बाणस्तारी अपघात; तपासाची सूत्रे निधीन वाल्सन यांच्या हाती

क्राईम ब्रांचकडून पथकाची स्थापना; चौकशीसही सुरुवात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th August 2023, 05:13 pm
बाणस्तारी अपघात; तपासाची सूत्रे निधीन वाल्सन यांच्या हाती

पणजी : बाणस्तारी​ अपघाताच्या चौकशीसाठी क्राईम ब्रांचने पोलीस अधीक्षक आयपीएस निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापना केली आहे. या पथकाने शनिवारी सावर्डेकर दाम्पत्याने अपघाताच्या रात्री पार्टी केलेल्या नंदनवनसह अपघात स्थळाचीही पाहणी केली.

हेही वाचा

बाणस्तारी अपघात : पोलिसांनी तपासात फेरफार न करता कार चालवणाऱ्यावरच कारवाई करावी

बाणस्तारी अपघात : परेशला वाचवण्यासाठी पत्नी चालकाच्या सीटवर बसली!

बाणस्तारी अपघातातील जखमींना सर्व अपघाती लाभ देणार !

६ ऑगस्टच्या रात्री नंदनवन-फोंडा येथे पार्टी करून मद्यधुंद अवस्थेत पणजीत येत असताना श्रीपाद उर्फ परेश सिनाय सावर्डेकर आणि मेघना सिनाय सावर्डेकर यांच्या भरधाव वेगात असलेल्या मर्सिडिझ कारने बाणस्तारी पुलावर काही वाहनांना ठोकरले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तिघे गंभीर जखमी झाले, तर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातावेळी मर्सिडिझ महिला चालवत होती, असा दावा अपघातावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी केला. परंतु, म्हार्दाेळ पोलिसांनी श्रीपाद उर्फ परेश सिनाय सावर्डेकर याला अटक केली. त्यामुळे अपघातात मृत पावलेल्या फडते दाम्पत्याच्या ​दिवाडी गावातील नाग​रिक आक्रमक झाले. त्यांच्यासह आमदार राजेश फळदेसाई आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हार्दोळ पोलीस स्थानक गाठून मेघना सिनाय सावर्डेकला अटक करून तिची चौकशी करण्याची मागणी लावून धरली. या काळातच मेघना हिने न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यावर तत्काळ सुनावणी घेत न्यायालयाने मेघनाला अटक न करण्याचे​ निर्देश दिले होते.

दरम्यान, बाणस्तारी अपघात प्रकरण ‘हायप्रोफाईल’ असल्याने पोलिसांकडून ते दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत, आमदार राजेश फळदेसाई यांनी सर्वप्रथम हे प्रकरण तपासासाठी क्राईम ब्रांचकडे देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत, सरकारने शुक्रवारी हे प्रकरण तपासासाठी क्राईम ब्रांचकडे सोपवले होते. शनिवारी लगेचच क्राईम ब्रांचने आयपीएस अधिकारी निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापना केल्यानंतर या पथकाने तपासालाही सुरुवात केली आहे.

चौकशी पथकात कोण कोण?

क्राईम ब्रांचने स्थापन केलेल्या चौकशी पथकात उपअधीक्षक सूरज हळर्णकर (प्रमुख), निरीक्षक नारायण चिमुलकर तपास अधिकारी यांच्यासह निरीक्षक दत्ताराम राऊत, किशोर रामनाथ, उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर, हेड कॉन्स्टेबल दिनेश पिकुळकर, साईश नाईक, संदीप मडकईकर आणि कॉन्स्टेबल कल्पेश तोरस्कर यांचा तपास अधिकाऱ्याचे सहाय्यक म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.