ओझोन थराबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

निसर्गाकडे संघर्ष करून आपल्या जगण्याचा मार्ग मोकळा करण्याचे धाडस आपल्याच अंगावर येण्याची शक्यता आहे. यामुळे आतापासूनच निसर्गाची सेवा व रक्षण करून आपले जीवन निरोगी व सुसह्य कसे बनेल याकडे प्रत्येकाने लक्ष देणे ही काळाची गरज आहे.

Story: प्रासंगिक। उदय सावंत |
17th September, 12:50 am
ओझोन थराबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

पण ज्या पृथ्वीवर राहतो. त्या पृथ्वीवर असलेले सजीव प्राणी यांचे जीवन सुसह्य व आनंदी व्हावे अशा प्रकारची अपेक्षा असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून मानव जातीची अपेक्षा एवढी प्रचंड प्रमाणात वाढली आहे की, तो स्वतःभोवतीस केंद्रित होताना दिसत आहे. अशातून आपल्या सुखसोयी आत्मसात करण्याच्या दृष्टीने निसर्गाचा बळी घेण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. निसर्गावर आघात करू लागलेला आहे. याचे दुष्परिणाम आता हळूहळू स्पष्टपणे जाणवू लागले असून येणाऱ्या काळात या दुष्परिणावर मात करून अनुकूल परिणामांची पालखी जोपर्यंत आपण आपल्या खांद्यावर घेत नाही तोपर्यंत भावी पिढीसमोर समस्यांचे ओझे निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण कारणीभूत ठरू. यामुळे आपला निसर्ग, पर्यावरण, जैविक संपत्ती यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आज आपल्यावर येऊन थांबलेली आहे. ती जबाबदारी प्रत्येकाने समर्थपणे पेलणे तेवढेच महत्त्वाचे आहे. १६ सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. या ओझोन थरावर होणारे दुष्परिणाम या संदर्भात गांभीर्याने विचार करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

१७८५ मध्ये वॉर्न मानेमध्ये इलेक्ट्रिक डिस्चार्ज उपकरणाजवळ एक विशेष प्रकारचा गंध अनुभवला. ज्याचा त्यांनी त्यांच्या लेखनात उल्लेख केला आहे. १८०१ मध्ये फ्रिक शेकला यांना ऑक्सिजनमध्ये विसर्जित करताना असाच अनुभव आला. १८४० मध्ये शान बिनने या गंधाचे श्रेय एका नवीन वायूला दिले आणि त्यांनी ग्रीक शब्द ओझोच्या आधारे त्याला ओझोनचे नाव दिले. ज्याचा अर्थ आज हळूहळू स्पष्ट होऊ लागलेला आहे. १८६५ साली हे सिद्ध केले की, हा वायू ऑक्सिजनचा इलोट्रॉप आहे आणि त्याचे अण्विक सूत्र ऑक्सिजन आहे. ओझोन हा फिकट निळ्या रंगाचा वायू असून पाण्यात किंचित प्रमाणात विरघळू शकतो. कार्बन टेट्राक्लोराइड व तत्सम द्राव्य यातून एक निळे द्रावण तयार करतो. ११२ डिग्री तापमानावर त्याचे एक गडद निळा तरलात रूपांतर होते. या तरलास त्याच्या उत्खलन बिंदूपर्यंत गरम करणे धोक्याचे आहे. कारण वायुरूप व तरल ओझोन मिळून स्फोट होऊ शकतो. क्लोरीन सदृश्य तीव्रवासामुळे बहुतेक लोक झिरो पॉईं ०.०१ पीपीएम इतक्या प्रमाणात असलेला ओझोन वायू ओळखू शकतात. 

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १६ सप्टेंबरला ओझोन लेयरच्या संरक्षणासाठी जागतिक ओझोन दिवस म्हणून नियुक्त केले आहे. ही नियुक्ती १९ डिसेंबर २००० रोजी १९८७ च्या तारखेच्या स्मरणात केले होते. ज्यावर राष्ट्राने ओझोन लेयर कमी करणाऱ्या पदार्थांवर मॉन्टेरियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली.

वास्तविक ओझोनचा थर हा ऑक्सिजनच्या तीन अणूंचा समावेश असलेला वायू आणि तो पृथ्वीच्या वातावरणाचा एक थर आहे जो सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणापासून आपले संरक्षण करण्याचे काम करतो. फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ फेब्री चार्ल्स आणि हेंद्री यांनी १९१३ मध्ये या थराचा शोध लावला होता.

