श्रीकृष्णाचे जीवनसार

येत्या बुधवारी, श्री बालकृष्णांची जन्माष्टमी आहे, त्यानिमित्ताने आपल्या मुलांनी श्रीकृष्णांच्या जीवनाकडून ग्रहण करण्यासारखे धडे कोणते हे जाणून घ्याला हवे.

Story: पालकत्व | पूजा शुभम कामत सातोस्कर |
01st September 2023, 10:36 pm
श्रीकृष्णाचे जीवनसार

कर्मावर ध्यान केंद्रित करा, फलप्राप्तीवर नाही

श्रीकृष्णांनी आपल्या अवतारकार्यात नेहमीच कार्य करण्यावर विश्वास ठेवला, फळाच्या अपेक्षेने काहीही केले नाही. त्याचप्रमाणे मुलांनी सुध्दा आपण आपली व समाजाची प्रगती कशी करु शकतो यावर ध्यान द्यावे. अध्यापन करताना आपल्या गुणांचा विचार न करता जास्तीत जास्त, चांगला अभ्यास करण्यासाठी प्रयत्न करावेत. एखाद्याला मदत करतानाही नेहमी निस्वार्थी भावना असावी. फळाची अपेक्षा कधीही करु नये. निस्वार्थी वृत्तीने केलेले कुठलेही कार्य नेहमीच यशस्वी होते. 

प्रसंगांचे गांभीर्य जाणा

जिथे यश तिथे कधीकधी अपयश हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे. मुलांच्या मनातील जर सर्व इच्छा पूर्ण झाल्या तर ते खूश होतात’ पण जर त्यांना अपयश आले तर त्यांचे हृदय द्वेषाने भरुन जाते, अशावेळी येणाऱ्या अपयशातून धडा घेत जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते ही महत्त्वाची शिकवण आपण श्रीकृष्णांकडून घेतली पाहिजे.

वर्तमानकाल हेच खरे जीवन

श्रीकृष्णांनी आपल्या अवतारकार्यात अनेक त्याग, त्रास सहन केले, ही पण नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर आपणास प्रसन्न भावना दिसते, गोड हसू दिसते. असंख्य संघर्ष करताना सुध्दा, आपले मन शांत ठेवून, कुठलाही ताण न घेता, आनंदाने आपले जीवन श्रीकृष्ण जगले. आजकाल माझे भविष्य काय, असा ताण घेत असताना आपण हे का विसरतो, की आपले वर्तमान खंडित होत आहे. जे घडले तो भूतकाळ होता, जे घडणार आहे ते भविष्य आपल्याला माहीत नाही, तरीही विनाकारण ताण घेत आपण आपला जीवनाचा आनंद हिरावून घेतो. त्यामुळे नेहमीच वर्तमानकाळात तणावमुक्त जीवन जगण्याचा धडा मुलांनी श्रीकृष्णांकडून घेतला पाहिजे.

रागावर नियंत्रण

राग हा एक असा स्वभाव आहे ज्यामुळे अनेक मुलांचे संपूर्ण आयुष्यच बिघडून जाते. रागाच्या भरात घेतलेला एक छोटासा निर्णयही आपले आयुष्य बदलून टाकतो. श्रीकृष्णांच्या जीवनात असे अनेक प्रसंग घडले, परंतु त्यांना कधी कुणाचा राग आला नाही. आत्ताच्या काळातील युवा पिढीने रागावर नियंत्रण व संयम हे दोन गुण श्रीकृष्णांकडून शिकणे गरजेचे आहे. रागाच्या भरात आपण इतरांचा वाटेल तसा अपमान करतो, अनेकदा त्यांना इजा देखील करतो, पण जेव्हा तोच राग शांत होतो, तेव्हा पश्चातापाची वेळ येते. म्हणूनच म्हणतात की राग हा माणसाचा खरा शत्रू आहे, जो यशाच्या वाटेवर सतत अडचणी उभ्या करतो.

जीवनातील संघर्ष

संघर्ष माणसांनाच काय, परमेश्वरालाही चुकत नाही. अशा संघर्षाशी दोन हात करायचे सोडून आजकाल मुले आपले जीवन संपवतात. यात कसलाही समजूतदारपणा नाही. अशावेळी श्रीकृष्णांनी त्यांच्या जीवनात केलेल्या त्याग व संघर्षांचे स्मरण करायला हवे. त्यायोगे आपल्या जीवनातील संघर्षाचे महत्त्व समजण्यास मदत होते.