गोव्यात आता सुरू असलेल्या श्रावणातील पाऊस म्हणजे अचानक पावसाच्या सरी कोसळू लागतात तर लगेच पुढच्या क्षणाला ऊनही पडते. श्रावण खरं तर मनाला भावणारा महिना. परंतु पावसामुळे हवामानात आर्द्रता वाढते. त्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊन पचनक्रिया कमजोर होते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि अनेक संसर्गजन्य रोग बळावतात.
सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, गजकर्णासारखे त्वचारोग, सांधेदुखी हे या ऋतूत त्रास करणारे आजार आपल्याला होऊ नये व या ऋतूचा आनंद घेता यावा असं प्रत्येकाला वाटतं. आयुर्वेद ऋतूचर्येनुसार आपल्या आहार विहारात मोजकेच पण आवश्यक असे बदल केल्यास आपण या बदलणाऱ्या वातावरणात सुद्धा संसर्गजन्य रोगांपासून स्वतःचे रक्षण करू शकतो.
काय खावे?
१) भूक लागली असेल तरच जेवावे. संध्याकाळचे जेवण ७:३० पर्यंत करावे. पचायला हलके, गोड, आंबट व खारट रसांचे पदार्थ, ताजे, स्निग्ध व गरम अन्न सेवन करावे. नाश्ताही असाच हलकाफुलका असावा.
२) पावसाळ्यात जुना तांदूळ किंवा तांदूळ नवीन असेल तर कढईत भाजून, थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावा व वापरावा.
३) भात शिजवताना १-२ मिरे किंवा लवंग त्यात घालावे. तांदळाच्या पिठाच्या पातोळ्या, मुठल्या, भाकरी, पायस असे नैवेद्याचे पदार्थ आहारात ठेवावे. साळीच्या लाह्या किंवा लाहयांचा चिवडा पचायला हलका, कफ दोष कमी करणारा असल्याने या काळात खाण्यास योग्य.
४) पावसाळ्यात पडवळ, घोसाळे, भेंडी, दुधी यांसारखी फळभाजी तसेच रक्तशुद्धी व त्वचारोगावर उपयोगी तायकिळा, कृमीनाशक व रक्त शुध्द करणारा कुर्डू, शेवगा, कफ, खोकला कमी करणारी भारंगीची पानफुले अशा रानभाज्या खाव्यात. नावडत्या भाज्यांचे पराठा, कटलेट बनवावेत.
५) फळं कमी प्रमाणात खावी. सुकामेवा पचन क्रियेस मदत करतो.
६) जिरेपूड, सैंधव घालून ताजे ताक किंवा कढीपत्ता, लसूण , हळद, हिंग, जिऱ्याची फोडणी देऊन ताकाची कढीसुद्धा भाताबरोबर घेऊ शकता.
७) तूप, मेतकूट, कढीपत्त्याची फोडणी दिलेले राईस वॉटर सूप थकवा नाहीसा करून पचन सुलभ करते.
८) पाणी उकळून, गाळून प्यावे. सतत सर्दी, खोकला असल्यास १ लिटर पाण्यात पाव चमचा सुंठ घालून, चांगले उकळून, गाळून, तहान लागेल तेव्हा घोट-घोट प्यावे.
९) भजी, कटलेटसाठी बेसन, कॉर्नफ्लॉरऐवजी मूग डाळ किंवा तांदळाचे पीठ वापरावे. यामुळे गॅस होणार नाही.
१०) भातासोबत थोड्या प्रमाणात लोणचे खावे. ताप येऊन गेल्यावर जीभेची चव पुन्हा आणण्यासाठी घरगुती लोणचे उत्तम आहे.
११) मांसाहार पचायला जड, पित्त आणि कफ दोष वाढवणारा असल्याने शक्यतो टाळावा. अगदी टाळणे अशक्य असल्यास अल्प प्रमाणात हुमण बनवून दिवसा खावे.
काय खाऊ नये?
१) पचायला जड, कफ दोष वाढवणारे डेअरी आणि बेकरीचे पदार्थ उदा. चीज, पनीर, सलाड, कोशिंबीर, केळं, पेरू, कंदमुळं, कच्चे केळे, साबूदाणा, पोहे असे पदार्थ सारखे खाल्ले की निसर्गततः कमकुवत झालेल्या पचनशक्तीवर ताण येतो.
२) पावसाळ्यात पाणी दूषित असते. त्यामुळे उघड्यावरचे पदार्थ तसेच हॉटेलमध्ये खाणे टाळावे.
३) कृमी होण्याची शक्यता असल्याने पालेभाज्या टाळाव्या.
४) मांसाहार पचायला जड असल्याने टाळावा.
५) गॅस व वात वाढवणारे पदार्थ, मोड आलेली कडधान्ये, बेसनाचे तळलेले पदार्थ टाळावे.