गणेश चतुर्थी आणि अन्नसंस्कृती

Story: अन्नसंस्कृती। अमेय अभय किंजवडेकर |
17th September 2023, 12:44 am
गणेश चतुर्थी आणि अन्नसंस्कृती

गणेश चतुर्थीची चाहूल लागताच गोव्याच्या भूमीत चैतन्य निर्माण होते. घराघरात लगबग सुरू होते गणरायाच्या आगमनाची. महाराष्ट्र आणि गोवा भागात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असला तरी सांस्कृतिक दृष्ट्या गोवा आणि तळकोकणातील गणेशोत्सवात खूप साधर्म्य आहे. शाडू मातीच्या गणपतीचे पूजन करणे, माटोळी बांधणे, श्री गणेशासोबत त्याची माता गौरीचे पूजन करणे, लाडू, मोदक, करंज्या आदी पदार्थांचा नैवेद्य दाखविणे आदी परंपरा एकसमान आहेत.

गौरीने स्नान करताना आपल्या अंगाच्या मळापासून एक बालक निर्माण केले; श्री शंकरांनी त्याला मारले; पण नंतर त्याच्या धडावर हत्तीचे शीर लावून त्याला जिवंत केले, अशी गणपतीची आख्यायिका पुराणांमधून सांगितली जाते.

गणेश चतुर्थीच्या दिवसांत खवय्यांची चंगळ असते. गणपती बाप्पा घरात असल्याने दररोज पंच पक्वान्ने वाढली जातात. नेवऱ्या (करंज्या), मोदक, लाडू आदी गोडधोड पदार्थ पान व्यापून टाकतात.

'मोदक' हा विशेषत्वाने चतुर्थी सणासाठी केला जाणारा पदार्थ. मोदकांचेही प्रकार आहेत. उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक हे प्रामुख्याने घराघरात केले जातात. आजकाल खव्याचे मोदक, चॉकलेटचे मोदक वैगरे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. पण यांत मोठ्या प्रमाणात भेसळ तसेच कृत्रिम रंगांचा वापर होताना दिसतो. आरोग्याच्या दृष्टीने पारंपरिक पर्याय जास्त हितकारक आहेत.

'माटोळी' हे सुद्धा चतुर्थी सणाचे एक खास आकर्षण. घरांत गणपतीची स्थापना करुन मंडप शोभेसाठी माटोळी - माटवी सजवली जाते. यात निसर्गातून प्राप्त झालेल्या फळाफुलांचा समावेश असतो. माटवीला बांधल्या जाणाऱ्या बहुतांश फळांचे सेवन केले जाते. सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती औषधी गुणधर्मांनी युक्त असतात. काही ठिकाणी तिकटी (लाकडी चौकट) च्या सहाय्याने सान्न, मोदक हे अन्नपदार्थ माटोळीला बांधले जातात. पण आजकाल तिकटी क्वचितच पाहायला मिळते.

अन्नाशिवाय कोणताही सण पूर्ण होत नाही. अन्नसंस्कृतीचे वैविध्य विशेषत्वाने सणांच्या वेळी पहायला मिळते. यंदाच्या गणेशोत्सवात आपले पारंपरिक अन्नपदार्थ पुनरुज्जीवित करण्याचा संकल्प करूया.