१९७० च्या उत्तरार्धात ओझोनच्या थराला छिद्र असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला होता. त्यानंतर ८० च्या दशकात जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन करण्यास सुरुवात केली. १९८५ मध्ये ओझोन थराच्या संरक्षणासाठी अधिवेशन घेण्यात आले.

पृथ्वीच्या वातावरणात ओझोनची घनता जास्त असल्यामुळे वीस ते तीस किलोमीटर उंचीवरील हवेच्या थराला ओझोनचा पट्टा म्हणतात.

दरम्यान ओझोनचा थर हा पृथ्वीच्या रक्षणासाठी महत्त्वाचा आहे. पृथ्वीवर असलेले मानवी जीवन व सजीवांचे रक्षण होणे ही काळाची गरज आहे. या ठिकाणी असलेले पर्यावरण,  जैवविविधता यांचेही संरक्षण होणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

आज मात्र मानवाने निसर्गावर मोठ्या प्रमाणात आघात करण्यास सुरुवात केलेली आहे. दिवसेंदिवस बदलणारी जीवनशैली व वाढती लोकसंख्या यामुळे गावाचे रूपांतर शहरी भागात होऊ लागलेली आहे. काँक्रिटची जंगले होऊ लागलेली आहेत. निसर्गाची जंगले नष्ट होऊन त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभ्या राहू लागलेल्या आहेत. झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होऊ लागलेली आहे.

वाढत्या काँक्रिटीकरणामुळे नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र हरवू लागलेले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. तसं पाहावयास गेलो तर आतापासूनच राज्याराज्यांमध्ये पाण्यासाठी संघर्ष सुरू झालेला आहे. म्हादई नदीवर कर्नाटकाच्या उगम स्थानावर कर्नाटक सरकारने होऊ घातलेले प्रकल्प यामुळे गोव्यामध्येही याचे दुष्परिणाम येणाऱ्या काळात प्रत्येकाला दिसणार आहेत. याचा मानवी जीवनावर परिणाम होणार असूनच त्याचा मोठा परिणाम हा पर्यावरणावर होऊ शकतो.

केंद्र सरकार त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून स्वच्छतेच्या मंत्रावर आज मोठ्या प्रमाणात जोर देण्यात येत आहे ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. यापूर्वी स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती नव्हती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कचरा हा उघड्यावर टाकण्यात येत होता. या कचऱ्यातून विषारी वायुची निर्मिती होऊन याचा फटका हा ओझोनच्या थराला बसत होता. त्यामुळे ओझोनचा थर हा मजबुतीपासून कमकुवत होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करू लागल्यामुळे त्याचे दुष्परिणाम पृथ्वीवर होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. आता स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. यामुळे घरातील कचरासुद्धा आज पिशवीमध्ये भरून तो सरकारच्या संबंधित खात्याच्या संस्थांकडे प्रदान करण्यात येत असतो. सदर कचऱ्याचे वर्गीकरण करून वेगवेगळ्या स्तरावर त्याचे व्यवस्थापन करण्यात येत असते. यातून निसर्गात मोठ्या प्रमाणात होणारे आघात रोखण्याच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा टप्पा आहे. अन्यथा अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्यांना आग लावण्याचे प्रकार घडत होते. टायर जाळण्याचे प्रकार घडत होते. यातून विषारी वायूची निर्मिती होऊन ते मानव जातीला व जैवविविधतेला थेटपणे धोका निर्माण करू शकतात. त्याचप्रमाणे आकाशात गेल्यानंतर ओझोनलासुद्धा याचा जबरदस्त धक्का बसत असतो. आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. मात्र मानवी अतिक्रमण निसर्गावर होत असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम हळूहळू होताना दिसत आहेत. एकेकाळी गोव्यामध्ये अनेक ठिकाणी घनदाट जंगल होती. आज जंगले फक्त नावापुरते शिल्लक राहिलेले आहेत. डोंगराळ भागांमध्ये दिसणारी मोठी मोठी जंगली झाडे आज नष्ट होऊन त्या ठिकाणी झाडाच्या उंचीच्या किंबहुना त्यांच्यापेक्षाही उंचीच्या इमारती उभ्या राहू लागलेल्या आहेत. यामुळे निसर्गामध्ये निर्माण होणारा प्राणवायू याची कमतरता भासताना दिसत आहे. प्राणवायू हा जगण्यासाठी प्रत्येकाला महत्त्वाचा घटक असतो. मात्र त्याकडे मानवाने दुर्लक्ष केले व आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून निसर्गावर आघात करण्यास सुरुवात केली. याचे दुष्परिणाम आपल्याला निसर्गातील वारंवारपणे बदलणाऱ्या हवामानाच्या माध्यमातून पहावयास मिळत आहे. एकेकाळी ठराविक ऋतूमध्ये ठराविक गोष्टी होत्या. पावसाळा हा नित्य नियमाने जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होत होता.आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. जून महिना संपला तरी सुद्धा वरूणराजाचे आगमन होत नाही. याचे मूळ हे मानवाच्या अतिक्रमणाकडे जात असून निसर्गाचे मजबूत असलेले अधिष्ठान नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावले टाकत आहोत. यामुळे येणाऱ्या काळात त्याचे दुष्परिणाम मानवी जातीबरोबरच पर्यावरण व निसर्गावर होऊ शकतात.

