रायबंदर येथील फेरी रॅम्प होणार तिप्पट मोठा

२ कोटी खर्च अपेक्षित : भविष्यात रो-रो फेरी सेवा होणार सुलभ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15 hours ago
रायबंदर येथील फेरी रॅम्प होणार तिप्पट मोठा

पणजी : रायबंदर ते चोडण फेरी प्रवास जलद होण्यासाठी रायबंदर येथील फेरी रॅम्प जवळपास तिप्पट मोठा करण्यात येणार आहे. या रॅम्पची रुंदी ९ मीटरवरून २६ मीटर करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हे काम करण्यात येईल. यासाठी सुमारे २.७ कोटी रुपये खर्च येणार आहे. रुंदीकरण झाल्यावर या मार्गावर भविष्यात सुरू करण्यात येणारी रो-रो फेरी बोट सेवा सुलभ होणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पामध्ये सध्याच्या रॅम्पची रुंदी १७ मीटरने वाढवून २६ मीटर करण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना किंवा वाहनांना फेरीमध्ये चढउतार करणे सोपे जाणार आहे. यासाठी या कामामध्ये रॅम्पची पुनर्बांधणी आणि विस्तार करणे, भराव घालणे, संरक्षक भिंत बांधणे आणि बोट नांगरण्यासाठीचे दोरखंड बसवणे यांचाही समावेश आहे. अतिरिक्त पायाभूत सुधारणांमध्ये प्रवाशांसाठी तिकीट बूथ आणि प्रसाधनगृह सुविधा विकसित करण्यात येणार आहे. या सुधारणामुळे नवीन रो-रो फेरी सुरळीतपणे चालतील.

रो-रो फेरीमुळे जलमार्ग वाहतुकीत वाढ
- नदी परिवहन खाते रायबंदर ते चोडण मार्गावरील जुन्या फेरी बोटी काढून येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या रो-रो फेरी बोटी सुरू करणार आहे. ही सेवा डिसेंबर अखेरीस सुरू करण्याचा खात्याचा प्रयत्न आहे.
- या बोटी चारचाकी वाहनांसह मोठ्या संख्येने प्रवासी वाहून नेण्यास सक्षम असतील. यामुळे रायबंदर ते चोडण दरम्यान जलद सेवा मिळणार आहे. या सेवेमुळे या प्रदेशातील जलमार्ग वाहतूक वाढ होईल.
- या रो-रो फेरीसाठी रायबंदर येथील रॅम्पची रुंदी वाढवणे आवश्यक असल्याचे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.