शेपूचे हिरवेगार पोळे

Story: उदरभरण | कविता आमोणकर |
24th September 2023, 03:37 am
शेपूचे हिरवेगार पोळे

शेपू ही गांवठी भाजी तिच्या वेगळ्या सुगंधामुळे प्रसिद्ध आहे. ही भाजी गोव्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध असून तिची मुगडाळ किंवा चणाडाळ घालून केलेली भाजी ही चविष्ट लागते. शेपूचे पोळे हा गोव्याचा पारंपरिक पदार्थ असून हे या पोळ्यात शेपूची भाजी वापरल्याने पोळ्यांना सुंदर असा हिरवा रंग येतो आणि असे हे हिरवेगार पोळे शेपूच्या अनामिक सुगंधामुळे फार छान लागतात. चहासोबत हे पोळे खाताना ते अधिक चविष्ट लागतात.

साहित्य 

१ कप तांदूळ, पाव कप उडीद डाळ, १ जुडी शेपू भाजी, अर्धा कप गूळ, अर्धा कप ओला खोवलेला नारळ, चिमूटभर बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, थोडे तूप.

कृती  

सकाळी सर्वप्रथम तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुवून सहा-सात तास पाण्यात भिजत ठेवावी. शेपूची भाजी चार-पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्याचे सर्व देठ काढून टाकावेत व फक्त हिरवे तुरे निवडून घ्यावेत. संध्याकाळी तांदूळ, उडीद डाळ, शेपूचे तुरे, खोवलेला ओला नारळ आणि गूळ हे सर्व मिश्रण मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे. मिश्रण सरसरीत होईल इतपत पातळ करावे. पोळे करावयाच्या वेळी या मिश्रणात चवीनुसार मीठ व पाव चमचा बेकिंग पावडर घालावी. मग जाडसर तवा गॅसवर ठेवून त्यावर थोडे तूप घालून दोन्ही बाजूने तांबूससर भाजून गरमागरम पोळे काढावेत. पोळे काढताना एकदा तवा गरम झाला की गॅसची आच मंद ठेवून सर्व पोळे करून घ्यावेत. बेकिंग सोडा घातल्याने या पोळ्यांना छानसर जाळी पडते. चहासोबत खाण्यासाठी हा पौष्टिक पदार्थ आहे. नक्की करून पहा.