ड्रग्ज, दारुचे थैमान आणि समाज

वर्तमानपत्रांतून, टीव्ही चॅनलवरून समाजातील धक्कादायक वास्तव समोर आणले जाते. पण ते स्वीकारण्याचे धाडस कोणी करत नाही. व्यवस्थेच्या दुर्गुणांवर बोट ठेवले तर ही व्यवस्था योग्य प्रकारे त्याचे बोट कापण्याचे काम करते. गोव्यात ड्रग्ज आणि दारुच्या व्यसनामुळे मानसिक आजारांनी त्रस्त असलेले किंवा या दोन्हीच्या व्यसनांमुळे गंभीर आजारांचा सामना करणारे हजारो लोक उपचार घेत आहेत. ‘गोवन वार्ता’ने हे सत्य बाहेर आणले. दारुच्या व्यसनामुळे आजारी पडणाऱ्यांपैकी दरवर्षी शेकडो जणांचा मृत्यू होत आहे, पण त्याकडे लक्ष दिले जात नाही.

Story: उतारा। पांडुरंग गांवकर |
17th September, 12:54 am
ड्रग्ज, दारुचे थैमान आणि समाज

वाचकांची आवड बदलल्याचे वेबसाईट्स, फेसबुकवरील बातम्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून दिसते. हातातील मोबाईलवर जग मिळत असेल आणि तिथे वाचनीय मजकूर मिळत असेल, तर लोक तो वाचतात. मोठ्या प्रमाणात वाचतात. त्यामुळे आपण शोधून आणलेली एखादी बातमी पेपरलाच छापणार, असे म्हणणारा पत्रकार वेडाच ठरेल. हल्लीच्या काळात शोध पत्रकारिता करून किंवा एखाद्या गोष्टीचे वास्तव समोर आणले तरी कोणाला काही फरक पडत नाही. मनोरंजनाचा मारा एवढा होत आहे की त्यात खऱ्या बातम्यांकडे समाज आणि सरकारी यंत्रणेचेही दुर्लक्ष होत आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या मनोरंजनामुळे खऱ्या समस्यांकडे पाठ फिरवली जात आहे. चांगल्या पत्रकारांनी खचून जाण्यासारखी थोडी स्थिती आहे. वरवरच्या आणि लेबल लावलेल्या गोष्टी आम्हा सर्वांनाच आवडू लागल्यामुळे चांगल्या तपासपूर्ण बातम्या किंवा अभ्यासपूर्ण लेखनाला वावही कमी झाला आहे. फिक्शन आणि कल्पनाचित्रे यांचा जमाना आला. जसे काही वर्षांपूर्वी गुरुनाथ नाईक, बाबुराव अर्नाळकर या दिग्गजांनी मराठी वाचकांवर जसे गारुड निर्माण केले, तशाच फिक्शनचा काळ आजही शिखरावर आहे. इंग्रजी कादंबऱ्या, फिक्शन्स सध्या जोरात आहेत. पण म्हणून घडलेल्या गोष्टी लिहायच्या नाहीत असेही नाही. जसे फिक्शन आवडते तसे सत्य, चरित्र्यकथाही आवडणारा वाचक, समाज आहे. त्यांच्यासाठी लिहीत रहायला हवे.

सोशल मीडियाच्या जमान्यात खरा वाचक दुर्लक्षित होत असेल. कारण सोशल मीडियावर वरलिया रंगा भुलण्याचे प्रकार जास्त असतात. पण सत्य हे सत्य असते. वाचकांची आवड कमी झाली असली तरी आता त्याला जे अभिप्रेत आहे अशा पद्धतीने सत्यकथा आणि बातम्या द्याव्या लागतील. प्रादेशिक पत्रकारितेसमोर हे एक आव्हान आहे. हा विषय निघण्यामागचे कारण म्हणजे समाजातील वास्तव समोर येत असतानाही त्यावर बोलण्याची मनोवृत्ती आता नाही. त्यावर काहीतरी कृती करावी असे सरकारी यंत्रणेला वाटत नाही. कारण प्रत्येकाला कुठल्याही गोष्टीमध्ये आपला काही फायदा आहे का? याचीच चिंता असते. फक्त आपला तोच विषय. इतरांच्या विषयाशी आपल्याला देणेघेणे नाही असा एक विचार प्रवाह तयार होऊ लागल्यामुळे समाजातील वास्तव मांडूनही ते स्वीकारले जात नाही किंवा त्या गोष्टीविरोधात पेटून उठण्याची धमकही दाखवली जात नाही. राजकारणात सत्तेतले तसेच विरोधकही. राजकारणी आपल्याला मायलेज मिळेल अशाच गोष्टींकडे लक्ष देतात. समाज आतून पोखरला जात असेल तर त्याच्याशी त्यांना काही देणेघेणे नाही.

