रवा आणि सुक्या खोबऱ्याच्या सारणाची | तिखट | सातपदरी
गणपती बप्पांच्या आगमनाची तयारी सुरु झाली की, स्त्रियांची नेवऱ्या म्हणजेच करंज्या करण्यासाठीची लगबग सुरू होते. नेवऱ्या या गोड, तिखट, मुगाच्या डाळीच्या, रव्याच्या, रवा सुके खोबरे अशा अनेक प्रकारचे सारण भरून केल्या जातात.
आज तुम्हाला नेहमीची रवा, सुके खोबऱ्याच्या सारणाच्या नेवाऱ्यांसोबतच तिखट नेवरी व सातपदरी नेवरीची कृती सांगणार आहे.
रवा खोबरे सारण भरून केलेली नेवरी
साहित्य :
१ कप मैदा, पाव कप बारिक रवा, दोन चमचे कडकडीत तापलेले तेल, थोडे पाणी, अर्धा कप पिठीसाखर किंवा दळलेली साखर, वेलची पावडर, काजू किंवा सुका मेवा, खसखस दोन चमचे, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती :
मैदा, रवा एकत्रित करून त्यात मोहन टाकून ते तेल सर्व पीठाला चोळून घ्यावे. नंतर त्यात चिमूटभर मीठ टाकून थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्यावे व एका ओलसर कपड्याखाली झाकून ठेवावे.
सारणासाठी एका कढईत मंद आचेवर रवा भाजून घ्यावा. शेवटी थोडे तूप घालून परतून घ्या व त्याच कढईत सुके खोबरे, खसखस, काजू भाजून घ्यावे. हे सर्व मिश्रण एकत्रित करून थंड झाल्यावर त्यात वेलची पावडर आणि अर्धा कप पिठीसाखर किंवा दळलेली साखर घालावी.
करंज्या करताना मळलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची पारी लाटून घ्यावी. त्यात वरील थोडे मिश्रण घालून कडा पाण्याने भिजवाव्या व पारी दुमडून घ्यावी. पारीच्या कडेवर जोर देऊन पारी बंद करावी, जेणेकरून तेलात तळताना पारीच्या कडा सुटणार नाहीत. मग त्यावरून कातरणे फिरवावे आणि नेवऱ्या मध्यम आचेवर तेलात तळून घ्याव्यात.
तिखट नेवऱ्या
सर्व कृती वरीलप्रमाणेच. फक्त यातील सारणात जर वेलची पावडर वगळून त्यात थोडी मिरची पावडर टाकली तर तिखट नेवऱ्या तयार होतील.
सातपदराच्या नेवऱ्या
साहित्य :
वरीलप्रमाणेच असून याची कृती जरा वेगळी आहे, या नेवऱ्या करण्यासाठी साठा करून घ्यावा. त्यासाठी अर्धी वाटी तूप, १ वाटी कॉर्नफ्लॉर एकत्र करून फेटून घ्यावे.
कृती :
प्रथम पिठाच्या ३ पातळ पोळ्या लारून घ्याव्यात. मग त्यातील एक पोळी घेऊन त्यावर वरील साठा लावावा, त्यावर दुसरी पोळी ठेवावी व हलकेच दाबून त्यावर ही साठा पसरून लावावा व त्यावर तिसरी पोळी ठेवून थोडी दाबून त्यावर ही साठा लावावा. व याचा रोल तयार करून दाबून घट्ट करून घ्यावा. हा रोल १५ मिनिटे झाकून ठेवावा.
हा रोल कट करताना प्रथम उभी हलकी चीर द्यावी आणि मग आडवे तुकडे करून घ्यावेत. पारी लाटताना पापुद्र्याची साइड खाली ठेवून पारी लाटून त्यात सारण भरून नेवऱ्या तळून घ्याव्यात. या नेवऱ्या अतिशय खुसखुशीत होतात.