मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेताय ?

"घ्याव्याच लागल्या गं गोळ्या... घराय अजून कोणी सवाशिण नाहिये, देव काम कसं होणार मग..." सिद्धी सांगत होती.

Story: आरोग्य | डॉ. श्वेता राऊत मुळगावकर |
23rd September, 03:16 am
मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेताय ?

आज चतुर्थीचा पाचवा दिवस. गोवातल्या एकूणएक महिलावर्गाला व्यस्त ठेवणारा हा सण. गणपती घरी असताना अगदी पुरेपूर आनंद लुटता यावा, देव कामात मधे काही अडचण, त्रास नको म्हणून आपल्यामधल्या कितीतरी महिलांनी मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या नक्कीच घेतल्या असतील. चतुर्थी, दिवाळी, काही महत्त्वाचे उत्सव, लग्ने, विधित सहभागी होता यावे हे कारण घेऊन महिलावर्गाकडून या गोळ्यांचे सर्रास सेवन केले जाते. खूप वेळा तर ती स्थितीच अशी असते की आपण असहाय्य होऊन त्या गोळ्या घेऊन पाळी पुढे नेतो. असो, सणवार किंवा अजून कोणतेही कारण, मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य वाटते?

आपल्या शरीरातील हार्मोनल बदल आपल्या मासिक पाळीची वेळ ठरवतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात, अंडाशयातून तयार होणाऱ्या इस्ट्रोजेन हार्मोनमुळे गर्भाशयाचे अस्तर जाड होते. त्यानंतर ओव्हुलेशन काळ येतो व पुढील दोन आठवड्यांपर्यंत प्रोजेस्टेरॉन हार्मोन गर्भाशयाच्या अस्तराचे रक्षण करते आणि फलित अंड्याच्या प्रवेशासाठी तयार होते. मग, जर गर्भधारणा झाली नाही तर, प्रोजेस्टेरॉनची पातळी आपोआप कमी होते व गर्भाशयाचे अस्तर तुटले जाते ज्यामुळे मासिक पाळी सुरू होते. 

मासिक पाळीला पुढे नेण्यासाठी खूप प्रकारच्या गोळ्या उपलब्ध आहेत. एस्ट्रोजेन किंवा प्रोजेस्टेरॉन असलेल्या गर्भनिरोधक गोळ्या आणि इतर प्रकारात हार्मोन रिलीझिंग इंट्रायूटराईन डीवाय्स असतात. सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांत नोरेथिस्टेरॉन या सिंथेटिक प्रोजेस्टोजेनचा वापर केला जातो, जो शरीरात नैसर्गिक प्रोजेस्टेरॉनसारखा प्रभाव निर्माण करतो. या घेतल्याने शरीरातील प्रोजेस्टेरॉन होर्मोनची पातळी कमी न होता कृत्रिमरित्या तेवढीच राहते व जाड झालेले गर्भाशयाचे अस्तर तसेच राखून उरते. अशाने गोळ्या थांबविल्यापर्यंत पाळी येत नाही. यांच्या वापराने मासिक पाळी साधारणपणे दोन आठवड्यांपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते.

काही महिलांचे चक्क असेही म्हणणे आहे की आता मुले-बाळे झालीये, तर आपण या गोळ्या बिनधास्त घेऊ शकतो. पण असा विचार करणे चुकीचे आहे. कारण मुले झाली तरी मासिक पाळीचे चक्र हे रजोनिवृत्तीपर्यंत नैसर्गिकरित्या ठरलेल्या क्रमानं चालू असते आणि त्यात अडथळा आणणे म्हणजे स्वतःच्या आरोग्याला हानी पोहोचविण्यासारखे आहे. 

तरूणी किंवा अजून गर्भधारणा न झालेल्या महिला वारंवार या गोळ्या घेत असल्यास, मासिक पाळीचे नैसर्गिक चक्र बदलल्याने, पाळी अनियमित होऊ शकते, त्यांच्या गर्भधारणेत समस्या येऊ शकतात व पुढे व्यंधत्वासारख्या समस्या उद्भवू शकतात. वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेतल्यास काही महिलांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो ज्यामुळे अशक्तपणा, अनेमिया होऊ शकतो. गोळ्यांचे दीर्घ काळपर्यंत सेवन केल्याने रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते व डीप व्हेन थ्रॉम्बोसिस होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे पुढे मेंदू किंवा ह्रदयाला गंभीर इजा पोहोचण्याचीही शक्यता असते. कधी कधी डायरिया, पोटात दुखणे अशा समस्या होऊ शकतात म्हणूनच पाळी पुढे नेण्याच्या गोळ्या घेणे टाळलेलेच बरे.

या औषधांचे सेवन प्रत्येक महिलेच्या शरीरावर वेगवेगळे दुष्परिणाम दाखवू शकतात. योनीतून अनियमित रक्तस्त्राव, मूड बदलणे, ओटीपोटात अस्वस्थता, मळमळ, श्वास घेण्यास त्रास हे गोळ्यांचे काही साधारण दुष्परिणाम आहेत. आधीच पाळीदरम्यान अनियमित रक्तस्त्राव, निदान न झालेल्या स्तनातील गाठी, स्तनाचा कर्करोग किंवा कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असल्यास, शरीरात कुठेही रक्ताच्या गुठळ्या होण्याचा पूर्वीचा इतिहास, फीट्स येणे किंवा अँटीकॉनव्हलसंट थेरपीवर असलेल्या स्त्रियांमध्ये गोळ्यांचा वापर हा वैद्यकीय सल्ल्याशिवाय कटाक्षाने टाळावा.

गोळ्या घेणे थांबविल्यानंतर वेळेत पाळी न आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे. तसेच पुढील पाळीच्या नियमिततेवर लक्ष ठेवावे. पाळी पुढे नेण्याच्या गोळ्या या गर्भनिरोधक नाहीत आणि गर्भधारणा टाळण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकत नाही हे सुद्धा ध्यानात असावे. फार्मसीमध्ये सहजपणे मिळत असल्या तरी मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या आपण परस्पर घेऊ नये. आपली तपासणी करून घेऊन वैद्यकीय सल्लानुसारच या गोळ्या घ्याव्या. कधी चुकून एखाद्या वेळेस गोळ्या घेऊन मासिक पाळीचं चक्र बदलणे तरीही ठिक आहे, पण त्याची सवय मात्र लावून घेऊ नये. सणांसाठी मासिक पाळीचं चक्र बदलणे, नैसर्गिक क्रियेत अडथळा आणणे कधीही वाईटच व ते आपल्या आरोग्यावर उलट पडू शकते याची जाण असावी.