वर्तमानपत्रांतून, टीव्ही चॅनलवरून समाजातील धक्कादायक वास्तव समोर आणले जाते. पण ते स्वीकारण्याचे धाडस कोणी करत नाही. व्यवस्थेच्या दुर्गुणांवर बोट ठेवले तर ही व्यवस्था योग्य प्रकारे त्याचे बोट कापण्याचे काम करते. गोव्यात ड्रग्ज आणि दारुच्या व्यसनामुळे मानसिक आजारांनी त्रस्त असलेले किंवा या दोन्हीच्या व्यसनांमुळे गंभीर आजारांचा सामना करणारे हजारो लोक उपचार घेत आहेत. ‘गोवन वार्ता’ने हे सत्य बाहेर आणले. दारुच्या व्यसनामुळे आजारी पडणाऱ्यांपैकी दरवर्षी शेकडो जणांचा मृत्यू होत आहे, पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. चुकीचे रस्ते, नादुरुस्त रस्ते, पोलीस आणि वाहतूक खात्याचे दुर्लक्ष यामुळे रस्त्यांवरील अपघातांमध्ये दरवर्षी दोनशे ते तीनशे लोक दगावतात. पण त्यावरही संबंधित खात्यांना कोणी जाब विचारत नाही. दर तीस तासाच्या अंतराने अपघाताने एकाचा मृत्यू होतो. रोज एका माणसाचा दारुच्या व्यसनामुळे जडलेल्या आजाराने मृत्यू होतो. ड्रग्जच्या आहारी गेलेले तीन रुग्ण दर आठवड्याला उपचारांसाठी येतात. पण गोव्यातील या वास्तवावर कुठलीच यंत्रणा गंभीरपणे काम करत नाही. कदाचित हा राजकीय लाभाचा भाग नसावा. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होत असावे. पण समाजालाही या गोष्टींची फार चिंता नाही. कारण अशा गोष्टींकडे समाजही गांभीर्याने पाहत नाही.

एका डॉक्टराच्या म्हणण्याप्रमाणे, ड्रग्जच्या समुपदेशनासाठी आणि मानसिक संतुलन बिघडत असल्यामुळे उपचारांसाठी येणाऱ्यांमध्ये गरीब घरातील युवकांपासून ते प्रचंड पैसा अडका असलेल्यांच्या मुलांचाही समावेश आहे. म्हणजे ड्रग्जच्या व्यसनाने एखादा ठराविक वर्गच आज पीडित नाही, तर सगळ्याच घटकांतील मुलांना यात ओढले आहे. ड्रग्ज आणि दारुच्या आहारी गेलेल्यांवर जे उपचार सुरू असतात त्यांच्या संदर्भात एक आरटीआय अर्ज मी आरोग्य खात्यात दाखल केला. त्या अर्जाला दिलेल्या माहितीत गोव्यात कधीच समोर न आलेले भयानक वास्तव उघड झाले. पण या वास्तवाचा सामना कोण करणार? गोव्यातील समाजाला आतून खिळखिळे करणाऱ्या अशा गोष्टींकडे सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे समाजानेच यासाठी जागृत व्हायला हवे. अशा बातम्या आल्यानंतरही संवेदनशीलता जागृत होत नसेल तर त्याला उपाय नाही. कदाचित काहींना या विषयाचे गांभीर्य कळत नसावे, उमजत नसावे. पण ड्रग्ज आणि दारुच्या व्यसनामुळे जडलेल्या आजारांमुळे ग्रस्त रुग्णांची काळजी घेण्याची वेळ ज्या कुटुंबांवर आली आहे अशा कुटुंबांच्या वेदनांची कळ समाजात उमटायला हवी. पोलीस ड्रग्जचे जाळे मोडून काढू शकत नाहीत. कारण राजकीय वरदहस्तानेच हे सगळे प्रकार सुरू आहेत. हैदराबाद पोलिसांनी गोव्यातील काही मोठ्या नाईट क्लबच्या मालकांना अटक करून नेल्यानंतर गोव्याच्या किनारी भागांत झगमगाटात चालणाऱ्या नाईट क्लबचे सत्य समोर आले. इतकी वर्षे तिथे चाललेल्या गैरधंद्यांच्या बातम्या प्रसारमाध्यमे छापत आहेत त्याचे कोणालाही सोयर सूतक नाही. पोलीस महासंचालक जसपाल सिंग ड्रग्ज गावागावांत पोहोचल्याचे मान्य करतात. किनारी भागांत बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या पार्ट्या, या पार्ट्यांमधून सुरू असलेली ड्रग्ज विक्री, पसरत चाललेला वेश्या व्यवसाय अशा गोष्टी पोलीस रोखू शकत नाहीत. त्यांच्या याच विवशतेचा फायदा ड्रग्ज व्यवसायातील लोक घेतात. त्यामुळेच गोव्यात गावोगावी ड्रग्ज पोहोचला. दारुने गोव्यात आधीच थैमान घातले आहे. दर दोन दिवसांनी दारूच्या व्यसनामुळे झालेल्या आजाराने सरासरी तीन व्यक्तींचा मृत्यू होतो. गेल्या पाच वर्षांत २,१५१ जणांचा दारुमुळे झालेल्या आजारांनी मृत्यू झाला. ड्रग्जच्या व्यसनामुळे आजार जडलेले शेकडो लोक आज जिल्हा इस्पितळांच्या कक्षांत तसेच मानसोपचार संस्थेमध्ये उपचार घेत आहेत. या सगळ्या गोष्टींचे वास्तव समोर आल्यानंतरही सरकारी यंत्रणेला जाग येत नाही. पण समाज म्हणून आम्हा सगळ्यांचीच जबाबदारी आहे, ज्यावेळी अशा गोष्टी दिसतात त्यावेळी त्या समोर आणायलाच हव्यात. अशा खऱ्या वास्तववादी बातम्यांकडे सरकारचे आणि समाजाचे दुर्लक्ष होत असले तरीही हे सत्य पुन्हा पुन्हा मांडणे गरजेचे आहे. संगीत पार्ट्यांमध्ये एखाद्याचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू होत असेल तर सगळ्यांचे डोळे उघडतात तसेच समाजाप्रती आवश्यक असलेल्या वास्तव दर्शवणाऱ्या बातम्या येत राहणे गरजेचे आहे. समाजाच्या हितासाठी जे चांगले आहे, जे सत्य आहे त्याचा पुरस्कार व्हायला हवा आणि जे वाईट आहे, गैर आहे ते जगासमोर यायलाच हवे.