सुरक्षाकवच

Story: पालकत्व | पूजा शुभम कामत सातोस्कर |
25th August, 11:00 pm
सुरक्षाकवच

भाग-२

गेल्या आठवड्यातील लेखात आपण प्राथमिक वयातल्या मुलांच्या विषयी काही मुद्दे बघितले होते. दिवसेंदिवस नवनवीन अपराधांनी भ्रमिष्ट होत चाललेल्या या समाजात आपल्या मुलांची सुरक्षा सुनिश्चित करणे म्हणजे प्रत्येक पालकांसाठी एक आव्हानच असते. जसजशी मुले मोठी होत जातात, तसतसे या आव्हानाचे स्वरुपही वाढत जाते. आज आपण माध्यमिक वयाच्या मुलांना सुरक्षित करण्यासाठी काय करु शकतो हे पाहणार आहोत.

पालकांचे मित्रत्व

मुलांच्या वाढत्या वयासोबतच, त्यांच्यात अनेक शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनात्मक बदल एकाचवेळी जलदगतीने होत असतात. अशा वेळी पालकांना मित्रत्वाची भूमिकाही पूर्ण करावी लागते. वयाच्या या टप्प्यावर नात्यात इतकी परिपक्वता निर्माण करावी, की मुलांनी मनात आलेला कुठलाही प्रश्न निसंकोच पालकांना विचारायला हवा. मनातील कुठलीही भावना मुलांनी मुक्तपणे पालकांसमोर मांडायला हवी.

शारीरिक, मानसिक परिवर्तनाशी संतुलन

विशेषत: मुलींच्या जीवनात वयाच्या माध्यमिक टप्प्यावर महत्त्वाचे परिवर्तन होते. मुलींची मासिक पाळी सुरु होते. अशा वेळी शरीरात, मानसिक अवस्थेत अनेक परिवर्तन होतात. त्यावेळी प्रत्येक महिन्याच्या पाच दिवसात शरीरात होणारे बदल, स्वच्छतेचे महत्त्व, घरात आणि शाळेत घ्यायची काळजी याचे योग्य मार्गदर्शन एक आईच आपल्या मुलीला देऊ शकते. 

योग्य मार्गदर्शनाचे बाळकडू

मुलांच्या बदलत्या जीवनशैलीवर ध्यान केंद्रित करत त्यांना सुरक्षिततेचे सर्व सामान्य नियम समजवावे. मुलांना व्यक्त होण्यासाठी पालकांचा स्वभाव मुक्त असायला हवा. मुलांवर जर पालक रागावले किंवा आपली व्यस्त जीवनशैली मध्ये आणली, तर मुले मुक्तपणे व्यक्त होऊ शकणार नाहीत. कुठल्याही स्थितीत माझे आईबाबा मला समजून घेतील हा विश्वास मुलांच्या मनात निर्माण होणे म्हणजेच, पालकांचे खरे यश होय. त्याचबरोबर पालकांनी नेहमीच शिक्षकांशी संपर्कात राहून मुलांच्या विकासात हातभार लावायला हवा.

परिस्थितीचे गांभीर्य

मुले अतिशय जलद गतीने आकार घेत असतात. अशा वेळी त्यांच्या मनाच्या तटावर अनेक भावनांच्या लाटा येतात. त्यात त्यांचे अपेक्षित परीवर्तन देखील स्पष्ट होते. अशावेळी पालकांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून, त्यानुसार कोमल वर्तन केले पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या स्थिती मुलांच्या मनाशी जुडलेल्या असतात, त्या वेळी मुलांना योग्यायोग्य आणि पालकांचा दृष्टिकोणही समजत नाही. अशा वेळी रागापेक्षा अधिक प्रेमाने मुलांना समजवावे. शाळेत त्यांची विशेषत: कुणासोबत कशा स्वरुपाची मैत्री आहे, याबाबतीत सतर्क रहावे.