चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेराही फोडला
डिचोली : सर्वण डिचोली येथील श्री सातेरी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी नथ, इतर वस्तू तसेच मंदिराच्या सभोवताली असलेले छोटे कळस चोरून नेले. डिचोली पोलिसांना माहिती देताच त्यांनी चोरट्यांचा शोध सुरू केला.
सातेरी मंदिरात मध्यरात्री हा चोरीचा प्रकार घडला असल्याची शक्यता आहे. हे मंदिर लोकवस्तीपासून दूर असल्याने अज्ञातांनी चोरी केली. गेल्या वर्षीही असाच चोरीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी देवस्थानतर्फे डिचोली पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा फोडला असल्याने चोरीबाबत अधिक सुगावा लावणे कठीण झाले आहे.
दरम्यान, गणेश चतुर्थी निमित्त गावी जाणाऱ्या लोकांनी आपल्या घरांच्या सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.