आज शिक्षणामुळे स्त्री अनेक क्षेत्रात भरारी घेत आहे. अशिक्षित, मागासलेल्या वर्गातील स्त्रियाही आज आपल्या कलेचा उपयोग करून आर्थिक स्वातंत्र्य अनुभवत आहेत हे कौतुकास्पद आहे. मागासवर्गीय स्त्रियांना योग्य ते व्यासपीठ मिळवून देण्याचे काम वाळपई गावातील डॉ. अंकिता आमशेकर या गेली तीन वर्षे निष्ठेने करत आहेत.
अंकिता आमशेकर या पेशाने डेंटिस्ट असून वाळपईत त्यांचा दवाखाना आहे. त्यांचे वडील डॉ. अशोक आमशेकर यांच्या समाजसेवेचा हा वारसा पुढे नेण्यासाठी, काळाची गरज आणि त्यांची आवड म्हणून अंकिता यांनी पर्यावरण हा विषय निवडला. त्यांच्या 'अंकिताज केअर क्लब गोवा' संस्थेतर्फे स्थानिक कलाकार, मातीकाम करणारे कारागीर, स्पेशल मुलांनी बनवलेल्या वस्तू तसेच आदिवासी महिलांनी बनवलेल्या वस्तू यांची ओळख आणि विक्री केली जाते. त्यानिमित्ताने, दुर्लक्षित कलाकारांना त्यांच्या कलेच्या ओळखीसोबतचत्या कलेचे मोलही मिळत आहे.
रक्षाबंधनाच्या सणानिमित्त पालघर येथील ‘सेवा विवेक’ या संस्थेतील आदिवासी महिलांनी पर्यावरण पूरक बांबूच्या राख्या तयार केल्या आहेत. आपल्या केअर क्लब तसेच सोशल मीडियाद्वारे अंकिता करून या राख्यांची ओळख आणि विक्री करण्यास मदत करत आहेत. आदिवासी महिलांनी तयार केलेल्या या पर्यावरण संवर्धक बांबूच्या राख्यांमध्ये वड, पिंपळ, लिंबू, शमी, तुळस यांच्या बिया आहेत. या राख्या मातीत गाडून बिया रुजवल्या जातात. अंकिता यांनी आत्तापर्यंत ५००हून अधिक बांबू राख्या विकत आदिवासी महिलांच्या मेहनतीला मोलाचा हातभार लावला आहे.
‘सेवा विवेक’च्या माध्यमातून आदिवासी महिला १३ एकर जागेत बांबूची लागवड आणि संवर्धन करतात. या संस्थेचे व्यवस्थापनही या आदिवासी महिलाच उत्तमरितीने सांभाळतात. ‘सेवा विवेक’ महिला रोजगार, शिक्षण, पर्यावरण, आदिवासी महिलांना मदत या क्षेत्रात काम करते. राष्ट्रपती कोविंद यांनी या विनाअनुदानित संस्थेला भेट देऊन तेथील कार्याची माहिती जाणून घेतली आहे. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनीही 'मन की बात' या कार्यक्रमात या संस्थेच्या कार्याचा खास उल्लेख केला होता.
पूर्ण वाढ झालेल्या सुक्या बांबूच्या पातळ पट्ट्यांपासून कलाकुसरीच्या वस्तू तयार केल्या जातात. गोव्यात अशी संस्था नसल्याने त्या आदिवासी महिलांना इथे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम अंकिता या आवडीने करत आहेत. या आदिवासी महिलांना त्यांच्या कलेचे मोल प्राप्त व्हावे आणि त्यांच्या संस्थेची समाजाला ओळख व्हावी याच एकमेव उद्देशाने त्यांनी या कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र सरकारकडून २०२२ व २०२३ या दोन वर्षी 'बांबू सेवक' म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.
‘सेवा विवेक’मधील महिला अंकिता यांच्या संपर्कात असतात. मागणीप्रमाणे त्या बांबू राखीसोबतच पेन स्टँड, कंदील, फ्रूट बास्केट, टी कोस्टर, पिगी बँक, पुस्तक होल्डर, अगरबत्ती स्टँड, की चेन, लहान मुलांचे फर्निचर आदी बांबूच्या कलाकृतींचा पुरवठा करत असतात. आपला व्यवसाय एकहाती सांभाळून अगदी निरपेक्ष वृत्तीने अंकिता आमशेकर या आदिवासी महिलांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळवून देत आहेत, हे विशेष!