स्तनांमध्ये अचानक बदल जाणवतोय का? काही वेगळेपण भासतेय का? सरळ डॉक्टरांकडे जाऊ की आधी अजून कोणाचा सल्ला घेऊ? मग सल्ला घेऊ तर कोणाचा हे समजत नाहीये? असे विचार मनात येणे साहजिक असतात. अश्या वेळेस घाबरून जाऊ नका, कारण घरच्या-घरी अत्यंत सोप्या पद्धतीने काही मिनिटांत 'सेल्फ ब्रेस्ट एक्जामिनेशन' करता येते, ज्यामुळे स्तनांच्या कॅन्सरचं निदान लवकर होण्यास मदत होते.
स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी सामान्यपणे दुसऱ्या क्रमांकावर आढळणारा कर्करोग म्हणजे स्तन कर्करोग. देशात गेल्या २० वर्षांपासून स्तनांच्या कॅन्सरने त्रासलेल्या महिलांची संख्या वाढतच चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतातील एकूण कॅन्सरग्रस्त महिलांच्या संख्येत ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण २५ ते ३० टक्के इतके आहे. यामुळे महिलांनी नियमित स्वरूपात स्तनांच्या कर्करोगाच्या धोक्याच्या लक्षणांची पाहणी केली पाहिजे. काहीवेळा स्तनांचे कर्करोग हे सुरुवातीच्या टप्प्यात आढळून येत नाहीत पण ज्या महिलांचे वय ४० पेक्षा जास्त आहे, त्यांनी कोणती लक्षणे आढळून येत आहेत का त्यावर लक्ष ठेवले पाहिजे.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे
स्तनांमध्ये गाठ, स्तनांच्या आकारात बदल, स्तनांवरील त्वचेत बदल, स्तन किंवा काखेत सतत दुखणे, स्तनाग्रांची जागा, आकार बदलणे, स्तनाग्रांच्या आजूबाजूला लालसर होणे किंवा पुरळ येणे, स्तनाग्रांमधून पाणी किंवा रक्त येणे इत्यादी प्राथमिक लक्षणे असू शकतात.
स्तनांची तपासणी केव्हा करावी?
घरच्या घरी करता येणाऱ्या स्तनांच्या तपासणीसाठी फक्त तीन ते पाच मिनिटे वेळ लागतो. तपासणी मासिक पाळीनंतर चार-पाच दिवसांनी करावी. मासिक पाळी बंद झालेल्यांनी महिन्यातून एकदा तरी करावी. तसेच स्तन सॉफ्ट किंवा मऊ असताना करावी. असे केल्याने स्तनांची तपासणी योग्य पद्धतीने होऊ शकते. महिलांच्या तुलनेत पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण कमी असले तरी, गेल्या काही वर्षांपासून पुरुषांमध्येही ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढताना पाहायला मिळते. त्यामुळे फक्त महिलांनीच नाही तर पुरुषांनीही हे स्तन परीक्षण करावे.
स्तनांची तपासणी कशी करावी?
स्तनांची तपासणी करताना आपले स्तन हे नेमके हाताला कसे जाणवतात, याचा परिचय ठेवावा जेणेकरून काही वेगळेपण असल्यास समजून येणे सोपे पडते. वेगवेगळ्या कारणांनी स्तनाचा स्पर्श, आकार आणि उभार बदलत असतो व क्वचितचपणे तो कॅन्सर असू शकतो. गाठ मिळाली असल्यास पुढील तपासणीशिवाय निष्कर्ष लावू नये.
पहिल्या टप्प्यात, स्तनाच्या गाठीकडे फक्त पाहणे (ऑब्झर्वेशन). आरशासमोर उभे राहून दोन्ही स्तन समान दिसताहेत ना, त्यांचा आकार व उभार समान आहे ना, सूज, लालसरपणा दिसत नाही ना, स्तनाग्रांमधून स्त्राव तर येत नाही ना हे पहावे. आधी हात बाजूला सोडून सरळ उभे राहून मग हात कंबरेवर ठेवून, हात डोक्यावर ठेवून अश्या वेगवेगळ्या स्थितीत तपासावे.
दुसर्या टप्प्यात प्रत्यक्ष हात लावून तपासणी (पाल्पेशन). पाल्पेशन करताना हाताच्या मधील तीन बोटांच्या मध्य भागाचा वापर करावा. ही तपासणी अंघोळ करताना साबणाच्या हाताने करण्यास सोपी पडते तसेच पालथे झोपूनही स्तनाची गाठ पसरट झाल्याने गाठ तपासणी सोपी होते. पाळीच्या आसपास स्तन ताठर झालेले असतात त्यामुळे तेव्हा तपासणी करू नये. स्तनाचे चार भाग कल्पून, एका-एका भागावर तळवे गोल गोल फिरवून तपासणी करावी. आधी हलके आणि मग नीट दाब देऊन तपासणी करावी. चारही भाग झाले की, मध्यापासून सुरू करत पुन्हा गोल गोल तपासत कडेपर्यंत जावे. काखेपासून स्तनापर्यंत तपासावे. काही वेगळे आढळल्यास पुढील तपासणीसाठी डॉक्टरांना भेटावे.
स्तनामध्ये होणारे प्रत्येक बदल किंवा वेदना कर्करोग आहे असे नसते. स्तनामध्ये होणार्या बदलांना इतर बरीच कारणे असू शकतात. हार्मोन्सची पातळी कमी-जास्त झाल्यामुळे जसे गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत, पाळीदरम्यान स्तनामध्ये सूज-टेंडरनेस निर्माण होते व वेदना होऊ शकतात. स्त्रियांच्या बाबतीत घट्ट ब्रा घालणे, फिटिंग व्यवस्थित नसणे, जास्त वेळेपर्यंत घालून ठेवणे ही देखील स्तनांमध्ये वेदना होण्याची कारणे असू शकतात. पण गाठ, वेदना किंवा बदल जास्त काळासाठी असल्यास वेळ दवडू नका.