ॐकार प्रधान रूप गणेशाचे

Story: विषेश।वेदमूर्ती ज्ञानेश्वर पाटील |
18th September 2023, 10:56 pm
ॐकार प्रधान रूप गणेशाचे

वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये मनुष्याचा सर्वांगीण विकास व्हावा, मनुष्याचे जीवन प्रफुल्लित, उत्साहित राहून अभ्युदय प्राप्त व्हावा यासाठी सण-उत्सव, व्रत - वैकल्यांची मांडणी केलेली आहे. या सण-उत्सवांच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला आहे. गणेश चतुर्थी सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोणत्याही कार्यारंभी त्या मंगलमूर्तीचे स्मरण करण्याचा शास्त्र सल्ला आहे. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा। सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते॥ असे आपण नियमित पूजेत म्हणत असतो. विद्यारंभ करत असताना, विवाहाच्या वेळी, गृहप्रवेश करीत असताना, प्रवासात किंबहुना सर्वच कार्यारंभी मंगलमूर्तीचे स्मरण केल्याने कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होते, असे आप्त वचन आहे.             

निर्गुण, निराकार ईश्वराचे सगुण स्वरूप म्हणजे गणेश होय. योगशास्त्रकार पतंजली मुनी सांगतात; तस्य वाचक: प्रणव:। ओंकार हे ईश्वराचे वाचक म्हणजे नाव आहे. सर्व उपनिषदादि ग्रंथांनी या प्रणवाचे उद्गीथ विद्या असे वर्णन केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात; ॐ नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा॥ देवा तूची गणेशु सकलार्थ मति प्रकाशु। म्हणे निवृत्ती दासु अवधारि जो जी॥ साक्षात् आत्म तत्वालाच गणेश असे म्हटल्याचे या संदर्भावरून ज्ञात होते. या आत्म तत्वाला प्रणव हे नामाभिधान देऊन वर्णन करताना म्हणतात; अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे। ओंकाराचे चिन्ह आडवे आहे. या चिन्हाला उभे करून पाहिले तर आपल्या लक्षात येईल ओंकारामध्ये असलेला अकार हे दोन्ही चरण आहेत, उकार हे पोट आहे आणि वर असलेला अर्धचंद्र तोंडाप्रमाणे स्पष्ट दिसू लागेल. ‘ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन्’ या प्रणवाला साक्षात् ब्रह्म असे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात.             

ओंकार प्रधान रूप गणेशाचे। हे तिन्ही देवांचे जन्म स्थान। अशी संत  तुकाराम महाराजांनी या गणेशाची महिमा गायिली आहे. या सर्व संदर्भावरून आपल्याला जाणीव होते, निर्गुण, निराकार असलेल्या परब्रह्माला गणेश हे नामाभिधान आहे, आधी गण नमीला गण नमीला रंग रूप नाही त्याला। अशी संतांची वचने आपल्याला निर्गुण परब्रह्माचा बोध करून देतात.                                    

गणपती सर्व गणांचा अधिपती आहे. म्हणूनच वेद वाङ्मयात ‘गणानां त्वा गणपतिं हवामहे’ असे म्हटले आहे. अथर्वशीर्षात या गणेशाचे वर्णन करीत असताना निर्गुण स्वरूपाच्या अनुषंगाने ‘त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि। त्वमेव कर्तासि। त्वं साक्षात् आत्मासि नित्यम्।’  असे वर्णन केले आहे. ध्येय प्राप्तीपर्यंत पोहोचू इच्छिणार्या मुमुक्षु साधकाला त्या निर्गुण स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याकरिता सगुणाचा आधार घ्याव्याच लागतो. त्यामुळे सगुण स्वरूपात ॠषी-मुनींना स्फुरलेले गणेशाच्या स्वरूपाचे ‘एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुश धारिणम्। असे वर्णन केले आहे. या सगुण स्वरूपामागे प्रतिकात्मक भावना दडलेली आहे. गणपतीप्रमाणे जर बुद्धिवान व्हायचे असेल तर या गणेशाच्या प्रतिकात्मक स्वरूपातून शिकवण घेण्याची गरज आहे. गणपतीच्या सूपाएवढ्या कानातून बुद्धिवान होऊ इच्छिणार्या साधकाने मुबलक प्रमाणात श्रवण करावे. गणपतीचे बारीक डोळे आहेत. गणपतीला दोन दात आहे त्यापैकी एक दात तुटलेला आहे, प्रकृती आणि पुरुष ही सुद्धा दोन तत्वे आहेत. त्यापैकी प्रकृती हे तत्व नष्ट होणारे आहे व पुरुष हे तत्व अजरामर, अविनाशी आहे, हे या एक दाताचे प्रतिकात्मक स्वरूप आहे. गणेशाची सोंड म्हणजे हत्ती ज्याप्रमाणे गवत खात असताना मुंग्या, किडे पोटात जाऊ नये यासाठी झटकून  खातो, त्याचप्रमाणे कोणतेही विषय किंवा विद्या ग्रहण करीत असताना सद्सद् विवेक बुद्धीने योग्य आहे तेच आत्मसात करावे. हातामध्ये असलेले मोदक म्हणजे गोमुखी न्यायाने आत्मसात करण्यास सांगतात. गोमुखी न्याय म्हणजे छोट्या प्रमाणात सुरुवात करून उत्तरोत्तर व्यापक वृद्धी करणे होय. विद्या छोट्या प्रमाणात जरी सुरुवात केली तरी कालांतराने व्यापक प्रमाणात विद्यार्जन करावे याचा बोध देतात. हातामध्ये असलेले पाश, अंकुश स्वत:वरही अंकुश ठेवण्याची शिकवण देतात. कित्येकदा असाही प्रश्न येतो की, एवढा भला मोठा गणपती उंदरावर बसून जाणे कितपत शक्य आहे? पण बुद्धिवान होऊ इच्छिणार्यांनी उंदिर ज्याप्रमाणे वस्तू, कपडे कुरतडतो त्याप्रमाणे शंका, कुशंका आपल्या ज्ञानाला कुरतडू नये त्यासाठी त्वरित शंकासमाधान किंवा उत्तर शोधावे याची जाणीव करून देण्यासाठी ज्ञानाने शंका निरसन करण्यासाठीच गणपती उंदरावर आरूढ झालेला आहे. 

बर्फ ज्याप्रमाणे पाण्यात घातल्यानंतर कालांतराने पाण्यात एकरूप होतो आणि स्वत:चे अस्तित्व उरत नाही, मूर्तीत अडकलेल्या साधकांनी सुद्धा परब्रह्म या तत्वाशी एकरूप व्हावे याचा बोध करणारी गणपती विसर्जन ही संकल्पना आहे. सद्यकालीन स्थितीत मूर्ती विसर्जनाने निसर्गाचा र्हास होतो अशी कागाळी ऐकू येते मात्र मूळ संकल्पनेतच गणेशाची पार्थिव मूर्ती पूजण्याचे हिंदू धर्मात सांगितले आहे. हिंदू धर्माचे निसर्गाप्रती असलेले प्रेम ज्ञात होते. या निर्गुण, निराकार गणेश स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याकरिता सद्गुरूना शरण जाण्याची आवश्यकता आहे. केवळ सद्गुरूच या तत्वाचा बोध करून देऊ शकतात.