चिकन शागुती हा गोव्यात केला जाणारा एक पारंपरिक पदार्थ. खास रविवारी किंवा घरी पाहुणे येणार असतील, तेव्हा चिकन शागुती हमखास केली जाते. तेलावर परतला जाणारा कांदा खोबऱ्याचा वास आणि त्याच्यात ताजे सुके मसाले भाजताना घरभर दरवळणारा सुगंध दुपारच्या जेवणाची भूक आणखीनच प्रज्वलित करून जातो..
साहित्य
१ किलो चिकन, २ कांदे, २ हिरव्या मिरच्या, दहा लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, दोन चमचे दही किंवा एक लिंबू, २ मोठे टोमॅटो, तेल, मीठ चवीनुसार. हिरव्या मसाल्यासाठी : दोन मूठ हिरवी कोथिंबीर पाने (देठ काढून), २ हिरव्या मिरच्या, एक मोठा लसणीचा गड्डा सोलून (दहा बारा पाकळ्या) दोन इंच आले (साल काढून), मीठ १ चमचा, वाटणासाठी : दोन कांदे उभे चिरलेले, एक नारळ खोवलेला, १० काश्मिरी मिरच्या, दोन दालचिनीचे तुकडे, दोन चमचे काळीमिरी, १५ लवंग, २ टेबलस्पून धणे, अर्धा चमचा खसखस, पाव चमचा बडीशेप, २ हिरव्या दालचीनी, १ मोठी काळी वेलची, चिमूटभर जावित्री, १ मोठे चक्रीफुल, पाव जायफळ.
कृती
प्रथम चिकनचे तुकडे करून ते स्वच्छ धुवून घ्यावे. काश्मिरी मिरच्या धुवून त्या पाण्यात भिजवून ठेवाव्या. हिरव्या मसाल्यासाठी जे पदार्थ दिले आहेत ते मिक्सरला फिरवून पेस्ट करून घ्यावी व ते मिश्रण आणि थोडे दही किंवा दही नसल्यास एक लिंबू घालून मिश्रण एकत्रित करून चिकनला व्यवस्थित लावावे. त्यातच एक कच्चा कांदा कापून घालावा व चिकन मुरवण्यासाठी एक तास ठेवून द्यावे.
एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून त्यात दोन कांदे, खोबरे व काश्मिरी मिरच्या टाकून ते मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे. त्यानंतर सर्व गरम मसाले एकेक करून सुके भाजून घ्यावेत. कांदा खोबरे व हे भाजलेले सर्व गरम मसाल्याचे वाटण तयार करून ठेवावे.
दुसऱ्या एका मोठ्या गॅसवर टोपात तेल टाकून त्यात एक कांदा, हिरव्या मिरच्या मधोमध कापून घालाव्या व तळसून झाल्यावर त्यात मुरवत ठेवलेले चिकन घालावे. गॅसची आच मध्यम ठेवून १० ते १५ मिनिटे चिकन शिजवून घ्यावे. त्यानंतर वाटलेले कांदा खोबऱ्याचे वाटण घालून पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून चांगली उकळी आणावी. चिकन शिजल्यावर गॅस बंद करताना त्यावर मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. जर यात आणखी चमचमीत चव पाहिजे असल्यास चिकन शिजत आल्यावर त्यात दोन चमचे बटर घालावे.