पावसाळ्यात नवीन बांबू रुजून जमिनीतून त्याचे कोंब बाहेर येतात, तेच हे किल्ल. हे किल्ल कोवळे असतानाच ते भाजी करण्यास योग्य असतात. किल्लांच्या कडक आवरणाचे पापुद्रे काढून आणि नखाने खुपसला जाईल इतपत कोवळा भाग आल्यावर तो भाग काढून घ्यावा. हाच कोवळा भाग भाजीसाठी वापरतात.
हे किल्ल बाजारात विक्रीस आले की हातोहात खपतात कारण हे कोवळे किल्ल फक्त पावसाळ्याच्या मोसमातच विक्रीस येतात. त्यामुळे अशा मोसमी भाज्या खाण्यात अव्वल असलेले अस्सल गोवेकार हा किल्ल दिसला रे दिसला, की तो विकत घ्यायला टाळाटाळ कधीच करत नाही आणि मग घरातील सुगरण तयार असतेच सुके किल्ल करण्याच्या उमेदीत! या भाजीत वापरला जाणारा खास असा शंकर छाप हिंग हा या भाजीची रुच अप्रतिम करून जातो, त्यामुळे किल्ल करताना खास शंकर छाप हिंग वापरायला विसरू नका. चला तर मग, करूया न मग आता किल्लांची रुचकर सुकी भाजी!!
साहित्य
५ बांबूचे कोवळे कोंब, अर्धी वाटी भिजत घातलेली चणाडाळ किंवा तुरीची डाळ, ओले खोवलेले खोबरे एक वाटी, ५ ते ६ सुक्या मिरच्या, थोडासा गूळ, तेल, फोडणीचे साहित्य, शंकर छाप हिंग, मीठ.
कृती
बांबूचे कोवळे कोंब सोलून आतील कोवळा भाग घ्यावा. तो बारीक चिरून आदल्या दिवशी रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवावा. त्यामुळे त्याचा उग्र वास कमी होण्यास मदत होते. दुसर्या दिवशी तो पाण्यातून काढून तीन-चार वेळेस चांगला धुवून घ्यावा. मग कुकरच्या भांड्यात हा चांगला धुतलेला किल्ल, चण्याची किंवा तुरडाळ, सुक्या मिरच्या, खोवलेले खोबरे, मीठ हे सर्व साहित्य घालून कुकरच्या ४ ते ५ शिट्या काढाव्यात. मग हे शिजवलेले सर्व साहित्य एका पॅनमध्ये काढून घ्यावे. थोडा चवीनुसार गूळ घालावा आणि त्यात शिल्लक राहिलेले पाणी आटवून घ्यावे. सर्व पाणी आटल्यावर फोडणी द्यायच्या भांडयात तेल घालून राई, जिरे आणि शंकर छाप हिंग घालून चुरचुरीत फोडणी करून ती फोडणी या भाजीत घालावी. मग दुपारच्या जेवणात इतर भाज्यांसोबत या सुक्या किल्लांच्या चविष्ट भाजीची चव घेताना वेगळेच समाधान लाभते.