ग्राहक तक्रार निवारण आयोगात इलेक्ट्रिक स्कूटरविषयीच्या १२ तक्रारी

तीन प्रकरणे निकालात : ओलाविरोधात सर्वाधिक तक्रारी

Story: समीप नार्वेकर |
12 hours ago
ग्राहक तक्रार निवारण आयोगात इलेक्ट्रिक स्कूटरविषयीच्या १२ तक्रारी

गोवन वार्ता
पणजी : पेट्रोलचा खर्च वाचवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे या हेतूने अनेकांनी इलेक्ट्रिक दुचाकीला पसंती दिली. परंतु वाढत्या तक्रारींमुळे या दुचाकींनी अनेकांवर पश्चात्तापाची वेळ आणली आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगात मागील दीड वर्षांत इ-दुचाकीविषयीच्या १२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यांपैकी तीन प्रकरणे निकालात काढली गेली असून उर्वरित ९ प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. सर्वाधिक तक्रारी ओला कंपनीच्या दुचाकींबाबतच्या आहेत.
या दुचाकी काही दिवस उत्तम सेवा देतात; मात्र नादुरुस्त झाल्या तर त्यांच्या दुरुस्तीसाठी सर्व्हिस लवकर मिळत नाही. याबाबत विक्रेतेही जबाबदारी घेत नाहीत. त्यामुळे कंटाळलेल्या दुचाकी मालकांनी शेवटचा पर्याय म्हणून ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. इलेक्ट्रिक दुचाकींच्या तक्रारींची सुनावणी जिल्हा आयोगात केली जाते. एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या दीड वर्षाच्या कालावधीत इलेक्ट्रिक दुचाकींविषयीच्या १२ तक्रारी जिल्हा आयाेगात दाखल झाल्या आहेत. त्यात उत्तर गोव्यातील ७ आणि दक्षिण गाव्यातील ५ तक्रारींचा समावेश आहे. १२ पैकी सर्वाधिक ५ तक्रारी ओला कंपनीच्या दुचाकींविषयीच्या आहेत. त्यानंतर ४ हिरो कंपनीविषयीच्या, तर अन्य इतर कंपन्यांशी संबंधित तक्रारी आहेत.
उत्तर गोवा आयोगात २१ एप्रिल रोजी आय पॅसिफीक या विक्रेत्याच्या विरोधात दोन तक्रारी नाेंद झाल्या आहेत; मात्र सुनावणीवेळी पुरावे सिद्ध न झाल्यामुळे आयोगाने विक्रेत्याच्या बाजूने निकाल देऊन ही प्रकरणे निकालात काढली. २१ मे २०२४, २१ जून २०२४ आणि १६ सप्टेंबर २०२४ रोजी ओला इलेक्ट्रिक दुचाकीबाबत तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. २८ सप्टेंबर २०२३ रोजी प्युअर एनर्जी दुचाकी कंपनीविरोधात तक्रार नोंद झाली आहे. त्यांची अंतिम सुनावणी ३० ऑक्टोबर २०२४ रोजी होऊन निकाल दिला जाणार आहे. हिरो इलेक्ट्रिक दुचाकीविरोधात दाखल तक्रार लवकरच सुनावणीला येणार आहे.
दक्षिण गोवा आयोगात ३ ऑगस्ट २०२३ रोजी, तसेच ३१ मे २०२४ रोजी हिरो इलेक्ट्रिक दुचाकीच्या विरोधात तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांतील एक प्रकरण आयोगाने निकालात काढले असून या विषयीच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. ७ मार्च २०२४ आणि २६ मार्च २०२४ रोजी ओला इलेक्ट्रिक दुचाकींच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या असून त्यावर सुनावणी सुरू आहे.