माहेरचा आहेर

दिवस : रविवार, स्थळ : मुंबई - माहीम येथील तेंडुलकर हॉल... निमंत्रणानुसार सांगितलेल्या वेळेत उपस्थित राहावयाच्या सवयीप्रमाणेच सकाळी ठीक पावणेदहा वाजता हॉलला माझे पाय लागले. एन. के. जी. बी. संघाच्या 'ठाणे मंच'च्या प्रमुखद्वयांनी प्रवेशद्वारातच माझं सस्मित स्वागत केलं. इतकी वर्ष गोव्यातील साहित्यिक कार्यक्रमासाठी येणाऱ्या निमंत्रितांच्या स्वागतासाठी उभी राहणाऱ्या माझ्या, त्या दिवशीच्या मुंबईतल्या पहिल्या वहिल्या स्वागताने मी आनंदले. 'पाहुणपणाचा' हा पहिला आनंदकण मी पटकन ओंजळीत झेलला.

Story: अनुभव | मीरा प्रभूवेर्लेकर |
23rd September 2023, 03:10 am
माहेरचा आहेर

अडकलात ना प्रश्नांच्या चक्रात थांबा सांगते ठाणे मंचचे अध्यक्ष सुरेशबाब पाळेकर यांच्या कानात 'कुठूनशी आली मम नामाची कुणाकुण' हे मला नाही माहीत, परंतु मीरा प्रभूवेर्लेकर ही गोव्यातली एक लेखिका मूळची कारवारची कन्या आहे हे समजताच, त्यांची पावलं गोवा भेटी दरम्यान म्हापश्याला माझ्या घराकडे वळली. 'ठाणे मंच'च्या वार्षिक स्नेहसंमेलनाची प्रमुख पाहुणी म्हणून निमंत्रित करण्यासाठी त्यांनी निमंत्रित करताच मी ते तात्काळ (साश्चर्य) स्वीकारलंही आणि मोकळी झाले.

 'मोकळी झाले खरी' हे वाचताच तुमच्या मनात आत्ता ज्या प्रश्नांनी गर्दी केली त्याच प्रश्नांनी त्यांनी मला निमंत्रित केल्या वेळी माझ्या मनात घुसखोरी करून धुडगूस घातला होता. पण मनात उमटलेल्या प्रश्नांना ओठांचा उंबरठा ओलांडून न देता ओठातूनच त्यांना माघारी परतवून लावून त्यांचं निमंत्रण मी बेधडक स्वीकारलं होतं. ते यासाठी की या कार्यक्रमासाठी जमणारी आणि मुंबईकर म्हणून घेणारी मंडळी मूळची कारवारकर म्हणजे सारे आपलेच तर गणगोत असतील. मग का बरं संकोच बाळगावा या विचाराने!

तसंच मी कोणतंही कर्तृत्व केलेलं नसताना मला प्रमुख पाहुणीचा मान देण्याचं त्यांचं एकमेव प्रयोजन मला दिसत होतं ते म्हणजे, प्रत्येक आई-वडिलांना जसा आपल्या लेकराने केलेल्या कुसपट कामाचं कौतुक चार जणांच्या कानावर घातल्याशिवाय सुख लागत नाही, तसंच काहीसं माझ्याबाबत झालं असावं. या कारवारच्या कन्येने गोव्यात जाऊन साहित्य क्षेत्रात पाऊल टाकून भलेही कणभर खरडलेलं असेना का, तिचं कौतुक व्हायला हवं. या उदात्त आणि आपुलकीच्या भावनेने त्यांनी मला प्रमुख पाहुण्याच्या खुर्चीवर नेऊन बसवलं आणि तुम्हाला सांगते त्या साडेतीन तासात मी आपुलकीने भरलेले आनंदकण वेचतच गेले.. वेचतच गेले...

 एन.के.जी.एस.बी. संघाच्या मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या त्रैमासिक मुखपत्रिकेत माझे या निमित्ताने लेख प्रसिद्ध होत असतात त्यामुळे माझ्या कारवारकर बांधवांना माझी अक्षर भेट झालेली आहेच. आता प्रत्यक्ष मुखामुखी भेट होईल यासाठी मी आसुसलेली होते, तसंच ती ही सारी मंडळी उत्सुक होती हे मला मी सभागृहात प्रवेश करताच ९० अंशात माझ्या दिशेने वळलेल्या त्यांच्या मानांवरून लक्षात आल्यापासून राहिले नाही. तोही एक उभरा क्षण मी उचलला आणि ओंजळीत टाकला. मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर मुलाखतीचा एक तास रंगला. शैलाताई नाडकर्णी आणि रवींद्र बोरकर या ज्येष्ठांनी माझी मुलाखत घेतली. मोठ्या खुबीने विचारलेल्या प्रश्नांना मी भीड-मुर्वत न ठेवता अगदी बिनधास्तपणे दिलेल्या हास्यप्रधान उत्तरांवर मिळालेल्या टाळ्या, हशा आणि उत्स्फूर्त दादी यांनी माझं मन उत्फुल्ल झालं.  कारवार सोडून बरीच वर्षं लोटली. गावाकडची माणसं भेटणं दुरापास्तच चाललंय. परंतु संमेलन त्यांच्या भेटीचा दुवा ठरलं. माझ्या बालपणात मी पाहिलेल्या त्या वेळेच्या तरुणांची एवढा काळ लोटल्यावर भेट झाली. पण कोणत्या अवस्थेत? हातात काठी, वॉकर, कानाला श्रवण यंत्र, कमरेला मेडिकल बेल्ट अशा विविध साधनांची दोस्ती केलेल्या वृद्धावस्थेत. आनंद, करूणा, दुःख अशा संमिश्र भावनांनी मन व्यापून गेलं. जुन्या आठवणींनी मनाभोवती गराडाच टाकला. जुन्या पिढीतील व्यक्तींचे नातू, पणतू वगैरे येऊन आपापल्या आजोबांची नाव सांगून आपली ओळख मला पटवून देत होते. कित्येक वर्षं खंडित झालेल्या या परिचयावर आता या तरुणांच्या भेटीने स्नेहाची, आपुलकीची पुटे चढू लागली. या माहेरवाशीणीसाठी याहून अनमोल भेट ती कसली असेल?  कारण यंत्रयुगात वावरताना मानवी मनही यंत्रवत, शुष्क, असंवेदनशील होत चालण्याचा अनुभव पदोपदी येत असताना हे स्नेहसंमेलन माझ्यासाठी वाळवंटातलं ओएसिस होतं. दोन पिढ्यांना जोडून देणाऱ्या या संमेलनाने माझ्या ओंजळीत अनेक रूपात टाकलेले आनंदाचे कण हा माझ्यासाठी माहेरचा अनमोल अहेर आहे. क्षणाक्षणाला झेललेल्या या आनंदकणांनी भरगच्च भरलेली ओंजळ घेऊन मी कारवारची माहेरवाशीण 'माझ्या गोव्याच्या भूमीत' सासुरवाडीला परतले... भारलेल्या मनाने.