स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर करण्यात गोवा अव्वल

एनएसएसओच्या सर्व्हेक्षण : राज्यात ९९.२ टक्के लोक वापरतात स्वच्छ इंधन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 hours ago
स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर करण्यात गोवा अव्वल

पिनाक कल्लोळी
पणजी : स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर करण्यात गोवा राज्य देशात अव्वल स्थानी आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि प्रकल्प अंमलबजावणी खात्याच्या राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण कार्यालयाने (एनएसएसओ) केलेल्या सर्व्हेक्षण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. गोव्यात एकूण सर्व्हेक्षण करण्यात आलेल्यांपैकी ९९.२ टक्के लोक स्वच्छ इंधन वापरत आहेत. संपूर्ण देशाची स्वच्छ इंधन वापरण्याची सरासरी ६३.४ टक्के इतकी कमी आहे.
या सर्वेक्षणात स्वयंपाकासाठी बहुतांश वेळेस वापरण्यात येणाऱ्या ऊर्जेचा प्राथमिक स्रोतांचा अभ्यास करण्यात आला होता. स्वच्छ इंधनामध्ये एलपीजी किंवा इतर नैसर्गिक वायू, गोबर किंवा इतर बायोगॅस, सौर, पवन ऊर्जेपासून तयार करण्यात आलेली वीज आणि सौर कुकर यांचा समावेश आहे. एनएसएसओतर्फे गोव्यातील ६३९ ग्रामीण, तसेच ३१४ शहरी भागातील कुटुंबांतील एकूण ३,६४५ व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. यामध्ये १५ वर्षांवरील महिला व पुरुषांचा समावेश होता.
राज्यातील शहरी भागात स्वच्छ इंधन वापरण्याचे प्रमाण ९९.९ टक्के आहे. तर ग्रामीण भागातील हेच प्रमाण ९७.७ टक्के आहे. संपूर्ण देशातील ग्रामीण भागात ४९.३ टक्के, तर शहरी भागात ९२.९ टक्के लोक स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर करत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
स्वच्छ इंधन वापरण्यात गोव्यानंतर तेलंगणा आणि सिक्कीम या राज्यांचा क्रमांक लागतो. येथे प्रत्येकी ९७.२ टक्के लोक स्वच्छ इंधन वापरतात. केंद्रशासित प्रदेशात चंदीगड येथे सर्वाधिक म्हणजे १०० टक्के लोक स्वच्छ इंधन वापरतात. प्रदूषण कमी करण्यासाठी, आरोग्यदायी आयुष्यासाठी स्वच्छ इंधनाचा वापर करणे आवश्यक असते. स्वच्छ इंधनाचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकारने २०१४ पासून विशेष मोहीम सुरू केली आहे.

झारखंडमध्ये सर्वात कमी इंधनाचा वापर
संपूर्ण देशाचा विचार करता झारखंड येथे सर्वात कमी म्हणजेच केवळ ३१.७ टक्के लोक स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर करतात. याशिवाय छत्तीसगड, ओडिशा, राजस्थान, त्रिपुरा, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, मेघालय या राज्यांत ५० टक्क्यांहून कमी लोक स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर करतात असे अहवालात म्हटले आहे.