स्वित्झर्लंडमध्ये बुरखाबंदीचे उल्लंघन केल्यास दंड

विश्वरंग : स्वित्झर्लंड

Story: सुदेश दळवी |
23rd September 2023, 02:43 am
स्वित्झर्लंडमध्ये बुरखाबंदीचे उल्लंघन केल्यास दंड

स्वित्झर्लंडमध्ये बुरखा किंवा नकाब घालणे तसेच चेहरा झाकण्यावर नुकतीच बंदी घालण्यात आली आहे. स्विस संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने बुरख्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे आता स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी तोंड, नाक आणि डोळे झाकणारा मास्क किंवा बुरखा घालता येणार नाही. तरीही कोणी बुरखा घातल्यास ते बेकायदेशीर कृत्य मानले जाईल. तसेच या बंदीचे फेडरल कायद्यात रूपांतर केले असून याचे उल्लंघन करणार्‍यांना एक हजार स्विस फ्रँक म्हणजेच ९२ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
यापूर्वी युरोपमधील फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रिया, डेन्मार्क आणि नेदरलँड या देशांनी चेहरा झाकण्यावर बंदी घातली आहे. युरोपबाहेर चीन आणि श्रीलंकेतही बुरख्यावर बंदी आहे. आता स्वित्झर्लंडही या देशांमध्ये सामील झाला आहे. स्विस संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याबाबत झालेल्या मतदानात १५१ खासदारांनी याच्या बाजूने मतदान केले, तर २९ खासदारांनी विरोधात मतदान केले. हा प्रस्ताव स्वित्झर्लंडच्या वरिष्ठ सभागृहाने यापूर्वीच स्वीकारला आहे.
जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये सर्वाधिक निर्णय जनमताने घेतले जातात. २०२१ मध्ये देशभरात सार्वजनिक ठिकाणी आणि खासगी इमारतींमध्ये बुरख्यावर बंदी घालण्याबाबत सार्वमत घेण्यात आले. या सार्वमतामध्ये ५० टक्के लोकांनी बुरख्यावरील बंदीच्या बाजूने मतदान केले.
स्वित्झर्लंडमधील एगरकिनझेन समितीने सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्यासाठी २०१६ मध्ये प्रयत्न सुरू केले. त्यानंतर २०२१ मध्ये मतदान झाले. स्वित्झर्लंडच्या राष्ट्रवादी स्विस पक्षाने कट्टरपंथी इस्लामविरुद्ध मोठा विजय म्हणून सार्वमताच्या निकालांचे स्वागत केले. स्वित्झर्लंडमधील दक्षिण टिसिनो आणि उत्तर सेंट गॅलन या दोन प्रशासकीय प्रदेशात आधीपासूनच समान कायदे लागू आहेत. हा राष्ट्रीय कायदा स्वित्झर्लंडला बेल्जियम आणि फ्रान्ससारख्या देशांच्या पंक्तीत ठेवतील ज्यांनी याबाबत अशाच उपाययोजना केल्या आहेत.
दरम्यान, बुरखाबंदीचा कायदा झाल्यानंतर महिलांना सार्वजनिक ठिकाणी चेहरा पूर्णतः झाकता येणार नाही. स्विस पीपल्स पार्टीसह अन्य पक्षांनी आपल्या प्रस्तावात कुठेही इस्लाम शब्दाचा उल्लेख केलेला नव्हता. तथापि, काही घटकांनी ही बुरखाबंदी असून, इस्लामविरोधी असल्याचे म्हटले आहे. स्वित्झर्लंडची लोकसंख्या साधारण ८६ लाख असून, यातील ५.२ टक्के लोक मुस्लिम आहेत. देशातील सार्वजनिक ठिकाणी महिलांना बुरखाबंदी असेल. मात्र, ती धार्मिक स्थळांवर नसेल. आजार रोखले जावेत तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव महिलांना बुरखा वापरता येईल. ज्या कार्यक्रमात बुरख्याची परंपरा असेल, तिथे बुरख्यास बंदी नसेल. या प्रस्तावात परदेशी प्रवासी आणि अन्य लोकांनाही सूट नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाच स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या सर्व्हेनुसार येथील ३० टक्के महिला हिजाब किंवा नकाब घालत असल्याचे समोर आले होते.
स्वित्झर्लंडच्या संसदेने आणि देशातील सरकारने तयार केलेल्या सात सदस्यीय कार्यकारी परिषदेने या जनमत चाचणीमधील मतदानाला विरोध करत बंदीचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले आहे. तसेच स्वित्झर्लंडमधील सर्व धार्मिक गटांचे नेतृत्व करणार्‍या संस्थेनेही या निर्णयावर विरोध केला आहे.