 जागतिक ओझोन या दिनाच्या माध्यमातून प्रत्येकाने निसर्गाचे रक्षक बनणे तेवढेच महत्त्वाचे आहे. दरवर्षी वन महोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यावरही आपण विशेष भर दिला पाहिजे. कारण जोपर्यंत प्रचंड प्रमाणात प्राणवायूची निर्मिती होत नाही तोपर्यंत येणाऱ्या काळात आपल्याला गंभीर स्वरूपाच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहेत. वातावरणामध्ये इतर झाडापेक्षा जवळपास ६० टक्के प्राणवायूची निर्मिती करणारे वटवृक्ष आज हाताच्या बोटाएवढेच शिल्लक राहिलेले आहेत. संशोधनातून वटवृक्ष हे इतर झाडापेक्षा ६० टक्के प्राणवायूची निर्मिती करीत असते. त्याचप्रमाणे दर सेकंदाला ७१२ किलो प्राणवायूची निर्मिती करण्याची क्षमता या झाडाच्या एकूण प्रक्रियेवर आहे. यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला शुद्ध प्राणवायू विनात्रास घ्यायचा असेल तर आतापासूनच वटवृक्षांच्या झाडांची लागवड ही मोठ्या प्रमाणात करणे अत्यंत गरजेचे आहे. पुरातन काळात आपल्या पूर्वजांना शिक्षणाचा गंध नसतानाही वटवृक्षांचे संगोपन व रक्षण करण्यावर महत्त्वाचा भर दिला. वटवृक्षांना धार्मिक अधिष्ठान प्राप्त केले. यामुळे मोठ्या प्रमाणात या झाडांचे संवर्धन झाले. मात्र कालांतराने ही झाडे आता हळूहळू नष्ट होऊ लागलेली आहेत. यामुळे गेल्या तीन पिढ्यांपासून स्वच्छ प्राणवायूच्या माध्यमातून निरोगी जीवन जगताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. मात्र आता वटवृक्षच नष्ट होऊ लागल्यामुळे येणाऱ्या काळात सुसह्य जीवनाचा मार्गच नष्ट होण्याची भीती नाकारता येण्यासारखी नाही. ब्रह्मकरमळी या ठिकाणी तीनशे वर्षाचे वटवृक्षाचे जुने झाड कोसळले. यामुळे सदर भागातील ग्रामस्थांनी एकसंघ होऊन त्याच ठिकाणी वटवृक्षांच्या झाडाची लागवड केलेली आहे. हा प्रयोग अत्यंत कौतुकास्पद व आदर्श स्वरूपाचा आहे. त्यांचा आदर्श इतर गावातील ग्रामस्थांनी घेऊन आपल्या भागामध्ये वटवृक्षांची लागवड करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळात आपल्याला जगण्यासाठी प्राणवायूची अत्यंत गरज भासणार आहे. करोनाच्या काळामध्ये प्राणवायू हा कितपत महत्त्वाचा आहे हे निसर्गाने आपल्याला दाखवून दिलेले आहे. निसर्गाकडे संघर्ष करून आपल्या जगण्याचा मार्ग मोकळा करण्याचे धाडस आपल्याच अंगावर येण्याची शक्यता आहे. यामुळे आतापासूनच निसर्गाची सेवा व रक्षण करून आपले जीवन निरोगी व सुसह्य कसे बनेल याकडे प्रत्येकाने लक्ष देणे हे आजच्या दिनाच्या माध्यमातून सांगावेसे वाटते.