पणजीत ‘हिट अँड रन’; अपघातातील जखमीचा मृत्यू

पोलीस दुसऱ्या दुचाकीस्वाराच्या शोधात


12 hours ago
पणजीत ‘हिट अँड रन’; अपघातातील जखमीचा मृत्यू

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : सांतिनेज येथील दुकळे हेवन इमारतीजवळ सोमवारी रात्री दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात अजय राजभर (२४, ताळगाव, मूळ उत्तर प्रदेश) या गंभीर दुचाकीस्वाराचा उपचार सुरू असताना गोमेकॉत मंगळवारी मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची ‘हिट अँड रन’ अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलीस दुसऱ्या दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी पोलीस हवालदार पांडुरंग सामंत यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सोमवार, २१ रोजी सायं. ७.३० वा. अजय राजभर दुचाकीवरून ताळगावहून पणजीच्या दिशेने येत होता. सांतिनेज येथील दुकळे हेवन इमारतीजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात दुचाकीने समोरून धडक दिली. त्याबरोबर राजभर रस्त्यावर पडला. त्याला मदत करण्याएेवजी दुसऱ्या दुचाकीस्वाराने तेथून पळ काढला. स्थानिकांनी पोलीस आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. गंभीर व्यवस्थेत अजयला गोमेकॉत दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
पणजीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पांडुरंग सामंत व इतरांनी अपघातस्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक सूरज मडगावकर यांनी अज्ञात दुचाकी चालकाविरोधात हिट अँड रन प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या आणि मोटर वाहन कायद्याचे विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पणजी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.