटलं पेट्रा?” असं विचारलं आणि मग आम्हाला उद्देशून “जर तुम्हाला वाटत असेल की पेट्राच्या आताच्या सफरीपेक्षा आणखी काही जादूई असू शकत नाही, तर पुन्हा विचार करा! रात्री या आणि पेट्राला भेट द्या” असं सांगितलं. 

पेट्राला भेट देणारा प्रत्येक प्रवासी विचार करतो- ‘पेट्राला रात्री भेट द्यावी की नाही ?’ ह्याचा खर्च वेगळा वसूल केला जात असल्याने ते कितपत ‘वॅल्यू फॉर मनी’ आहे हा विचार मनात येणं साहजिक. पेट्राच्या आजूबाजूला पाहण्यासारखं आणि करण्यासारखं बरंच काही आहे आणि त्यात ही जागा बजेट फ्रॅंडली डेस्टिनेशन पैकी तरी नक्कीच नसल्याने एकदा पाहिलेलं पेट्रा परत रात्री अतिरिक्त खर्च करून पाहणं योग्य आहे का हा विचार आमच्याही मनात येऊन गेला. पण माझं ठरलं होतं. हा अनुभव घ्यायचा. चांदण्यात न्हाऊन निघालेलं पेट्रा मला पहायचं होतं. 

रात्रीचं पेट्रा बघण्याची संधी आठवड्यातून तीन वेळा मिळते - दर सोमवार, बुधवार आणि गुरुवारी, ८.३० ते १०.३० पर्यंत पेट्रा रात्रीच्या अनुभवास खुलं असतं. जसं मी म्हटलं, तसं रात्रीची ही पेट्रावारी ‘जॉर्डन पास’ मध्ये समाविष्ट नाही – वेगळे 1८ JD (सुमारे दोन हजार रुपये) प्रति व्यक्ती खर्च करून एक वेगळं तिकीट खरेदी करावं  लागलं. अद्वैत आणि आदित्यने हॉटेलवर राहायचं ठरलं. मला आमच्याबरोबर आलेल्या त्या जोडप्याची सोबत होती म्हणून मग रात्रीचं गुडूप काळोखातून एकटं जाण्यास काहीच वाटलं नाही. ‘पेट्रा बाय नाईट’ची तिकिटं अमर्यादित उपलब्ध असतात आणि व्हिजिटर सेंटर, पेट्रामधील स्थानिक टूर एजन्सी किंवा अनेक हॉटेल्सच्या रिसेप्शनमधून खरेदी केली जाऊ शकतात. आम्ही आमच्या हॉटेलमधून घेतली. प्रत्येकी १ JD अधिक द्यावा लागला. 

सुमारे अर्धा तास अंधारात चालत, चाचपडत आणि पडत धडत आम्ही परत एकदा अल सिक पार केलं. मार्ग फक्त लॅंटर्नस्मधल्या मेणबत्त्यांनी प्रकाशित होता. दिवसाच्या पेट्रा भेटीहून हा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. सिक ओलांडणारे घोडे आणि गाड्या नाहीत, कोणतेही मोठे पर्यटक गट नाहीत आणि स्पष्टीकरण देणारे मार्गदर्शक नाहीत. सापेक्ष अंधार लक्षात घेऊन पेट्रा बाय नाईट पहायला अल सिक पुन्हा एकदा पायी पार करण्याची मनाची तयारी मात्र हवी. सिक ओलांडून रात्री चालणं माझ्या मते, संपूर्ण पेट्रा बाय नाईट अनुभवातील सर्वोत्तम गोष्टींपैकी एक होतं – जवळजवळ संपूर्ण शांतता, पावलांच्या आवाजाखेरीज दुसरा कोणताही आवाज नाही. एकदा तुम्ही ट्रेझरीमध्ये पोहोचल्यावर, प्रकाशासाठी अनेक लॅंटर्नस्, अल खजानेला प्रकाशमय करण्याचा प्रयत्न करताना दिसले. आम्ही त्या सौंदर्याच्या प्रेमात पडलो. आजूबाजूला आ वासून त्या मोहक दृश्याला जमेल तितकं डोळ्यात भरण्याचा प्रयत्न सुरू असताना आम्हाला बसण्यास सांगितलं गेलं आणि मग ज्यासाठी आलो होतो तो शो सुरू झाला. अगोदर एका वादकाने रब्बा वाजवून माहोल तयार केला, रब्बा म्हणजे एक प्राचीन बासरीसारखं वाद्य, आणि त्याच्या त्या वादनाने आम्ही मंत्रमुग्ध होताच त्याने एक बेडूइन गीत सुरू केलं आणि “रंग में भंग” केला. त्याच्या गायकीची दाद घाईघाईने द्यावी आणि ह्याला मोकळा करावा एकदाचा असं वाटत होतं.  शेवटी एकदाचं त्याने ते बेसूर गाणं म्हणून संपवलं. तो गेला आणि त्याच्या जागी इथला एक मार्गदर्शक आला आणि आम्हाला कथा सांगू लागला. 

क्रमशः