श्रावणमासी हर्ष मानसी.. म्हणत मनोहरी श्रावणाची सुरूवात होते अन् व्रतवैकल्यांनी सजलेल्या श्रावण महिन्याला गोंजारण्यासाठी महिला वर्गाची एकच लगबग उठते. महिलांसाठी श्रावणाची व्याख्या म्हणजे पूजाअर्चा, व्रतवैकल्ये, देवदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचे ते उपवास. या महत्त्वाच्या महिन्यात उपवास करण्याचा उद्देश निव्वळ अध्यात्मिक असला तरी त्याचे आरोग्यदायी फायदे मात्र भरपूर आहेत.
श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. वातावरणातील आर्द्रता वाढलेली असते, पाणी दूषित झालेले असते. हा महिना कीटक, जंतू आणि विषाणूंनी भरलेला असतो. यामुळे या काळात पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पचनसंस्था कमकुवत होणे, पोट खराब होणे, अपचन, ऍसिडिटी, अन्नातून विषबाधा होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. परिणामी, रोग टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी या दरम्यान स्वतःची काळजी घेण्याचे तंत्र अवलंबले पाहिजे. यासाठी उपवास केल्याने शरीरातील पचनसंस्था स्वच्छ होऊन पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात.
वजन कमी होण्यास मदत
उपवास करणे म्हणजे आपोआपच कमी कॅलरीचे सेवन करणे. एखाद्या व्यक्तीला संपूर्ण दिवसासाठी आवश्यक असलेल्या कॅलरीमधील एक तृतीयांश भाग म्हणजे साधारणपणे ५००-६०० कॅलरी आपल्याला एका वेळच्या जेवणातून मिळू शकतात. त्यामुळे उपवासाने, त्यादरम्यान कॅलरी कमी मिळाल्याने तसेच न्यूरोट्रांसमीटर नॉरएपीनेफ्रिनची पातळी वाढल्याने पचनक्रिया वाढून वजन कमी होते.
रक्तातील साखरेवर नियंत्रण
उपवासामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारते. इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होऊन रक्तातील साखर नियंत्रणास प्रोत्साहन मिळते. ग्लुकोज आणि शरीराच्या वजनावर परिणाम झाल्याने हे कॅलरीचे सेवन मर्यादित करण्याइतके प्रभावी असते व मधुमेहाचा धोका असलेल्यांसाठी उपयुक्त ठरू शकते.
हृदय आणि मेंदूच्या आरोग्यात सुधार
कॅलरी मर्यादित ठेवणे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे रक्तदाब, ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊन हृदयरोग होण्याची जोखीमही कमी होते. उपवास केल्याने मेंदूचे कार्य सुधारते, मज्जातंतू पेशींचे संश्लेषण वाढते आणि मेंदूच्या कार्याला चालना मिळते. त्यामुळे अल्झायमर, पार्किन्सनसारखे न्यूरोडीजनरेटिव्ह डिसऑर्डर टाळण्यासाठी मदत होते.
पचन प्रक्रियेत सुधार
या महिन्यात पावसामुळे सूर्यप्रकाश कमी मिळून पचनक्रिया मंदावते. या काळात शाकाहारी, पचायला खूप सोपे अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेवर डिटॉक्सिफायिंग प्रभाव पडतो. या कालावधीत सामान्यपणे आढळणाऱ्या जलजन्य रोगांपासून हे नैसर्गिक संरक्षण ठरते.
शरीराच्या चक्राचे संतुलन आणि आयुर्मानात वाढ
उपवासामुळे आपल्या शरीराचे घड्याळ समायोजित करून मॅटाबॉलीजम क्रिया नियंत्रित करता येते. यामुळे चांगली झोप होऊन शरीराचे तापमान, हार्मोनल आरोग्य राखण्यास मदत होते. कॅलरी सेवन मर्यादित ठेवल्याने सेल्युलर प्रक्रिया सुधारते, शरीर ताजेतवाने राहते व आयुर्मान वाढविण्यात मदत होते.
उपवासादिवशी एकादशी आणि दुप्पट खाशी असा प्रकार करू नका. यामुळे उपवासाचा फायदा तर सोडा पण त्रासच जास्त होऊ शकतो. पचनसंस्थेला आराम मिळावा, यासाठी मुख्यत: उपवास करा. सवय नसल्यास आरोग्यदायी फायदे लक्षात घेऊन अधूनमधून उपवास करण्याचा प्रयत्न करा. उपवासाचे तास हळूहळू वाढवा. उपवासाच्या निमित्ताने फिजिकल डिटॉक्स होत असताना मेडिटेशन, ध्यानाच्या निमित्ताने सकारात्मक ऊर्जा वाढवत मानसिक डिटॉक्स करण्याचाही प्रयत्न करा.