
पावसाळ्यात बाजारामध्ये आंबाडे विक्रीस आलेले दिसतात. हिरवेगार हे आंबाडे चवीला आंबट असून त्याचा उपयोग अनेक भाज्यात तसेच हुमणात केला जातो. चिंचेच्या ऐवजी आंबाड्याचा उपयोग हमखास केला जातो. या आंबाड्याचे आंबट गोड असे मेल लहान मुलांना तर आवडतेच पण मोठयांनाही चपातीसोबत हे मेल खायला मजा येते. काहीसे आंबट, गोड, तिखट अशी मिश्र रुच असलेली ही आंबाड्याची रेसिपी चला तर करूया ...
साहित्य
२० आंबाडे, १ किलो गूळ किसून, ५ हिरव्या मिरच्या, १ इंच आले, २ चमचे लाल तिखट, १ चमचा हळद पावडर, थोडे पाणी, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी साहित्य - थोडे तेल, राई, १ चमचा काळीमिरी, थोडा शंकर छाप हिंग
कृती
प्रथम आंबाडे चांगले धुवून त्याच्या वरची साल तासून घ्यावी. आले धुवून त्याच्यावरची साल काढून त्याचे बारीक तुकडे करावे किंवा किसून घ्यावे. फोडणीसाठी साहित्य दिले आहे, त्याची फोडणी करून ते साहित्य जाडसर कुठून घावे. एका पॅनमध्ये आंबाडे घालून ते बुडतील इतपत पाणी घालून गॅसवर उकळायला ठेवावे. त्याच्यात मीठ, थोडी हळद पावडर घालावी. एक उकळी आल्यावर त्यात किसलेला गूळ, मिरची पावडर, थोडी हळद पावडर आणि फोडणी केलेल्या साहित्याची जाडसर पावडर, हिरव्या मिरच्या, आले व चवीनुसार मीठ घालून मंदाग्नीवर शिजवावे. मिश्रण दाटसर होत आल्यावर गॅस बंद करावा. थंड झाल्यावर एका बाटलीत भरून ठेवावे.
चपातीसोबत खाताना याची चव आणखीनच वाढते.