विद्यार्थ्यांच्या अपार आयडीसाठी पालकांचे आधार लिंक ऐच्छिक

आधार जोडण्यासाठी पालकांची मान्यता अनिवार्य

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 hours ago
विद्यार्थ्यांच्या अपार आयडीसाठी पालकांचे आधार लिंक ऐच्छिक

पणजी : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीच्या नोंद करण्यासह प्रमाणपत्रांसाठी डिजी लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये अपार आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपार आयडीसाठी मुलाचे वडील, आई किंवा पालक यांचे आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. आधार कार्ड लिंक करणे ऐच्छिक आहे. यासाठी शिक्षण विभागाने अद्याप सक्ती केलेली नाही, असे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले.
राज्यात विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी वडील, आई किंवा कायदेशीर पालक यांचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. यासाठी मुलाच्या पालकांची संमती आवश्यक आहे. या संमतीसाठीचे अर्ज शाळा किंवा विद्यालयामार्फत पालकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. आधार क्रमांकासह अर्ज भरल्यानंतरच अपार आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
मुलाच्या पालकांनी त्यांचे आधार कार्ड जोडण्यास हरकत नाही, असे सांगणारा अर्ज भरणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाने अर्ज सादर केला असला तरी पालकांना त्यांचे आधार कार्ड जोडण्याची सक्ती नाही. जर कोणाला ते नको असेल तर त्यांनी ते नाही दिले तरी चालणार आहे. मात्र, त्यांच्या मुलाचा अपार आयडी तयार करण्यात अडथळे येऊ शकतात, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.
देशभरात अपार आयडी जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपार आयडीमागील उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक रेकॉर्ड तसेच त्यांच्या शैक्षणिक कामगिरीची नोंद ठेवणे हा आहे.

काय आहे ‘अपार आयडी’?
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी अपार ओळखपत्र सुरू केले आहे. पूर्व-प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी अपार कार्ड (स्वयंचलित परमनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री) कार्ड बनवले जात आहे. जे 'वन नेशन वन स्टुडंट आयडी कार्ड' म्हणूनही ओळखले जाते. याद्वारे, विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक डेटा, जसे की पुरस्कार, पदव्या, शिष्यवृत्ती आणि इतर क्रेडिट्स, डिजिटल पद्धतीने अपार आयडीवर अपलोड केले जातील.